Kolhapur News : महाविकास आघाडीचे जागावाटप जवळपास निश्चित झाले असताना स्वाभिमानी शेतकरी संघटनेची भूमिका स्वतंत्र लोकसभा लढण्यावर ठाम आहे. महाविकास आघाडीत स्वाभिमानीला घेण्यासाठी शेवटपर्यंत प्रयत्न केले जात असले तरी स्वाभिमानीने ‘एकला चलो’चा नारा देत प्रचाराचा नारळ फोडला आहे. एकीकडे ‘स्वाभिमानी’बद्दल महाविकास आघाडीची भूमिका सॉफ्ट असली तरी राजू शेट्टी यांच्या स्वाभिमानीची भूमिका सध्यातरी महाविकास आघाडीसाठी धोकादायक आहे. महाविकास आघाडीतील हातकणंगलेतील ठाकरे गटाची जागा स्वाभिमानीसाठी सोडली जाण्याची शक्यता आहे. मात्र, शेट्टी यांची भूमिका ठाम राहिली, तर ऐनवेळी महाविकास आघाडी हातकणंगले लोकसभा मतदारसंघात उमेदवार देऊ शकते.
स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या नेत्यांनी 23 व्या ऊस परिषदेत राज्यातील सहा लोकसभा मतदारसंघांत उमेदवार देण्याची घोषणा केली होती. हातकणंगलेसह कोल्हापूर लोकसभा मतदारसंघात स्वाभिमानीचा उमेदवार ठरला आहे. हातकणंगलेतून स्वतः राजू शेट्टी आणि कोल्हापूरमधून (Kolhapur) प्रदेशाध्यक्ष जालिंदर पाटील यांचे नाव निश्चित आहे. लोकसभेच्या 2014 च्या निवडणुकीत भाजपसोबत असलेल्या स्वाभिमानीने 2019 च्या निवडणुकीत काँग्रेस-राष्ट्रवादी सोबत आघाडी केली होती. मात्र, त्या निवडणुकीत पराभव झाल्यानंतर शेट्टी यांनी आता सवता सुभा मांडला आहे.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
स्वाभिमानीची स्वतंत्र निवडणूक लढवण्याची भूमिका कायम राहिली तरी त्याचा सर्वाधिक फटका महाविकास आघाडीला बसणार आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडे शेतकऱ्यांची मोठी वोट बँक आहे. शिवाय साखर कारखान्याच्या ऊसदरासंदर्भात असो वा पूरग्रस्त शेतकऱ्यांना नुकसानभरपाईची मागणी असो, या सर्व मागण्यासंदर्भात महाविकास आणि महायुतीच्या सरकारलाही धारेवर धरण्याचा प्रयत्न केला होता. कोल्हापूरसह हातकणंगले लोकसभा मतदारसंघातील अनेक गावांना महापुराचा फटका बसतो. महाविकास आघाडीच्या (Mahavikas Aghadi) काळात पूरग्रस्त शेतकऱ्यांना प्रतिगुंठा 135 रुपये दिलेली मदत हा महाविकास आघाडीवरील टीका करणारा महत्त्वाचा मुद्दा राजू शेट्टी (Raju Shetti) यांच्याकडे आहे.
शेतकरी कायदे आणि हमीभाव यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटना निश्चितच भाजपवर हल्लाबोल करेल. मात्र, गेल्या अडीच वर्षांच्या काळात महाविकास आघाडी सरकारने दिलेली तोकडी मदत, शेतकरी प्रोत्साहन अनुदान याबाबत केलेली दिरंगाई याबाबत शेट्टी महायुतीपेक्षा (Mahayuti) महाविकास आघाडीवर अधिक हल्लाबोल करण्याच्या तयारीत दिसतात. आठवडाभरापूर्वी पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी प्रोत्साहन अनुदान शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्याचा मार्ग मोकळा झाल्याचे सांगितले. जर निवडणुकीपूर्वी हे अनुदान शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाल्यास शेतकऱ्यांचा महायुतीबद्दल विरोध काही अंशी कमी होऊ शकतो.
एकीकडे, महायुतीतील वरिष्ठ नेत्यांनी आपली व्हाेट बँक शाबूत ठेवली आहे. पालकमंत्री हसन मुश्रीफ, भाजपचे नेते समरजीतसिंह घाटगे, चंदगडचे आमदार राजेश पाटील, शिवाजी पाटील, राधानगरीचे आमदार प्रकाश आबिटकर, माजी आमदार के. पी. पाटील, माजी आमदार चंद्रदीप नरके, माजी आमदार अमल महाडिक, राज्यसभा सदस्य धनंजय महाडिक, खासदार संजय मंडलिक या वरिष्ठ नेत्यांनी कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातील आपली व्हाेट बँक ‘सेफ झोन’मध्ये ठेवली आहे. त्याचा फायदा महायुती उमेदवाराला होऊ शकतो.
दुसरीकडे, कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीमधील नेत्यांची फळी विस्कळीत झाली आहे. काँग्रेसचे आमदार आणि माजी पालकमंत्री सतेज पाटील यांची जिल्ह्यातील फळी मजबूत असली तरी महाविकास आघाडीमधील इतर पक्षांची घडी विस्कळीत झाली आहे. त्यात कोल्हापूर लोकसभा मतदारसंघात स्वाभिमानीचा उमेदवार उभा राहिल्यास त्याचा फटका महाविकास आघाडीच्या उमेदवाराला बसणार हे निश्चित आहे.
R
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.