Ajit Pawar-Dhananjay Munde Sarkarnama
पुणे

Munde On Ajit Pawar CM Post : अजित पवार मुख्यमंत्री कधी होणार...? धनंजय मुंडेंनीच वर्षच सांगितले...

Vijaykumar Dudhale

Pune News : उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे ‘भावी मुख्यमंत्री’ म्हणून आज पुण्यात पुन्हा बॅनर लागले आहेत. त्यावर राज्याचे कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी मोठे भाष्य केले आहे. ‘अजित पवार यांचे भावी मुख्यमंत्री म्हणून लागलेले बॅनर हे २०२४ नंतरचे आहेत. आता राज्याचे मुख्यमंत्री हे ज्यांच्या नेतृत्वाखाली आम्ही काम करतोय,’ असेही मुंडे यांनी स्पष्ट केले. (Dhananjay Munde said when Ajit Pawar will become Chief Minister)

उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा आज पुण्यात ‘रोड शो’ झाला. त्या ‘रोड शो’ला पुणेकरांनी प्रचंड गर्दी केली होती. त्यात राज्याचे कृषिमंत्री धनंजय मुंडे आणि पुणे शहराध्यक्ष दीपक मानकर हेही पायी चालत सहभागी झाले होते. त्यावेळी बोलताना धनंजय मुंडे यांनी पवार यांच्या मुख्यमंत्रिपदाबाबत भाष्य केले.

मुंडे म्हणाले की, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विकासपर्वाला पुणेकरांनीसुद्धा आजच्या अभूतपूर्व स्वागताने आशीर्वाद दिला आहे. माझं आणि पुण्याचं गेली २५ वर्षांपासून नातं आहे. मी पुण्यात शिकलो आहे, पण असं अभूतपूर्व स्वागत यापूर्वी मी कधीही पाहिलेले नाही.

अजित पवार यांचे पुण्यात भावी मुख्यमंत्री म्हणून बॅनर लागले आहेत. त्यावर धनंजय मुंडे म्हणाले की, आपल्याला अपेक्षित जे उत्तर आहे, ते २०२४ नंतरचे आहे. आता एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री आहेत.

आम्ही कुठल्याही सभेला ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या सभेला उत्तर देणारी सभा असं म्हटलेले नाही. कोल्हापूरची सभा ही उत्तरदायित्वाची आहे. उत्तरदायित्वाचा अर्थ हा असतो की, ज्यावेळी आपण जनतेचे उत्तरदायित्व असतो. अनेक वर्षे एखाद्या लोकनेत्यावर प्रेम केलं गेलं असतं. ते सत्तेत आल्यानंतर त्या जनतेची सेवा करणं, हे उत्तरदायित्व आहे. त्यामुळे कोल्हापुरातील आजची उत्तराची नव्हे, तर उत्तरदायित्वाची सभा आहे, असेही मुंडे यांनी स्पष्ट केले.

राज्यात भाजप-शिवसेना युतीसोबत जाऊन अजित पवार गटाला दोन महिने होऊन गेली. मात्र, अद्याप पालकमंत्रिपदाबाबतचा तिढा सुटलेला नाही. त्यामुळे पालकमंत्रिपदाबाबतचा प्रश्न विचारतोच धनंजय मुंडे यांनी ‘धन्यवाद’ म्हणत प्रश्नाकडे सोईस्करपणे दुर्लक्ष केले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT