

UP Election 2027 : खासदार असदुद्दीन ओवेसी यांच्या AIMIM पक्षाला मोठा झटका बसला आहे. पक्षाच्या प्रमुख चेहऱ्यांपैकी एक असलेले आणि राष्ट्रीय प्रवक्ते म्हणून पक्षाची जोरदार बाजू मांडणार नेते असीम वकार यांनी बुधवारी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. असमी वकार हे उत्तर प्रदेशातील पक्षाचे प्रमुख नेते होते.
उत्तर प्रदेशात पुढील वर्षी विधानसभेची निवडणूक होणार आहे. या निवडणुकीत AIMIM हा पक्ष समाजवादी पार्टी आणि काँग्रेस आघाडीची डोकेदुखी वाढविण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. यापार्श्वभूमीवर काँग्रेसने ओवेसींच्या राज्यातील बड्या नेत्यालाच पक्षात आणले आहे. त्यामुळे काँग्रेसची राज्यातील ताकद वाढली आहे.
AIMIM कडून उत्तर प्रदेशात मागील काही वर्षांपासून विस्तारासाठी प्रयत्न केले जात आहेत. मागील विधानसभा निवडणुकीतही पक्षाने ताकद लावली होती. मात्र, अपेक्षित यश मिळाले नव्हते. यावेळीही ओवेसी यांनी भाजपसह समाजवादी व काँग्रेसविरोधात दंड थोपटले आहेत. यामध्ये असीम वकार यांची भूमिकाही महत्वाची मानली जात होती.
वकार यांच्या काँग्रेस प्रवेशाने ओवेसींच्या रणनीतीला फटका बसल्याची चर्चा आहे. वकार हे मागील दशकभरापासून त्यांत्यासोबत होते. तसेच समाजवादी पक्षातही त्यांनी तब्बल दोन दशके काम केले आहे. म्हणजे मागील तीन दशकांपासून ते उत्तर प्रदेशच्या राजकारणात पाय रोवून आहेत. त्यामुळे राज्याच्या अनेक भागात मुस्लिम समाजाशी त्यांचा चांगला कनेक्ट आहे.
काँग्रेसमध्ये प्रवेश करण्यामागची भूमिका स्पष्ट करताना वकार म्हणाले, विरोधक आपआपसांतच लढत राहिले तर त्याचा फायदा भाजपलाच होईल. विरोधकच एकमेकांविरोधात उभे ठाकले तर आपण एकप्रकारे भापलाच मदत करतोय. भाजपचे सरकार हटवायचे असेल तर विरोधी पक्षांनी भाजपविरोधात लढायला हवे. AIMIM पक्षाकडून विरोधकांवर टीका होत होती. त्याचा फायदा भाजपला होत होता.
वकार यांनी यावेळी काँग्रेस नेते राहुल गांधी यांचेही जोरदार कौतुक केले. दरम्यान, वकार यांना काँग्रेसमध्ये कोणते पद दिले जाणार याबाबतही उत्सुकता वाढली आहे. आगामी विधानसभा निवडणुकीमध्ये काँग्रेसला वकार यांचा निश्चितच फायदा होईल, अशी चर्चा आहे. AIMIM ने काही भागात आपली पकड निर्माण केली होती. ही मते काँग्रेसच्या बाजूने वळविण्याची जबाबदारी वकार यांच्यावर असणार आहे. त्याचा समाजवादी पक्षालाही फायदा होणार आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.