Devendra Fadnavis Sarkarnama
पुणे

Devendra Fadnavis : 'त्यांना' काम बंद ठेवून घरी बसण्यात इंटरेस्ट; फडणवीसांचा रोख कुणाकडे?

Chaitanya Machale

Pune Political News : अनेक राज्यात कोविडच्या काळात कामे झाली. मात्र आपल्याकडे त्यावेळचे नेतृत्व घरी बसणारे असल्याने कामे रखडली. तत्कालीन राज्यकर्ते यांना कामे बंद ठेवण्यात 'इंटरेस्ट' होता, अशा शब्दात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर नाव न घेता टीका केली.

पुणे कँटोन्मेंट विधानसभा मतदारसंघाचे आमदार सुनील कांबळे यांनी सूचविलेल्या विकास कामांचे भूमिपूजन फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते. राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, आमदार माधुरी मिसाळ, भीमराव तापकीर, भाजप चे शहराध्यक्ष धीरज घाटे, माजी महापौर मुरलीधर मोहोळ यांच्यासह भाजपचे पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.

यावेळी फडणवीसांनी ठाकरेंवर निशाणा साधला. ते म्हणाले, कोरोनाच्या काळात भारताच्या रेल्वे विभागाने ट्रॅफिक नसल्याने अनेक महत्वाची कामे करून घेतली. इतर राज्यांनीही याच काळात अनेक कामे करून घेत विकास साधला. आपले नेतृत्व मात्र कामे बंद ठवून घरी बसण्यात मश्गूल होते.

देशातील प्रमुख शहरांमध्ये पुणे शहराचा समावेश होते. त्यामुळे या शहराचा चेहरा मोहरा बदलण्यासाठी आमचे प्रयत्न सुरू आहेत. पुण्यात मेट्रो होत असताना स्टेशनपर्यंत जाण्यासाठी 'स्कायबसने ' वाहतूक जोडण्याचा प्रयत्न सुरू आहे. त्यासाठी मंजुरी झाल्या असून मुख्यमंत्र्यांकडे एक बैठक घेतली जाणार आहे. त्यानंतर याचा भूमिपूजनाचा मुहूर्त निश्चित केला जाईल . स्कायबसच्या प्रकल्पामुळे पुणेकरांना मेट्रो स्टेशनपर्यंत जाण्यासाठी गाडीची गरज पडणार नाही. यामुळे प्रदूषणही कमी होण्यास मदत होणार आहे, असा विश्वासही फडणवीसांनी व्यक्त केला.

पुणे महापालिकेच्या (Pune Corporation) आरोग्यासह इतर सर्व योजनांची अंमलबजावणी कॅन्टोन्मेंटच्या हद्दीमध्ये सुरू करण्याचा प्रयत्न आहे. कँटोन्मेंट हद्दीमध्ये केंद्र सरकारचा वाटा मिळावा, यासाठी केंद्र सरकारकडे पाठपुरावा केला जात असून यामध्ये लवकरच यश मिळेल, असेही फडणवीस म्हणाले.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

नोटीस आली तरी घाबरु नका

रेल्वेच्या जागेवर ज्या झोपडपट्टी आहेत, तेथील नागरिकांना नोटीस दिली जात आहे. मात्र कोर्टाचे आदेश असल्याने या नोटीस दिल्या जातात. त्यामुळे तेथील नागरिकांनी घाबरून जाऊ नये, असे फडणवीसांनी स्पष्ट केले. रेल्वेच्या ज्या जागांवर घरे झाली आहेत, त्या जागा राज्य सरकारकडे आल्यास तेथे एसआरए योजना राबविण्यात येणार आहे. त्यासाठी केंद्र सरकारकडे आम्ही प्रस्ताव पाठवू. या बदल्यात रेल्वेला इतर जमीन किंवा अन्य पद्धतीने मोबदला दिला जाऊ शकतो, असा तोडगाही फडणवीसांनी सांगितला.

रिंगरोडमुळे अडीच लाख कोटी

पुण्याच्या रिंगरोडसाठी आम्ही प्रयत्न केले होते. मात्र मधल्या काळात दुसऱ्यांची सत्ता असताना हे काम झाले नाही. आता पुन्हा एकदा आम्ही रिंगरोडच्या कामाला सुरुवात केली आहे. रिंगरोडमुळे अडीच लाख कोटींची गुंतवणूक पुण्यात होणार आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात रोजगार उपलब्ध होणार आहे. देशातील सर्वोत्तम मनुष्यबळ हे पुण्यामध्ये उपलब्ध आहे, असेही फडणवीसांनी सांगितले.

(Edited by Sunil Dhumal)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT