sanjay raut (1).jpg sarkarnama
पुणे

Video Sanjay Raut : विधानसभेच्या विजयाची 'टॅगलाईन'च संजय राऊतांनी 'कॉन्फिडन्स'मध्ये टाकली सांगून

Akshay Sabale

Shivsankalp Melava In Pune : आगामी विधानसभेच्या दृष्टीनं शिवसेनेचा ( ठाकरे गट ) 'शिवसंकल्प' मेळावा पुण्यात पार पडला. एकअर्थानं नेते, कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांना 'चार्ज' करण्याचा कामं या मेळाव्याच्या माध्यमातून करण्यात आलं आहे. यावेळी शिवसेना ( ठाकरे गट ) खासदार संजय राऊत यांनी विधानसभेला शिवसेनेच्या विजयाची टॅगलाईन आणि लढण्याची ताकद सांगितली आहे.

"'एकतर तू राहशील किंवा मी राहिन, हा उद्धव ठाकरे यांचा शब्द आपल्या विधानसभेतील विजयाचा मंत्र आहे," असं राऊतांनी म्हटलं आहे.

संजय राऊत ( Sanjay Raut ) म्हणाले, "उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली आपण लढत असलेली लढाई सोप्पी नाही. 'एकतर तू राहशील किंवा मी राहीन,' हा शब्द थेट माझ्या काळजात गेला आहे. हीच निवडणूक जिंकण्याची आपली टॅगलाईन आहे. आपल्या नेत्याच्या तोंडातून निघालेला विजयाचा मंत्र, लढण्याची ताकद आणि तलवार आहे. उद्याच्या निवडणूक जिंकून महाराष्ट्र काबीज करायचा असेल, तर एकतर तू राहशील किंवा मी राहीन या जिद्दीनं मैदानात उतरलं पाहिजे. तू जाशील आणि मीच राहिन, ही जिद्द असली पाहिजे."

"उद्धव ठाकरेंचा हसरा चेहरा काही लोकांच्या जळण्याचं कारण आहे. संकटामागून संकटे येत आहेत. कोंडी केली जात आहे. पण, आमचा नेता हसत, हसत प्रत्येक संकटाला तोंड देत आम्हाला लढण्याची प्रेरणा देत आहे. त्यामुळे समोर सुरू असलेला जळफळाट उद्धव ठाकरेंच्या हसण्यामुळे सुरू आहे," असा टोला राऊतांनी महायुतीला लगावला आहे.

"पुणे जिल्ह्यातील प्रत्येक जागा लढण्याची ताकद शिवसेनेत आहे. गेल्या 25 वर्षांत कधी ना कधी या जागांवर शिवसेनेचा आमदार निवडून आला आहे. शिवसेनेनं दुसऱ्यांच्या पालख्या भरपूर वाहिल्या आहेत. भाजपचे आमदार निवडून आणले. कसब्याच्या निवडणुकीत शिवसैनिकांनी कष्ट करून काँग्रेसचा आमदार निवडून आणला. बारामतीत सुप्रिया सुळे यांच्या विजयासाठी शिवसैनिकांनी रान पेटवलं. पुण्यात लोकसभा निवडणुकीत शिवसैनिकांनी प्रचंड काम केलं. पण, विधानसभेला शिवसैनिकांनी स्वत:कडे पाहिलं पाहिजे. आपण महाविकास आघाडीत असलो, तरी पहिली पसंती शिवसेना आणि उद्धव ठाकरेंना पाहिजे," असं आवाहन राऊतांनी केलं आहे.

"उद्धव ठाकरेंनी 'एकतर तू राहशील किंवा मी राहीन' हा मंत्र घेऊन आपल्याला पुढे जायचं आहे. तुम्हारे जैसे कुत्ते सिर्फ भोकते है, हम शेर है खुले आम ठोकते है," असा इशारा राऊतांनी देवेंद्र फडणवीसांना अप्रत्यक्षपणे दिला आहे.

"विधानसभा निवडणूक सोप्पी नाही. लोकसभा निवडणुका आपण ताकदीनं लढलो आणि जिंकलो. तरी शिवसेनेला अपेक्षित यश मिळालं नाही. नवीन पक्ष, नवीन चिन्ह, समोर पैशांची ताकद, दहशतवाद सगळ्या गोष्टींना पुरून उरलो आणि लढलो. विधानसभेची लढाई तुंबळ आणि आर-पारची होणार आहे. एकतर तू राहशील किंवा मी राहीन. यातील आपणच राहणार आहोत," असं राऊतांनी म्हटलं.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT