IAS Tukaram Mundhe Sarkarnama
पुणे

FDA recruitment : तुकाराम मुंढेंच्या विभागातील पदांच्या भरती परीक्षेत पेपरफुटीचा आरोप; MPSC ने दिला कडक इशारा

Tukaram Mundhe, paper leak, MPSC : औषध निरीक्षक भरतीत पेपरफुटीचे आरोप एमपीएससीने फेटाळले; अफवा पसरवणाऱ्यांविरुद्ध पोलिसांत तक्रार दाखल करण्याची तयारी.

सरकारनामा ब्यूरो

प्रज्वल रामटेके

Maharashtra Public Service Commission news : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (एमपीएससी) वतीने घेण्यात आलेल्या ‘औषध निरीक्षक’ (गट ब) पदाच्या भरती परीक्षेत पेपरफुटी आणि मोठा गैरव्यवहार झाल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे. ही पदे तुकाराम मुंढे आयुक्त अन्न औषध प्रशासन विभागातील आहेत. त्यामुळे या आरोपांनंतर आता चर्चांना उधाण आले आहे.

पेपरफुटीबाबत सोशल मीडियावर यासंदर्भातील दावे वेगाने व्हायरल होत असून, एमपीएससी आणि अन्न व औषध प्रशासनाकडे (एफडीए) याप्रकरणी अधिकृत तक्रारही दाखल करण्यात आली आहे. मात्र, ‘एमपीएससी’ने हे सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. तसेच, आयोगाची बदनामी करणाऱ्या आणि अफवा पसरविणाऱ्यांवर पोलिसांत रीतसर तक्रार दाखल करण्यात येईल, असा कडक इशाराही एमपीएससीने दिला आहे.

सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या एका व्हिडिओमध्ये परीक्षेच्या दोन दिवस आधी, म्हणजेच २० मार्च रोजीच प्रश्नपत्रिका व्हॉट्सॲपवर उपलब्ध झाली होती, असा आरोप करण्यात आला आहे. याशिवाय, गुणवत्ता यादीतील काही उमेदवारांचे गुण संशयास्पद असल्याचा दावा करण्यात आला आहे. कट-ऑफपेक्षा कमी गुण मिळालेल्या काही उमेदवारांनाही मुलाखतीसाठी बोलावण्यात आल्याचा आरोप संबंधित व्यक्तीने केला आहे.

कथित गैरव्यवहाराबाबत एमपीएससी आणि अन्न व औषध प्रशासनाकडे अधिकृत तक्रार दाखल करण्यात आल्याचेही व्हिडिओमध्ये सांगण्यात आले आहे. दरम्यान, अन्न व औषध प्रशासनातील सूत्रांनी या संदर्भातील तक्रार प्राप्त झाल्याची पुष्टी केली आहे. तक्रारीतील मुद्द्यांची प्राथमिक पडताळणी करून संपूर्ण माहिती महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडे पाठविण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. तक्रारीतील बाबींमध्ये तथ्य आढळल्यास पुढील कायदेशीर कारवाईबाबत आयोगाला शिफारस करण्यात येणार असल्याची माहितीही सूत्रांनी दिली.

आयोगाची अधिकृत भूमिका...

औषध निरीक्षक पदाच्या परीक्षेचा पेपर फुटल्याची तक्रार आयोगाला प्राप्त झाली होती. मात्र, नंतर खुद्द तक्रारदारानेच (गौरव पाटील) ही केवळ चेष्टा असल्याचे आणि मूळ प्रश्नपत्रिका फुटली नसल्याचे ई-मेलद्वारे आयोगाला स्पष्ट केले. ऋषिकेश गांगर्डे या उमेदवाराला परीक्षेत अपयश आल्याने ही परीक्षा रद्द होऊन ती पुन्हा व्हावी, या स्वार्थी हेतूने त्याने जाणीवपूर्वक पेपरफुटीची अफवा पसरवल्याचे आयोगाच्या निदर्शनास आले आहे.

तसेच, इतर काही उमेदवारांनीही गांगर्डे याने त्यांच्या नावाचा परस्पर गैरवापर केल्याची तक्रार आयोगाकडे केली आहे. यावरून पेपरफुटीचे सर्व दावे खोटे आणि खोडसाळ असल्याचे निष्पन्न झाले आहे. आयोगाने या प्रकरणाची अत्यंत गंभीर दखल घेतली असून, प्राप्त झालेले सर्व पुरावे व ई-मेल्स एकत्र करून आता या संपूर्ण प्रकरणाची चौकशी पोलिसांकडे सोपवली आहे.

पोलिसांत तक्रार करणार

एमपीएससीचे सचिव महेंद्र हरपाळकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, आयोगाच्या परीक्षा प्रक्रियेच्या गुणवत्तेवर आणि विश्वासार्हतेवर संशय निर्माण करण्याचा किंवा अफवा पसरवण्याचा प्रयत्न खपवून घेतला जाणार नाही. आयोगाने या संपूर्ण प्रकरणाची अत्यंत गांभीर्याने दखल घेतली आहे. तक्रारदाराने सादर केलेले पुरावे, उमेदवारांचे स्पष्टीकरण, संभाषणाचे तपशील आणि या प्रकरणाशी संबंधित सर्व निवेदने एकत्रित करून, संभ्रम व अफवा पसरवणाऱ्यांविरुद्ध आयोग पोलिसांत रीतसर तक्रार दाखल करणार आहे.

फॉरेन्सिक तपासणी करावी

तक्रारदार विद्यार्थी ऋषिकेश गांगर्डे यांनी सांगितले की, एमपीएससी औषध निरीक्षक परीक्षेबाबत अनेक शंका आणि दावे समोर येत आहेत. आम्ही याप्रकरणी अन्न व औषध प्रशासन आणि ‘एमपीएससी’कडे रीतसर तक्रार नोंदवली आहे. या प्रकरणातील सर्व सत्य समोर येण्यासाठी संबंधित संशयित व्यक्तींच्या मोबाईलची तात्काळ फॉरेन्सिक तपासणी करण्यात यावी. त्यामुळे सर्व संभ्रम दूर होतील आणि सत्य समोर येईल.

अशी पार पडली परीक्षा प्रक्रिया :

पदे : औषध निरीक्षक गट ‘ब’ (अन्न व औषध प्रशासन) - १५४ पदे

चाळणी परीक्षा : २२ मार्च २०२६

निकाल : १२ जून २०२६

मुलाखती : १ ते २२ जुलै २०२६ (४८८ पात्र उमेदवारांच्या मुलाखती)

गुणवत्ता यादी : २२ जुलै २०२६ रोजी सायंकाळी सर्वसाधारण तात्पुरती गुणवत्ता यादी प्रसिद्ध

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT