सरकारनामा ब्यूरो
पुणे : स्थायी समितीच्या बैठकीत पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या (पीएमपी) कर्मचाऱ्यांना बोनस देण्याचा अस्पष्ट ठराव मंजूर केल्याने गेल्या आठवड्याभरात कर्मचाऱ्यांच्या बँक खात्यात बोनस जमा होऊ शकला नाही. त्यावर तोडगा काढत आता ‘पीएमपी’ला पुढच्या वर्षी देण्यात येणाऱ्या संचलनातील तुटीच्या रकमेतून २४ कोटी रुपये उचल दिली जाणार असून त्यातून बोनस देण्याचा निर्णय उद्याच्या स्थायी समितीच्या बैठकीत होण्याची शक्यता आहे.
महापालिकेचे सर्व कर्मचारी, अधिकारी, शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी यांचा दरवर्षी प्रमाणे बोनस दिला आहे. पीएमपीच्या कर्मचाऱ्यांना देखील बोनस दिला जातो, पण यंदा प्रशासनाकडून प्रस्ताव न आल्याने स्थायी समितीच्या बैठकीत भाजपच्या नगरसेवकांनी पीएमपी कर्मचाऱ्यांच्या बोनससाठी २४ कोटी रुपये द्यावेत असा निर्णय घेतला.
हा निर्णय अर्धवट असल्याने नेमके २४ कोटी रुपये कुठून उपलब्ध करायचे? कोणत्या तरतुदीतून द्यायचे? अशी त्रुटी प्रशासनाने काढून या ठरावाची अंमलबजावणी न करण्याचा निर्णय घेतला. यामुळे पीएमपीच्या कर्मचाऱ्यांनी महापालिकेतील पदाधिकारी, अधिकाऱ्यांकडे जाऊन पाठपुरावा सुरू केला. त्यानंतर महापालिका स्तरावर चर्चा होऊन प्रशासनाने बोनस देण्यासाठी प्रस्ताव स्थायी समितीपुढे ठेवण्याची तयारी दाखवली आहे.
पीएमपी कर्मचारी आणि प्रशासनासोबत चर्चा करण्यात आली आहे. दरवर्षी पासेसच्या रकमेतून पीएमपी कर्मचाऱ्यांना बोनस दिला जातो, पीएमपी बस बंद असल्याने पासेसचे पैसे महापालिका देणे लागत नाही. महापालिका पीएमपीला दरवर्षी संचलनातील तूटीपोटी रक्कम देते. त्या रकमेतून २४ कोटी रुपये उचल म्हणून बोनससाठी दिले जातील, ही रक्कम पुढील वर्षाच्या रक्कमेतून कपात करून घेतली जाईल. उद्या स्थायी समितीमध्ये हा निर्णय होतीच लगेच कर्मचाऱ्यांच्या बँक खात्यात पैसे जमा होतील, असे स्थायी समिती अध्यक्ष हेमंत रासने यांनी सांगितले.
Edited By : Umesh Ghongade
---
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.