Dilip Walse Patil News: कुकडी पाटबंधारे प्रकल्पाच्या चौथ्या सुधारित प्रशासकीय मान्यते अंतर्गत डिंभे माणिकडोह जोड बोगद्याचे काम हाती घेण्याच्या प्रस्तावास राज्य मंत्रिमंडळाने मान्यता दिली आहे. मात्र, या सुधारित प्रशासकीय मान्यतेस राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते दिलीप वळसे पाटील यांनी विरोध दर्शविला असून या प्रस्तावाचा पुनर्विचार करण्यात यावा, अशी मागणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे.
राज्य मंत्रिमंडळाने मान्यता दिलेल्या या प्रस्तावाअंतर्गत ५,७०४.४० कोटी रुपयांच्या सुधारित प्रस्तावास मान्यता देण्यात आली.
दरसूचीतील वाढ, जादा दराच्या निविदांची स्वीकृती, भूसंपादनाच्या खर्चातील वाढ, विशेषतः नवीन भूसंपादन कायद्यामुळे झालेली वाढ, संकल्पचित्रातील बदल, नवीन अथवा वगळलेल्या तरतुदी, अपुऱ्या तरतुदी तसेच अन्य अनुषंगिक खर्चामुळे प्रकल्पाच्या किमतीत वाढ झाली.
त्यानुसार राज्यस्तरीय तांत्रिक समितीने प्रस्तावाची छाननी केल्यानंतर महाराष्ट्र कृष्णा खोरे विकास महामंडळाने हा चौथ्या सुधारित प्रशासकीय मान्यतेचा प्रस्ताव सादर केला होता. बांधकामविषयक उच्चाधिकार समितीनेही प्रस्तावाच्या छाननीनंतर पाच हजार ७०४ कोटी ५० लाख रुपयांच्या सुधारित प्रशासकीय मान्यतेस मान्यता देण्याची शिफारस केली होती. आश्चर्याची गोष्ट म्हणजे हा प्रस्ताव मंत्रिमंडळाच्या कार्यक्रम बैठकीवर नसताना, बैठकीत मांडल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे.
जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी आठ जानेवारी २०२५ रोजी सह्याद्री अतिथिगृह येथे कुकडी सिंचन प्रकल्पाची बैठक घेतली होती. या बैठकीतील निर्णयानुसार डिंभे-माणिकडोह जोड बोगद्याचे काम प्राधान्याने हाती घेण्याच्या दृष्टीने चौथ्या सुधारित सुप्रमा प्रस्तावास मान्यतेच्या सूचना करण्यात आल्या. त्यानुसार हा प्रस्ताव मंजूर करण्यात आला.
मात्र, कुकडी प्रकल्पाच्या मूळ प्रकल्प अहवालात नसलेला डिंभे-माणिकडोह बोगदा करू नये अन् याबाबत १८ जुलै २०२४ रोजी बैठकीत आंबेगाव, शिरूर, जुन्नर तालुक्यांवर अन्याय करणारा माणिकडोह-बोगदा न करण्याबाबत कार्यवाही केली जाईल असे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिले होते. असे असतानाही डिंभे माणिकडोह बोगद्यास मान्यतेने परिसरातील जनतेवर अन्यायकारक ठरेल, अशी भूमिका वळसे पाटील यांनी आज पुन्हा मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडे मांडली.
- कुकडी पाटबंधारे प्रकल्प येडगाव, माणिकडोह, वडज, डिंभे आणि पिंपळगाव जोगे धरणांचा संयुक्त प्रकल्प .
- या धरणांची एकूण उपयुक्त पाणीसाठा क्षमता ३०.५२ टीएमसी.
- प्रकल्पाचा पाणीवापर ३९.३६ टीएमसी
- पुणे जिल्ह्यातील आंबेगाव, जुन्नर व शिरूर, अहिल्यानगर जिल्ह्यातील पारनेर, श्रीगोंदा, कर्जत व सोलापूर जिल्ह्यातील करमाळा या टंचाईग्रस्त तालुक्यांतील एक लाख ४४ हजार ९१२ हेक्टर क्षेत्राला लाभ.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.