PDCC Bank election Sarkarnama
पुणे

PDCC Bank : दिलीप मोहितेंना यंदा जिल्हा बँकेची वाट अवघड? बाबाजी काळेंची तगडी फिल्डिंग; खेडमध्ये राजकीय रणधुमाळी!

PDCC Bank Election 2026: पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर खेडमध्ये दिलीप मोहिते पाटील आणि बाबाजी काळे गटांमध्ये चुरस वाढली आहे.

सरकारनामा ब्युरो

पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या आगामी निवडणुकीने खेड तालुक्यातील राजकीय वातावरण तापले आहे. बँकेच्या संचालकपदासाठी विद्यमान संचालक तथा माजी आमदार दिलीप मोहिते पाटील यांच्या विरोधात विद्यमान आमदार बाबाजी काळे यांच्या नेतृत्वाखाली सर्वपक्षीय आघाडी उभी करण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. त्यामुळे ही निवडणूक केवळ जिल्हा बँकेपुरती मर्यादित न राहता खेडच्या आगामी विधानसभा राजकारणाची रंगीत तालीम ठरण्याची शक्यता आहे.

मागील निवडणुकीत दिलीप मोहिते पाटील बिनविरोध निवडून आले होते. यावेळी मात्र बदललेल्या राजकीय परिस्थितीत त्यांच्या विरोधात थेट आव्हान उभे राहिले आहे. विशेष म्हणजे, त्यांच्या उमेदवारीवरच प्रश्नचिन्ह निर्माण करण्याचा प्रयत्न विरोधकांकडून होत असून, मोहिते यांनी मात्र आपणच उमेदवार असणार आणि संचालकही आपणच होणार, असा दावा केला आहे.

‘७२ आमच्याकडे’; मोहितेंचे शक्तिप्रदर्शन

खेड तालुक्यातील १०४ सोसायट्यांपैकी १०३ सोसायट्यांचे प्रतिनिधी निवडले गेले आहेत. या प्रतिनिधींच्या संख्येवरून दोन्ही गटांकडून दावे-प्रतिदावे सुरू झाले आहेत. दिलीप मोहिते पाटील आणि त्यांच्या समर्थकांकडून तब्बल ७२ प्रतिनिधी आपल्या गटासोबत असल्याचा दावा करण्यात येत आहे. प्रतिनिधी निवडीची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर मोहिते यांनी ६९ प्रतिनिधींना सोबत घेत निमगाव येथे खंडोबाचे दर्शन घेत शक्तिप्रदर्शन केले. या संख्येवर विरोधी गटाकडून आक्षेप घेत वेगळाच दावा करण्यात येत आहे.

काळेंच्या नेतृत्वाखाली ‘मोहितेविरोधी’ आघाडी?

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे विद्यमान आमदार बाबाजी काळे यांच्या नेतृत्वाखाली मोहिते यांच्या विरोधात विविध राजकीय घटकांना एकत्र आणण्यासाठी हालचाली सुरू असल्याची चर्चा आहे. या संभाव्य आघाडीचे अंतिम स्वरूप अद्याप स्पष्ट झालेले नसले तरी तीन-चार जण संचालकपदासाठी इच्छुक असल्याचे सांगितले जात आहे. स्वतः बाबाजी काळेही उमेदवार होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. आमदार स्वतः मैदानात उतरल्यास मतदार प्रतिनिधींना एकत्र आणणे अधिक सोपे जाईल, असा त्यांच्या गटाचा होरा असल्याचे बोलले जात आहे.

शिवसेनेकडूनही इच्छुकांच्या हालचाली सुरू असल्याची चर्चा आहे. मोहिते यांना आव्हान देण्यासाठी आर्थिक ताकद असलेला उमेदवार देण्याबाबतही विचार सुरू असल्याचे सांगितले जात आहे. काळे यांच्या नेतृत्वाखालील विरोधी आघाडीकडून ५५ मतदार प्रतिनिधी आपल्या बाजूला असल्याचा दावा केला जात आहे. यामध्ये आणखी काही प्रतिनिधी सहभागी होतील, असाही दावा करण्यात येत आहे.

उमेदवारीच टिकणार का? कायद्याच्या मुद्द्यावरून नवा पेच

दरम्यान, बँकिंग रेग्युलेशन कायद्यातील दुरुस्ती सहकारी बँकांना लागू झाल्याच्या पार्श्वभूमीवर दिलीप मोहिते पाटील यांची उमेदवारी टिकणार का, यावरूनही चर्चा सुरू झाली आहे. जर कायदेशीर कारणामुळे मोहिते यांची उमेदवारी अडचणीत आली, तर त्यांच्या गटाला सक्षम पर्याय उभा करण्याचे आव्हान निर्माण होऊ शकते आणि त्याचा फायदा विरोधी आघाडीला होऊ शकतो, असा राजकीय तर्क लावला जात आहे.

‘मोहिते उभेच राहणार नाहीत’; काळेंचा दावा

बाबाजी काळे यांनी मोहिते यांच्या उमेदवारीवर थेट प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. “मोहिते यांच्याविरोधात आमची आघाडी भक्कम आहे. त्यांच्याकडे ४२ पेक्षा जास्त संख्या होणार नाही. मुळात मोहिते यांना उभेच राहता येणार नाही. उभे राहिले तरी निवडून येणार नाहीत. त्यामुळे काहीही झाले तरी यावेळी दिलीप मोहिते जिल्हा बँकेचे संचालक नसतील, हे निश्चित आहे,” असा दावा काळे यांनी केला.

‘७२ पैकी एकही कमी होणार नाही’; मोहितेंचा पलटवार

काळे यांच्या दाव्याला दिलीप मोहिते पाटील यांनीही थेट प्रत्युत्तर दिले आहे. “आमच्याकडे ७२ मतदार आहेत. यातील एकही कमी होणार नाही, झाली तर वाढच होईल. कोणताही कायदा मंजूर झाल्यानंतर त्याचा अंमल सुरू होतो. पूर्वलक्ष्यी प्रभावाने तो लागू होत नाही. त्यामुळे बँकिंग रेग्युलेशन कायद्यानुसार १० वर्षे येथून पुढे मोजली जातील. माझ्या उमेदवारीवर त्याचा काहीही परिणाम होणार नाही. मीच उमेदवार असणार आहे आणि संचालकही मीच होणार आहे,” असा दावा मोहिते यांनी केला.

‘दबाव, फोडाफोडी अन् डावपेच’ सुरू होणार?

जिल्हा बँकेच्या निवडणुकीत मतदार प्रतिनिधींची संख्या निर्णायक ठरणार असल्याने पुढील काळात राजकीय हालचालींना वेग येण्याची शक्यता आहे. मतदारांवर दबाव, फोडाफोडी आणि विविध राजकीय डावपेच सुरू होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

मोहिते यांना किंवा त्यांच्या बाजूच्या उमेदवाराला जिल्हा बँकेत पराभूत केल्यास आगामी विधानसभा राजकारणात त्यांची ताकद कमी होईल, असा राजकीय अंदाज त्यांच्या विरोधकांकडून बांधला जात आहे. त्यामुळे मोहिते यांना रोखण्यासाठी विरोधक सर्व ताकद पणाला लावतील, अशी चर्चा आहे.

दुसरीकडे विधानसभा आणि पंचायत समितीच्या राजकारणात आलेल्या अपयशानंतर जिल्हा बँकेची जागा राखणे हे मोहिते गटासाठीही महत्त्वाचे मानले जात आहे. जिल्हा बँकेत बाजी मारल्यास विधानसभा राजकारणासाठी आवश्यक राजकीय बळ मिळेल आणि कार्यकर्त्यांमध्येही सकारात्मक संदेश जाईल, असा त्यांच्या गटाचा प्रयत्न असल्याचे चित्र आहे.

खेडमध्ये ‘७२ विरुद्ध ५५’चा सामना?

एकीकडे मोहिते गट ७२ प्रतिनिधींचा दावा करत आहे, तर दुसरीकडे काळे यांच्या नेतृत्वाखालील विरोधी आघाडी ५५ प्रतिनिधी आपल्या बाजूला असल्याचे सांगत आहे. त्यातच मोहिते यांच्या उमेदवारीवर कायद्याचा पेच निर्माण होणार का, हा प्रश्नही कायम आहे. त्यामुळे पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या खेड तालुका संचालकपदाची निवडणूक आता केवळ सहकार क्षेत्रातील लढत राहिलेली नाही. मोहिते विरुद्ध काळे अशी थेट राजकीय शक्तिपरीक्षा आणि आगामी विधानसभा राजकारणाची रंगीत तालीम, असे या निवडणुकीकडे पाहिले जात आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT