Pune News : शहराच्या दृष्टीने वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी कात्रज-कोंढवा रस्त्याचे रुंदीकरण होणे महत्वाचे आहे. मात्र भूसंपादन अभावी हे काम रखडले आहे. त्यामुळे रस्त्याच्या रुंदीकरणासाठी राज्य सरकारने अखेर 200 कोटी रुपयांचा निधी मंजूर केल्याची घोषणा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे; पण, या घोषणेला आठ महिने होऊनही पालिकेचे हात रिकामेच आहेत. आता उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री अजित पवार यांनी हे आश्वासन पूर्ण करण्याचा शब्द दिला आहे.
कात्रज येथील राजस सोसायटी ते कोंढवा येथील खडी मशिन चौक या दरम्यानच्या रस्ता रुंदीकरण करण्यात येणार आहे. या कामाला 31 ऑक्टोबर 2018 रोजी मान्यता मिळाली असून या भूसंपादन न झाल्याने रस्त्याचे काम रखडले आहे. या रस्त्यांच्या भूसंपादनासाठी 710 कोटी रुपये हवे आहेत. भूसंपादनामुळे दीर्घकाळ रेंगाळलेल्या या रस्त्याची रुंदी 84 ऐवजी 50 मीटर करण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे.
रस्त्याची रुंदी कमी केल्याने भूसंपादनाचा खर्च 280 कोटी रुपये इतका येणार होता. यांपैकी 200 कोटी रुपये राज्य सरकारकडून मिळणार आहेत. हा निधी पुरवणी मागणीमध्ये मंजूर झाला आहे. परंतु, आठ महिने होऊनही अद्याप हे 200 कोटी रुपये पालिकेच्या तिजोरीत जमा झालेले नसल्याने रस्त्याचे काम ढेपाळले आहे.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
कात्रज-कोंढवा रस्ताचे काही प्रमाणात टीडीआर देऊन भूसंपादन झाले आहे. त्यामुळे हा रस्ता तुकड्या तुकड्यामध्ये तयार आहे. रस्त्यासाठी आवश्यक असलेल्या जागेच्या भूसंपादनाअभावी रस्त्याचे काम रखडले आहे. टीडीआरचे दर कमी झाल्यामुळे जागा मालकांकडून भूसंपादनसाठी रोख रकमेची मागणी केली जात आहे. त्यामुळे या रस्त्याच्या भूसंपादनासाठी 200 कोटींच्या निधीची गरज आहे.
आठ महिन्यापूर्वी पुण्यातील एका कार्यक्रमात या रस्त्यासाठी 200 कोटी रुपयांच्या निधीला राज्य सरकारने मंजुरी दिल्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले होते. पण पालिकेला अद्याप पर्यंत हा निधी मिळालेला नाही.
दरम्यान, शुक्रवारी अजित पवार यांनी अचानक कात्रज कोंढवा रस्त्याला भेट दिली आणि रस्त्याचे काम त्वरित पूर्ण करण्याचे प्रशासनाला आदेश दिले. तसेच 200 कोटी कॅबिनेट नोट पुढच्या आठवड्यात येईल, असा शब्द दिला आहे. राज्याच्या एका उपमुख्यमंत्र्यांनी दिलेला शब्द दुसरा उपमुख्यमंत्री पूर्ण करणार का? हे आता पाहावे लागेल.
Edited By : Rashmi Mane