Shirur, 23 March : शिरूर तालुका खरेदी विक्री संघाच्या निवडणुकीत दिसलेली टशन पदाधिकारी निवडीच्या वेळीही होईल, असे चित्र असतानाच राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे माजी आमदार ॲड अशोक पवार यांनी अचानकपणे निवडणुकीतून माघार घेत असल्याचे जाहीर केले आहे. पवारांच्या माघारनाट्यामुळे पदाधिकारी निवडीतील चुरस संपली असून कसलेले राजकारणी असलेल्या अशोकबापूंना पदाधिकारी निवडीतून माघार का घ्यावी लागली, तो डाव कोणी टाकला की त्यांना पराभवाची भीती होती की पुन्हा स्वकीयांनी घात केला, याची चर्चा राजकीय वर्तुळात चवीने चर्चिली जात आहे.
खरेदी विक्री संघाच्या सतरापैकी 12 जागा बिनविरोध झाल्या होत्या. त्यातील दहा जागा ह्या उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील आमदार ज्ञानेश्वर कटके गटाच्या, तर दोन जागा अशोक पवार (Ashok Pawar) गटाच्या होत्या. मात्र, निवडणूक झालेल्या पाचही जागा अशोक पवार यांच्या गटाने जिंकल्या होत्या. त्यामुळे खरेदी विक्री संघात आमदार कटके यांच्याकडे दहा, तर पवार यांच्याकडे सात संचालक झाले होते.
आमदार ज्ञानेश्वर कटके (Dnyaneshwar Katke) यांच्या गटातील काही संचालक हे पूर्वाश्रमीचे अशोक पवार समर्थक आहेत, त्यामुळे पदाधिकारी निवडीत चमत्कार होण्याची चर्चा सुरू होती. मात्र, पवारांनी निवडणुकीतून माघार घेतल्याने सर्वचजण बुचकळ्यात पडले आहेत. राजकीय डावपेचात माहीर असलेल्या अशोक पवारांच्या माघारीमागे मोठी खेळी झाल्याची चर्चा आहे. पवारांचे काही समर्थक सत्ताधाऱ्यांच्या गळाला लागल्याची चर्चा असून त्यातूनच अशोक पवारांना माघार घ्यावी लागली असावी, अशीही चर्चा दबक्या आवाजात सुरू आहे.
खरं तर विधानसभा निवडणुकीतील पराभवानंतर प्रथमच होत असलेल्या खरेदी विक्री संघाच्या निवडणुकीत अशोक पवार यांनी जोरदार लढत दिली होती. पाच जागा जिंकून त्यांनी ते दाखवूनही दिले होते. मात्र, सातच संचालक सोबत आहेत, विरोधकांकडे दहा संचालक आहेत, त्यामुळे पदाधिकारी निवडीत पराभव होणार हे गृहीत धरून पवारांनी माघार घेतली की आपल्याच शिलेदारांकडून विधानसभा निवडणुकीत घात झाला होता. तशाच घाताचा आघात पुन्हा नको म्हणूनही तलवार म्यान केल्याची खमंग चर्चा शिरूर तालुक्यात सुरू आहे.
ॲड. अशोक पवार यांनी आपल्या रणनीतीच्या जोरावर माजी आमदार (स्व.) बाबूराव पाचर्णे यांच्यासारख्या नेत्याला पहिल्या वेळी अगदी काही दिवसांत पराभूत केले होते. दोनवेळा ते विधानसभेत गेले. मात्र, नवख्या असलेल्या ज्ञानेश्वर कटके यांनी विधानसभा निवडणुकीत आणि त्यानंतर खरेदी विक्री संघाच्या निवडणुकीत दिलेली धोबीपछाड तसेच पदाधिकारी निवडीतील माघारीबाबत आश्यर्च व्यक्त होत आहे.
शिरूर खरेदी-विक्री संघाच्या पदाधिकारी निवडणुकीतून माघारीचा निर्णय घेणारे माजी आमदार ॲड अशोक पवार म्हणाले, सहकाराच्या निवडणुकीत पक्षीय राजकारण आणू नये, अशी शिकवण आम्हाला माजी आमदार रावसाहेबदादा पवार यांनी दिली आहे. त्या विचारानेच आम्ही खरेदी विक्री संघाच्या निवडणुकीला सामोरे गेलो. खरेदी-विक्री संघाच्या निवडणुकीत निवडून आलेल्या अनेक संचालकांनी माझ्या राजकीय वाटचालीत सहकार्य केलेले आहे.
शिरूर खरेदी-विक्री संघाचे अध्यक्ष राजेंद्र नरवडे आणि त्यांच्या काही सहकाऱ्यांनी नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत माझे काम केलेले आहे. त्यामुळे सभापती आणि उपसभापती कोणीही झालं तरी मला आनंदच आहे. माझा कोणालाही विरोध नसल्याने मी या प्रक्रियेत लक्ष घालणार नाही. ज्यांना पदे मिळतील, त्यांना ती लखलाभ, अशी भावनाही त्यांनी व्यक्त केली.
Edited By : Vijay Dudhale
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.