Dilip walse Patil
Dilip walse Patil Sarkarnama
पुणे

काही काळजी करू नका; सगळं काही ओक्के होईल : राष्ट्रवादीच्या नेत्याचे सूचक राजकीय भाष्य

नितीन बारवकर

शिरूर (जि. पुणे) : राज्याच्या राजकारणावर मी भाष्य करणार नाही, असे सांगताना राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) नेते तथा माजी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील (Dilip walse Patil) यांनी सद्य राजकीय स्थितीची मात्र शेलक्या शब्दांत खिल्ली उडविली. राज्यात नवीन सरकार (Government) येऊन तीन महिने झाले पण अजून पालकमंत्री नाहीत, पुरेसे मंत्री नाहीत. पण, आता लगेचच त्याबाबत मी बोलू इच्छित नाही. पण, एकच शब्द देतो, काही काळजी करू नका, सगळं काही ओक्के होईल, अशा शब्दांत कार्यकर्त्यांना दिलासा देताना वळसे पाटील यांनी आगामी काळातील राजकीय परिस्थितीबाबत भाष्य केले. (Don't worry; Everything will be fine : Dilip walse Patil)

माजी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील हे शिरूर तालुक्याच्या दौऱ्यावर होते. त्यावेळी झालेल्या सभेत ते बोलत होते. ते म्हणाले की, राज्यात गेल्या काही दिवसांत काय घडले, कसे घडले, हे मी सांगणार नाही. कुठल्या कामाला स्टे दिला, कुठली कामे थांबली, या खोलातही मला जायचे नाही. पण, पुरसे मंत्री आणि पालकमंत्री नसल्याने विकासकामांना चालना मिळत नाही. त्यावर मी काही बोलणार नाही. पण, एक शब्द देतो की काही काळजी करू नका; सगळं काही ओक्के होईल.

महाराष्ट्रात येण्यास अनुकूल असलेले उद्योगधंदे गुजरातला पळविण्याचे प्रयत्न फॉक्सकॉन प्रकल्पावरून सिद्ध झाले आहेत. हे असेच चालू राहिले तर स्थानिक बेरोजगारी वाढत जाऊ शकते, असा इशाराही माजी गृहमंत्र्यांनी या वेळी बोलताना दिला. ते पुढे म्हणाले की, औद्योगिकरणाच्या माध्यमातून परिसराच्या विकासाला चालना मिळाली आहे. एमआयडीसीच्या माध्यमातून अनेक छोटे-मोठे उद्योग येथे आले. त्यातून ग्रामीण भागातील तरूणांच्या हाताला काम मिळाले आणि त्याचाच परिणाम परिसरातील अर्थव्यवस्था सुधारण्यावर झाला. परंतू काही महत्वाचे उद्योग इतरत्र जात असतील तर ते आपल्याला परवडणारे नाही. त्यातून बेरोजगारी वाढणार असल्याने तरूणांनी या स्थितीत वेळीच जागृत झाले पाहिजे. चुकीच्या बाबींना एकजूट करून विरोध दर्शविला पाहिजे.

माजी आमदार पोपटराव गावडे, जिल्हा दूध संघाच्या अध्यक्ष केशरताई पवार, मानसिंग पाचुंदकर, विवेक वळसे पाटील, शेखर पाचुंदकर, आंबेगाव बाजार समितीचे सभापती देवदत्त निकम, भीमाशंकर साखर कारखान्याचे संचालक प्रदीप वळसे पाटील, घोडगंगा साखर कारखान्याचे संचालक राजेंद्र गावडे, शिरूर पंचायत समितीचे माजी सभापती सुभाष उमाप, जिल्हा परिषद सदस्य स्वाती पाचंदुकर, राजेंद्र जगदाळे यावेळी उपस्थित होते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT