Pune Crime Sarkarnama
पुणे

‘सीआयडी’ मालिका पाहून पंधरा वर्षीय मुलांनी केला वृद्धेचा खून

सोनवणे यांच्याकडे कायम खूप पैसे असतात व ते पैसे कोठे ठेवतात याबाबतची माहिती मुलांना होती.

सरकारनामा ब्यूरो

पुणे : अनुक्रमे १४ व १६ वर्षाच्या दोन मुलांनी दोन महिन्यांपूर्वी ‘सीआयडी’ ही मालिका पाहिली. त्यानुसार चोरी करण्याचा प्लॅन करून आपल्याच भागात एकट्या राहणाऱ्या वृद्ध महिलेचा खून केला.या महिलेल्या घरातील पैसे व सोने मिळून एक लाख ६० हजार रूपयांचा ऐवज चोरला.पुण्यातील सिंहगड रस्त्यावर तीन दिवसांपूर्वी घडलेल्या या घटनेचा छडा पोलिासांनी लावल्यानंतर ही धक्कादायक बाब पुढे आली आहे.

पोलिसांनी या दोन्ही अल्पवयीन मुलांना ताब्यात घेतले आहे. अल्पवयीन आरोपींनी सुमारे दोन महिन्यापूर्वीच सीआयडी मालिका पाहून चोरी करण्याचा कट रचला होता. त्यानुसार त्यांनी सोनवणे यांच्या घराची चावी चोरली होती.मात्र, त्या वयस्कर असल्याने त्या घर सोडून कोठेही जात नव्हत्या. त्यामुळे त्यांना चोरी करता येत नव्हती. त्यानंतर त्यांनी सोनवणे एकट्या असताना घरात जाऊन चोरी करण्याचा प्लॅन केला. सोनवणे यांनी विरोध केला तर त्यांना मारण्याचीही तयारी त्यांनी केली होती. आपल्या हाताचे ठसे कोठे उमटू नये याकरिता आरोपींनी हॅण्डग्लोजचा वापर केला होता.

शालिनी बबन सोनवणे (वय ७०, रा. सायली हाईटस फ्लॅट नं.०७, हिंगणे खुर्द) असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ३० ऑॅक्टोंबर रोजी पोलीस नियंत्रण कक्षास हिंगणे खुर्द येथे चोरी झाली असून घरामध्ये वयस्कर महिला जखमी व बेशुद्ध अवस्थेत असल्याचा फोन आला. खबर मिळाल्याने सिंहगड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक देविदास घेवारे, पोलीस निरीक्षक (गुन्हे) प्रमोद वाघमारे व तपास पथकाच्या टीमने घटनास्थळावर जाऊन पाहणी केली.

तपासात घटनास्थळावर कोणताही ‘सीसीटीव्ही’ कॅमेरा तसेच प्रत्यक्षदर्शी साक्षीदार नसल्याने घटनेचा वेगवेगळ्या दृष्टिकोनातून तपास सुरू होता. मंगळवारी (ता. २) तपास पथकाचे पोलिस अंमलदार उज्ज्वल मोकाशी यांना घटनास्थळाच्या जवळील रोकडोबा मंदिराजवळ लहान मुलांकडून माहिती मिळाली की, घटनेच्या दिवशी दुपारी पाणी पुरी खायला जाताना त्याचे दोन मित्र पाणीपुरी न खाताच परत गडबडीने घरी आले होते.

या मुलांची घाई गडबडीत कुठेतरी जात असल्याचे ‘सीसीटीव्ही’ फुटेज मिळाले होते. त्यामुळे त्या दोन मुलांवर संशय बळावल्याने त्यांच्याकडे विचारपूस करण्यात आली. मात्र, मुले न गडबडता व चेह-यावरती कोणताही हावभाव न दाखवता उडवा-उडवीची उत्तरे देत होती. त्या मुलांबाबत अधिक माहिती घेतली असता त्यातील एकास स्वत:च्या घरामध्ये चोरी करण्याची सवय असल्याबाबत माहिती समोर आली. त्यानंतर मुलांकडे अधिक विचारपूस केली असता त्यांनी गुन्हा केल्याचे कबूल दिली.

असा केला खून

सोनवणे यांच्याकडे कायम खूप पैसे असतात व ते पैसे कोठे ठेवतात याबाबतची माहिती मुलांना होती. घटनेच्या दिवशी सोनवणे या घरामध्ये एकट्या असल्याची खात्री करून मुले घरात गेले. त्यावेळी सोनवणे या टीव्ही पाहत होत्या. त्यामुळे मुलेही टीव्ही पाहू लागले. त्यानंतर सोनवणे यांचे लक्ष नसताना त्यांना पाठीमागून ढकलून देवून त्याचे तोंड व नाक दाबून खून केला.

Edited By : Umesh Ghongade

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT