Ajit Pawar-Harshvardhan Patil  Sarkarnama
पुणे

Ajit Pawar- Harshvardhan Patil : अजितदादांनी हर्षवर्धन पाटील यांनी दिलेली टाळी इंदापुरात ठरली चर्चेची!

पवारांनी पाटलांना टाळी दिली असली तरी आगामी निवडणुकीत इंदापुरातील मतदार हे दत्तात्रय भरणे की हर्षवर्धन पाटलांना टाळी देणार? आणि कोणाला विश्रांतीचा टाळ वाजवायला लावणार? याकडे सर्वांचे लक्ष आहे.

विनायक चांदगुडे

शेटफळगढे (जि. पुणे) : मांजरी (ता. हवेली) येथील वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटच्या कार्यक्रमात शनिवारी (ता. २१ जानेवारी) राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) आणि माजी मंत्री हर्षवर्धन पाटील (Harshvardhan Patil) यांच्यात रंगलेली चर्चा चांगलीच व्हायरल झाली आहे. ते बोलत असताना एकमेकांना दिलेली टाळी ही इंदापूरच्या (Indapur) राजकारणात चर्चेचा विषय आणि खळबळ उडवून देणारी ठरली आहे. पवारांनी पाटलांना टाळी दिली असली तरी आगामी निवडणुकीत इंदापुरातील मतदार हे दत्तात्रय भरणे (Dattatray Bharane) की हर्षवर्धन पाटलांना टाळी देणार? आणि कोणाला विश्रांतीचा टाळ वाजवायला लावणार? याकडे सर्वांचे लक्ष असणार आहे. (Discussion between Harshvardhan Patil and Ajit Pawar at Vasantdada Sugar Institute)

मांजरी येथे झालेल्या वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत पाटील व पवार हे एकाच व्यासपीठावर आले होते. इंदापुरातील प्रत्येक कार्यक्रमावेळी पवार हे पाटील यांच्यावर राजकीय टीका करण्याची संधी सोडत नाहीत. परंतु या कार्यक्रमात पाटील आणि पवार यांच्यातील हास्यविनोद सर्वांसमोर आला. त्या वेळी पवार यांनी दिलेली टाळी तालुक्यामध्ये चर्चेचा विषय ठरला आहे.

या प्रसंगामुळे कार्यकर्त्यांनी आपणसुद्धा विरोधी पक्षातील कार्यकर्त्यांबरोबर व नेत्यांबरोबर हसून खेळून टाळ्या देऊन राजकारण केले पाहिजे, असा संदेश दिला. कोणी टाळीसंदर्भातील दृश्याला गाण्याची जोड देऊन टीका केली, तर कोणी यातून कौतुक केले. पण असे असले तरी पवार यांच्या टाळीला राजकीयदृष्ट्या विशेष महत्त्व आहे. कारण, पवार ज्याला विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराच्या वेळी टाळी देतात. त्याचा विजय निश्चित असतो.

आजवरच्या राजकारणात पाटील यांना राजकीयदृष्ट्या शह देण्यासाठी पवार यांनी भरणे यांना कायमच टाळी दिली आहे. त्यामुळेच भरणे हे जिल्हा परिषद अध्यक्ष पदापासून आमदार मंत्रीपदापर्यंत पोहोचले आहेत. याहीवेळी पवार हे भरणे यांना विजयासाठी टाळी देणार, हे निश्चित आहे. पाटील हे विधानसभेसाठी भाजपकडून उमेदवार असणार आहेत. परंतु पवार यांच्या हास्यविनोदातील टाळीपेक्षा इंदापूरचा मतदार हा आगामी निवडणुकीत कोणाला टाळी देणार याला विशेष महत्त्व आहे. भरणे व पाटील हे दोघेही तालुक्यातील जनतेसाठी कामे करीत आहेत. भरणे यांनी मंत्री असताना तालुक्यात कोट्यवधींचा निधी आणला, तर आमदारकीच्या माध्यमातून केंद्र, राज्य व जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून सध्या निधी आणत आहेत. अधिकाऱ्यांच्या माध्यमातून नागरिकांची कामेही तत्काळ मार्गी लावत आहेत, त्यामुळे भरणेंच्या कार्यपद्धतीमुळे सत्ता बदलानंतरही राष्ट्रवादी निश्चिंत आहे.

दुसरीकडे, गेल्या आठ वर्षांपासून सत्तेपासून दूर राहिलेल्या पाटील यांना राज्यात सत्ता बदल होताच अच्छे दिन आले आहेत. जिल्हा नियोजन समिती सदस्य पदाबरोबरच पालकमंत्र्यांच्या अध्यक्षतेखालील कार्यकारी समितीतही हर्षवर्धन पाटील यांना स्थान मिळाले आहे. याचा उपयोग गावच्या विकास कामांना निधी मिळण्यासाठी होणार आहे. तसेच, केंद्र व राज्यात भाजपची सत्ता आहे. त्याचा पाटील यांना उपयोग होणार आहे, त्यामुळे भाजप कार्यकर्त्यांमध्ये उत्साह आहे.

पवारांनी दिलेल्या टाळीला गाण्याची जोड देऊन पाटील यांच्यावर निशाणा साधला जात आहे. भरणे यांनी पाटील यांच्यावर ‘मोठी माणसे खाली येऊ लागली आहेत’ अशी जाहीर टीका केली होती. त्यामुळे पवारांच्या टाळीमुळे इंदापूरची जनता आगामी निवडणुकीत कोणाला टाळी देणार, याची चर्चा इंदापुरात रंगली आहे. विधानसभेच्या २०१९ च्या निवडणुकीवेळी ३ हजार ११० मतदारांनी भरणे यांना ज्यादा मताच्या टाळ्या दिल्या होत्या. या जादा टाळ्यांसाठी भरणे यांना पवार यांची मोठी मदत तालुक्यात झाली होती. पण, इंदापुरातील मतदार आगामी निवडणुकीत चुरशीच्या व अल्प मतावर होणाऱ्या विजयाच्या मताच्या गणितात कोणाला टाळी देणार? आणि कोणाला विश्रांती देऊन टाळ वाजवायला लावणार? याकडे सर्वांचे लक्ष असणार आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT