supriya sule status  Sarkarnama
पुणे

Supriya Sule News : सुप्रिया सुळेंच्या व्हॉटसअ‍ॅप स्टेट्सची चर्चा, उमेदवारी केली जाहीर

सरकारनामा ब्युरो

Baramati Lok Sabha News : लोकसभा निवडणुकीची घोषणा येत्या काही दिवसांतच होणार असल्याने सर्वांकडून तयारी केली जात आहे. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आठ महिन्यांपूर्वी उभी फूट पडली. त्यानंतर बारामती लोकसभा मतदारसंघातून कोण निवडणूक लढविणार, याची उत्सुकता शिगेला पोहाेचली आहे. त्यातच बारामतीच्या विद्यमान खासदार सुप्रिया सुळे यांनी शुक्रवारी आपल्या व्हॉटसअ‍ॅप स्टेट्सवर चिन्ह व पक्षाचे नाव असा मजकूर असलेली स्लाइड ठेवत त्यांच्या उमेदवारीची घोषणा केली आहे. यापूर्वी सलग तीन वेळा विजय मिळवत त्यांनी हॅटट्रिक केली असून, आता चौथ्या वेळी निवडणूक लढविणार आहेत.

खासदार सुप्रिया सुळे यांनी शुक्रवारी व्हॉटसअ‍ॅप स्टेट्सवर उमेदवाराचे नाव सुप्रिया सुळे, निशाणी तुतारी, राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष शरदचंद्र पवार, निवडणूक निशाणी तुतारी फुंकणारा माणूस व ईव्हीएम मशीनचे बटण असा मजकूर असलेली स्लाइड ठेवलेली आहे. यामध्ये ज्येष्ठ नेते शरद पवार, सोनिया गांधी व उद्धव ठाकरे यांची छायाचित्रेही आहेत. ( Baramati Lok Sabha News)

या माध्यमातून सुप्रिया सुळे यांनी बारामती लोकसभा मतदारसंघातून आपल्या उमेदवारीची घोषणा केली असे मानण्यात येत आहे. बारामती लोकसभा मतदारसंघातून सुप्रिया सुळे या 2009, 2014 व 2019 अशा सलग तीन निवणुका जिंकून खासदार म्हणून दिल्लीमध्ये गेल्या होत्या. यंदाही राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाकडून सुप्रिया सुळे यांची उमेदवारी निश्चितच होती, त्याची अद्याप घोषणा झाली नसली तरी केवळ औपचारिकता मानली जात आहे.

दरम्यान, सुप्रिया सुळे यांनी व्हॉटसअ‍ॅप स्टेटसला याचे सूतोवाच केल्याने त्यांची उमेदवारी आता निश्चित झाल्यासारखी असल्याचे राजकीय वर्तुळात मानले जात आहे. सुप्रिया सुळे खासदार झाल्यापासूनच बारामती लोकसभा मतदारसंघात सातत्याने सर्वच विधानसभा मतदारसंघाशी विविध उपक्रम व कार्यक्रमांच्या माध्यमातून हजेरी लावतात. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर त्यांनी बारामती लोकसभा मतदारसंघावर लक्ष केंद्रित केलेले आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये (NCP) उभी फूट पडल्यानंतर अजित पवार (Ajit Pawar) यांनी वेगळी भूमिका स्वीकारलेली असल्याने सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांच्यापुढे अजित पवार यांच्या राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या उमेदवार म्हणून सुनेत्रा पवार यांचे आव्हान असेल अशी चर्चा आहे. अद्याप सुनेत्रा पवार यांच्या उमेदवारीचीही अधिकृत घोषणा झालेली नसली तरी एकूण त्यांचेही मतदारसंघातील वाढते दौरे विचारात घेता, त्यांच्या उमेदवारीच्या घोषणेचीही केवळ औपचारिकताच उरलेली आहे.

R

SCROLL FOR NEXT