Eknath Shinde, Shivajirao Adhalrao Patil Sarkarnama
पुणे

Shivajirao Adhalrao Patil : आपले नेतृत्व आणि आपुलकी मला..! शिंदेंचा ताफा अचानक पोहोचला आढळरावांच्या घरी; पुण्यात राजकीय धमाका होणार?

Eknath Shinde latest news, Shivajirao Adhalrao Patil latest news : भीमाशंकर दौऱ्यावरून परतताना शिंदेंचा ताफा थेट आंबेगावकडे; शिवाजीराव आढळराव पुन्हा ‘स्वगृही’ परतणार का, यावर राजकीय वर्तुळात तर्कवितर्कांना ऊत.

Sudesh Mitkar

Pune News : भीमाशंकर दौऱ्यावरून परतताना शिंदेंचा ताफा थेट आंबेगावकडे; शिवाजीराव आढळराव पुन्हा ‘स्वगृही’ परतणार का, यावर राजकीय वर्तुळात तर्कवितर्कांना ऊतपुणे जिल्ह्याच्या राजकारणात कधी कोणता ट्विस्ट येईल, याचा नेम नसतो. त्यातच आता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या एका अनपेक्षित भेटीने राजकीय चर्चांना पुन्हा उधाण आले आहे.

भीमाशंकर दौऱ्यावर असलेल्या शिंदेंनी परतीच्या प्रवासात नियोजित कार्यक्रम नसतानाही थेट आंबेगावचा रस्ता धरत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या घरी भेट दिली. त्यामुळे आढळराव पुन्हा 'स्वगृही' परतणार का? अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.

एकनाथ शिंदे हे सोमवारी भीमाशंकर येथे आले होते. दौरा आटोपून परतत असताना त्यांनी अचानक आपला ताफा आंबेगावच्या दिशेने वळवला. त्यानंतर शिंदे थेट शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या निवासस्थानी पोहोचले. या अनपेक्षित भेटीमुळे पुणे जिल्ह्याच्या राजकारणात नव्या राजकीय समीकरणांची चर्चा सुरू झाली आहे.

या भेटीनंतर शिवाजीराव आढळराव पाटील यांनी सोशल मीडियावर केलेली पोस्टही लक्षवेधी ठरली आहे. 'क्षण आनंदाचा, क्षण जिव्हाळ्याचा!' असे म्हणत त्यांनी शिंदेंच्या भेटीबद्दल भावना व्यक्त केल्या. 'साहेब, आपल्या आमच्या गृही आगमन होणे हा आमच्या संपूर्ण कुटुंबासाठी अत्यंत आनंदाचा क्षण आहे. आपले नेतृत्व आणि आपुलकी मला सदैव ऊर्जा देत राहील,' असे आढळरावांनी म्हटले आहे.

आढळरावांच्या या वक्तव्यामुळे त्यांच्या राजकीय भूमिकेबाबत तर्कवितर्कांना आणखी उधाण आले आहे. विशेष म्हणजे, एकनाथ शिंदे आणि शिवाजीराव आढळराव पाटील यांचे राजकीय संबंध जुने आहेत. शिवसेनेत फूट पडल्यानंतर आढळरावांनी उद्धव ठाकरे यांची साथ सोडत एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत प्रवेश केला होता.

२०२४ च्या लोकसभा निवडणुकीत शिरूरची जागा राष्ट्रवादी काँग्रेसला मिळाल्यानंतर आढळरावांनी शिंदेंची साथ सोडली आणि अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. शिरूर लोकसभा मतदारसंघातून त्यांना उमेदवारी देण्यात आली. मात्र या निवडणुकीत शरद पवार गटाचे उमेदवार अमोल कोल्हे यांनी आढळरावांचा पराभव केला.

पराभवानंतर आढळराव काहीसे सक्रिय राजकारणापासून दूर असल्याचे चित्र होते. सध्या ते म्हाडाच्या अध्यक्षपदाची जबाबदारी सांभाळत आहेत. मात्र शिंदेंच्या अचानक झालेल्या भेटीमुळे आढळराव पुन्हा एकदा पुणे जिल्ह्याच्या राजकीय चर्चेच्या केंद्रस्थानी आले आहेत. दरम्यान, एकनाथ शिंदे सध्या शिवसेनेची संघटनात्मक ताकद वाढविण्यासाठी आक्रमकपणे काम करत आहेत. उद्धव ठाकरे गटाला धक्के देण्याची रणनीती सुरू असतानाच आता अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमधील एखादा मोठा चेहरा शिंदेंच्या संपर्कात आहे का, असा सवालही उपस्थित केला जात आहे.

आढळराव आणि शिंदे यांच्यातील ही भेट केवळ सदिच्छा भेट होती की त्यामागे आगामी राजकारणाची काही मोठी 'स्क्रिप्ट' आहे, हे येणाऱ्या काळात स्पष्ट होणार आहे. मात्र सध्या तरी शिंदेंची आढळरावांच्या घरी झालेली ही अचानक भेट पुण्याच्या राजकारणात चर्चेचा विषय ठरली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT