ACB Trap News Sarkarnama
पुणे

ACB Trap News: लाचखोर उपायुक्त ढगेच्या अडचणी वाढल्या; लाचखोरीनंतर आता 'एसीबी'कडून अपसंपदेचाही गुन्हा दाखल

Pune News: पुण्यात एसीबीचा धडाका, १५ दिवसांत तीन ट्रॅप, एक लाचेची मागणी तर एक अपसंपदेचा असे पाच गुन्हे केले दाखल

सरकारनामा ब्यूरो

पिंपरी : पुणे एसीबी युनीटने पुन्हा गिअर टाकला असून ट्र्रॅपसह लाच मागणे आणि बेहिशोबी मालमत्ता जमा केल्याच्या कारवाईचा धडाका लावला आहे. १६ ऑक्टोबर २०२१ ला एक लाख नव्वद हजाराची लाच घेताना पकडले गेलेले राज्याच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाचे तत्कालीन उपायुक्त आणि पुणे जिल्हा जातपडताळणी समितीचे सदस्य नितीन चंद्रकांत ढगे (वय ४१,रा.वानवडी, पुणे) यांच्याविरुद्ध एसीबीने आता बेहिशोबी मालमत्ता जमा केल्याचाही (अपसंपदेचा) गुन्हा पुण्यातील वानवडी पोलीस ठाण्यात आज (ता.१३) दाखल केला.

२०२१ मध्ये एका महिलेच्या जात प्रमाणपत्राची पडताळणी करून ते वैध असल्याचे प्रमाणपत्र देण्यासाठी ढगेंनी आठ लाख रुपयांची लाच मागितली होती. त्यातील एक लाख नव्वद हजार रुपये आपल्या निवासस्थानाजवळ रात्री दहा वाजता घेताना ते एसीबीच्या जाळ्यात सापडले. त्याबद्दल त्यांच्याविरुद्ध् वानवडी पोलीस ठाण्यात लाचखोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला.

त्यावेळी त्यांच्या घर झडतीत १ कोटी २८ लाख ४९ हजार रुपयांची रोकड, दागिने व इतर असे २ कोटी ८१ लाखांचे घबाड सापडले होते. पुढील तपासात ही माया त्यांच्या एकूण उत्पन्नापेक्षा ४७ टक्के अधिक असल्याचे निष्पन्न झाले.

परिणामी आता त्यांच्याविरुद्ध अपसंपदेचाही गुन्हा आज वानवडी पोलीस ठाण्यातच एसीबीने दाखल केला. ही बेहिशोबी मालमत्ता जमा करण्यात त्यांना मदत केल्याबद्दल तसेच खोटी माहिती देऊन सरकारची फसवणूक केल्याबद्दल त्यांची पत्नी प्रतिभा यांनाही या गुन्ह्यात आरोपी करण्यात आले आहे. एसीबीचे डीवायएसपी सुदाम पाचोरकर हे पुढील तपास करीत आहेत.

दरम्यान, गेल्या तीन महिन्यात पिंपरी-चिंचवडमध्ये तीन ट्रॅप करणाऱ्या एसीबीने आता आपल्या या कारवाईचा मोर्चा पुणे शहराकडे वळवला आहे. गेल्या १५ दिवसांत त्यांनी पुण्यात चार लाचखोरीचे गुन्हे नोंदवले. त्यातील ताजी कारवाई काल (ता.१२)त्यांनी केली.

उद्योग, ऊर्जा व कामगार विभागाच्या पुणे कार्यालयातील वरिष्ठ लिपिक सचिन विष्णू गाजरे (वय ३७) आणि चालक बाळू काशीनाथ बीडकर (वय ५७) यांच्याविरुद्ध १२ हजार रुपयांची लाच मागितली म्हणून एसीबीने विश्रामबाग पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद केला. विद्युत ठेकेदारीचा परवाना देण्यासाठी या जोडगोळीने ही लाच मागितली होती.

Edited By- Ganesh Thombare

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT