SP. Tejaswi Satpute Sarkarnama
पुणे

SP Solapur : ‘एसपी’ सातपुतेंच्या ‘ऑपरेशन परिवर्तन’ला ‘फिक्की’चा पुरस्कार !

‘ऑपरेशन परिवर्तन’चा ‘सोलापूर पॅटर्न’ राज्यातील इतर जिल्ह्यांना मार्गदर्शक असून सर्व जिल्ह्यांनी हा उपक्रम राबवावा, असे आदेश पोलीस महासंचालक कार्यालयाने यापूर्वीच काढले आहेत.

सरकारनामा ब्यूरो

पुणे : हातभट्टीच्या गावठी दारूच्या उत्पादनासाठी भट्ट्या चालवून दारूची विक्री करणाऱ्या सोलापूर जिल्ह्यातील सहाशे कुटुंबांना या व्यवसायापासून परावृत्त करून त्यांचा मुख्य प्रवाहात आणण्यासाठी सोलापूर ग्रामीणच्या पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते (Tejaswi Satpute) यांनी राबविलेला आहे. ‘ऑपरेशन परिवर्तन’ या नावाने राबविलेल्या उपक्रमाला फेडरेशन ऑफ इंडियन चेंबर ऑफ कॉमर्स ॲण्ड इंडस्टीजचा (Fedeation of Indian Chambers of Commerce And Industry) ‘स्मार्ट पोलिसिंग’ पुरस्कार मिळाला आहे.

‘फिक्की’च्या नुकत्याच दिल्लीत झालेल्या वार्षिक समारंभात या पुरस्कारांचे वितरण झाले.या संदर्भात संपर्क साधला असता अधीक्षक सातपुते म्हणाल्या, ‘‘ पुरस्कार मिळाल्यानंतर आनंद होणे स्वाभाविक आहे. मात्र, आम्ही हाती घेतलेल्या कामाच्या पातळीवर विचार केला तर आता एका पडावापर्यंत पोचलो आहे. आणखी खूप काम बाकी आहे. हा पुरस्कार माझ्या एकट्याचे यश नाही. तर सोलापूर ग्रामीण पोलिसांनी एकत्रितपणे केलेल्या कामाची पावती आहे. दारूच्या या बेकायदा व्यवसायातून बाहेर पडलेल्या कुटुंबांना कायमस्वरूपी रोजगार मिळणे आवश्‍यक आहे. त्यासाठी त्यांच्या उत्पादनाला कायमस्वरूपी बाजारपेठ मिळवून देण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.’’

या उपक्रमामुळे जे हात वर्षानुवर्षे हातभट्टीची दारू तयार करून विकण्यात गुंतलेले होते. त्यांच्या हातांनी तयार झालेले ‘ब्रँडेड शर्ट’ तयार झाले. वस्त्रोद्योग क्षेत्रातील ‘ॲपेक्स गारमेन्टस’ या कंपनीच्या सहकार्याने या शर्टच्या उत्पादनाला परदेशी बाजारपेठ मिळाली आहे.नुकतेच सोलापूर येथे या तयार कपड्यांचे प्रदर्शन भरविण्यात आले. या प्रदर्शनाला चांगला प्रतिसाद मिळाला, असे अधीक्षक सातपुते यांनी सांगितले.

जिल्ह्यात हातभट्टीच्या दारूची निर्मितीत अडकलेल्या कुटुंबाना यातून बाहेर काढून त्यांना स्वयंरोजगाराच्या नव्या संधी उपलब्ध करून देणे हा या उपक्रमाचा गाभा आहे. या विषयी अधीक्षक सातपुते म्हणाल्या, ‘‘ सोलापूर जिल्ह्यात काम करण्यास सुरवात केल्यानंतर जिल्ह्याच्या काही भागात सुरू असलेल्या हातभट्टीच्या दारूची माहिती घेतली.त्यातून ‘ऑपरेशन परिवर्तन’ची कल्पना सुचली. तातडीचे कामाला सुरवात झाली. केवळ छापेमारी करणे हा ‘ऑपरेशन परिवर्तन’चा उद्देश नव्हता. छापेमारी, जागृती, समुपदेशन व पूनर्वसन या चतु:सूत्रीच्या आधारे कामाला सुरवात केली.’’

छापेमारी, जागृती, समुपदेशन व पूनर्वसन या चतु:सूत्रीच्या आधारे काम करीत असताना मुळेगाव तांडा येथील दारू तयार करण्याच्या कामात प्रत्यक्ष सहभागी असलेल्या महिलांना दारूचे पुष्परिणाम, या व्यवसायामुळे होणार त्रास आणि कायदेशीर कारवाई याबाबत समुपदेशन केले. त्यातून या जवळपास शंभर महिला दारू तयार करण्याचा व तो विकण्याचा व्यवसाय सोडण्यास तयार झाल्या. या महिला आता कपडे शिवण्याच्या कलेत निपुण झाल्या असून तोच त्यांच्या उदरनिर्वाहाचा मोठा स्त्रोत ठरू लागला आहे, असे सातपुते यांनी सांगितले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT