Pune Congress Sarkarnama
पुणे

Pune Congress: काँग्रेसच्या 'जम्बो' कार्यकारिणीत 'या' 8 नेत्यांना डावललं; पुण्यात नाराजीचे फटाके फुटणार

Congress News : अखिल भारतीय काँग्रेसने हर्षवर्धन सपकाळ यांच्या नेतृत्वाखाली 264 नेत्यांची जम्बो कार्यकारिणी नियुक्त केली आहे. यात 87 सदस्यांची कार्यकारी समिती आणि 36 जणांची राजकीय कामकाज समिती आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका हाताळणार आहे.

Sudesh Mitkar

थोडक्यात बातमी:

  1. पुण्यातील काँग्रेसमध्ये नवा नाराजीचा सूर: काँग्रेसच्या नव्या जम्बो कार्यकारिणीत पुण्यातील आठ प्रमुख नेत्यांना डावलल्यामुळे पक्षांतर्गत असंतोष पुन्हा उफाळण्याची शक्यता.

  2. जुन्याच नेत्यांना प्राधान्य, तरुणांची निराशा: अपेक्षेप्रमाणे संघटनेत बदल न होता पुन्हा जुन्याच चेहऱ्यांना संधी दिल्याने अनेक तरुण आणि सक्रिय कार्यकर्त्यांचा हिरमोड झाला.

  3. महापालिका निवडणुकीत काँग्रेससाठी डोकेदुखी: नाराज नेते आगामी महापालिका निवडणुकीपूर्वी काय भूमिका घेतील यावर काँग्रेसच्या रणनीतीचा मोठा परिणाम होण्याची शक्यता.

Pune News: पुणे काँग्रेसमधील नाराजीचा दुसरा अंक आता सुरू होण्याची शक्यता आहे. गेल्या काही दिवसांपासून शहराध्यक्ष बदलावरून गटबाजीचे राजकारण पाहायला मिळालं. मात्र, कुठेतरी हा विषय मागे पडत असतानाच नव्याने जाहीर करण्यात आलेल्या राज्याच्या कार्यकारिणीमधून पुण्यातील आठ नेत्यांना डावलण्यात आलं आहे.

तसेच अनेकांना काँग्रेसच्या (Congress) या कार्यकारिणीमध्ये आपल्याला संधी मिळेल अशी अपेक्षा होती. मात्र, तसं न होता. जुन्याच नेतृत्वाला पुन्हा एकदा कार्यकारिणीमध्ये पुण्यातून संधी देण्यात आली आहे. त्यामुळे डावललेले आणि संधी न मिळालेल्या नेत्यांमध्ये मोठ्या प्रमाणात नाराजी आहे आणि ही नाराजी आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आणखी वाढण्याची शक्यता आहे.

विधानसभा निवडणुकीमध्ये काँग्रेसला मोठा पराभव स्वीकारावा लागला. यानंतर पक्षांमध्ये संघटनात्मक मोठ्या प्रमाणात बदल होतील अशी अपेक्षा काँग्रेस कार्यकर्त्यांना होती. त्यामुळे सर्वांनाच नवे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ जाहीर करणारी कार्यकारिणी कशी असेल याबाबत उत्सुकता होती. मात्र, नव्याने जाहीर झालेल्या कार्यकारिणीमध्ये बहुतांश जुने चेहरे पाहायला मिळत आहेत. त्यामुळे संधीचे असं लावून बसलेल्या तरुण कार्यकर्त्यांचा हिरमोड झाला आहे.

अखिल भारतीय काँग्रेसने हर्षवर्धन सपकाळ यांच्या नेतृत्वाखाली 264 नेत्यांची जम्बो कार्यकारिणी नियुक्त केली आहे. यात 87 सदस्यांची कार्यकारी समिती आणि 36 जणांची राजकीय कामकाज समिती आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका हाताळेल. पुण्यातील अॅड. अभय छाजेड यांच्याकडे खजिनदारपदाची जबाबदारी सोपवली असून, पुणे (Pune) आणि पिंपरी-चिंचवडमधून 15 जणांना कार्यकारिणीत स्थान मिळाले आहे.

माजी मंत्री, माजी आमदारांसह वरिष्ठ नेत्यांना कार्यकारिणीत स्थान देण्यात आले आहे. माजी आमदार उल्हास पवार आणि बाळासाहेब शिवरकर यांना कार्यकारी समितीत, तर माजी आमदार मोहन जोशी आणि रमेश बागवे यांना वरिष्ठ उपाध्यक्षपदी नियुक्ती मिळाली आहे. कार्यकारिणीत एक खजिनदार, 16 वरिष्ठ उपाध्यक्ष, 38 उपाध्यक्ष, 5 प्रवक्ते, 108 सरचिटणीस, 95 चिटणीस आणि एक माध्यम समन्वयक यांचा समावेश आहे.

असं असलं तरी पुणे शहराचा विचार केल्यास शहरातील तब्बल आठ नेत्यांना काँग्रेसने या कार्यकारणी मध्ये संधी दिली नसल्याचं पाहायला मिळत आहे. माजी प्रदेश सरचिटणीस रोहित टिळक, माजी नगरसेवक वीरेंद्र किराड, अजित आपटे, रफिक शेख, मुख्तार शेख, तसेच पूर्व प्रांतिक प्रतिनिधी रमेश अय्यर, चंदू कदम आणि राजेंद्र शिरसाठ यांना कार्यकारिणीत स्थान देण्यात आलेले नाही. त्यामुळे हे नेते नाराज असल्याचं सांगितलं जात आहे. त्यामुळे काँग्रेसचे डोकेदुखी वाढण्याची शक्यता असून आगामी काळात हे नेते काय भूमिका घेणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

  1. काँग्रेसच्या नवीन कार्यकारिणीत कोण नाराज आहे?
    पुण्यातील आठ प्रमुख नेत्यांना डावलल्यामुळे ते पक्षावर नाराज असल्याचं सांगितलं जात आहे.

  2. नवीन कार्यकारिणीत कोणत्या नेत्यांना संधी मिळाली?
    उल्हास पवार, बाळासाहेब शिवरकर, मोहन जोशी आणि रमेश बागवे यांसारख्या ज्येष्ठ नेत्यांना स्थान मिळाले आहे.

  3. या निर्णयाचा महापालिका निवडणुकीवर काय परिणाम होऊ शकतो?
    नाराज नेते वेगळी भूमिका घेतल्यास काँग्रेससाठी ही निवडणूक अधिक कठीण होऊ शकते.

  4. कार्यकर्त्यांची काय अपेक्षा होती?
    पक्षाच्या पराभवानंतर संघटनेत नवे चेहरे दिसतील अशी कार्यकर्त्यांना अपेक्षा होती, पण ती पूर्ण झाली नाही.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT