Rahul Palande with Uddhav Thackeray and Eknath Shinde
Rahul Palande with Uddhav Thackeray and Eknath Shinde Sarkarnama
पुणे

Crime News : चक्क मुख्यमंत्री कार्यालयाच्या नावानेच केली नामांकित शैक्षणिक संस्थाची फसवणूक; शिवसेनेच्या कार्यकर्त्यास अटक

सरकारनामा ब्यूरो

Pimpri-Chinchwad Crime News : मुख्यमंत्री कार्यालयाच्या (सीएमओ) नावाने फसवणूक करणाऱ्या भामट्याला पिपरी-चिंचवड पोलिसांनी अटक केले आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कार्यालयातून बोलत असल्याचे सांगत त्याने नामांकित शिक्षण संस्थांत विद्यार्थ्यांना प्रवेश मिळवून दिले. त्यांच्या पालकांकडून लाखो रुपये उकळल्याचा पोलिसांचा संशय आहे. धक्कादायक बाब म्हणजे हा पदवीधर भामटा शिंदे शिवसेनेचाच पिंपरी-चिंचवडमधील कार्यकर्ता आहे. पूर्वी तो मूळ शिवसेनेत होता.

राहुल राजेंद्र पलांडे (वय ३१, रा. दर्शननगरी, केशवनगर, चिंचवड) असे या ठकसेनाचे नाव आहे. त्याला पिंपरी-चिंचवड (Pimpri-Chinchwad) शहर पोलिसांच्या गुन्हे शाखा चारने अटक केली आहे. २९ मे पर्यंत त्याला पोलीस कोठडी मिळाली आहे. पुण्यातील व बंगळूरू येथील नामांकित शैक्षणिक शिक्षण संस्थात त्याने विद्यार्थ्यांना प्रवेश मिळवून दिले आहेत.

दरम्यान, संशयित आरोपी पलांडेच्या 'फेसबूक पेज'वर मुख्यमंत्री शिंदे (Eknath Shinde), मंत्री उदय सामंत, माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray), खासदार संजय राऊतांबरोबरचे फोटो आहेत. त्याने आपल्या एका फोन नंबरला ट्रू कॉलरवर 'सीएमओ ऑफिस महाराष्ट्र शासन मुंबई' असे स्वतः सेव्ह केले होते. त्यामुळे त्याने कोणालाही फोन केल्यास ट्रू कॉलरवर मुख्यमंत्री कार्यालयातून फोन आला असे वाटत होते.

अशी लढविली शक्कल

ही बेमालूमपणे फसवणूक करण्यासाठी त्याने आपल्या 'व्हॉटसअप डीपी'वर महाराष्ट्र सरकारचे (State Government) बोधचिन्ह ठेवले होते. त्याखाली 'सीएमओ ऑफिस' अशी प्रोफाईल बनवली होती. एवढेच नाही, तर 'सीएमओ-पीआरओ-एकनाथ शिंदे-मंत्रालय-मुंबई' असा मजकूर ठेवला होता. त्याखाली मंत्रालयाचे गूगल लोकेशन ठेवून त्याने शंका घेण्यास जागाही ठेवली नव्हती. यासंदर्भात 'सीएमओ' कार्यालयातून लिपीकाने हिंजवडी पोलिसांत फिर्याद दिली आहे. त्यानुसार फसवणूक, बनावटगिरीचा गुन्हा पोलिसांनी दाखल केला.

असे फुटले पलांडेचं बिंग

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे खासगी सचिव आणि आयएएस अधिकारी बालाजी खतगावकर यांच्या कन्येचा विवाह पुण्यातील तारांकिंत हॉटेलात रविवारी (ता. २१) पार पडला. त्यावेळी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यासह आजी-माजी मंत्री, नेते आणि सनदी अधिकारी उपस्थित होते.

यावेळी मुख्यमंत्री कार्यालयातील अधिकारी आणि शिक्षण संस्थाचे विश्वस्तांच्या भेटीत पलांडेंने केलेल्या फोन आणि प्रवेशाचा विषय निघाला. त्यावेळी आम्ही कोणीही असा फोन केला नसल्याचे 'सीएमओ'तील अधिकाऱ्यांनी सांगितले. त्यानंतर दुसऱ्या दिवशी मंत्रालयात जाऊन तशी खात्री पुन्हा करण्यात आली. त्यानंतर 'सीएमओ'च्या नावाचा गैरवापर करून फसवणूक झाल्याचे लक्षात आहेल. त्यानंतर पोलिसांत तक्रार देण्यात आली.

(Edited by Sunil Dhumal)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT