Bala Bhegade
Bala Bhegade Sarkarnama
पुणे

मावळच्या लेकींसाठी बाळा भेगडेंचे परराष्ट्र मंत्र्यांकडे साकडे

उत्तम कुटे: सरकारनामा

पिंपरी : रशिया आणि युक्रेनमधील युद्धामुळे (russia ukraine war) हजारो भारतीय युक्रेनमध्ये अडकून पडले आहेत. त्यात महाराष्ट्रातील बाराशे विद्यार्थी आहेत. त्यापैकी २१९ जणांना विशेष विमानाने मुंबईत शनिवारी (ता.२६ फेब्रुवारी) आणण्यात आले. मात्र, मावळ (Maval) (जि.पुणे) तालुक्यातील लोणावळ्यातील दोन विद्यार्थिनी अद्याप युक्रेनमध्येच आहेत. त्यांच्या सुटकेसाठी माजी मंत्री बाळा ऊर्फ संजय भेगडे (Bala Bhegade) हे आता पुढे सरसावले आहेत. त्यांनी काल त्यासाठी परराष्ट्र व्यवहारमंत्री एस. जयशंकर (S.Jayshankar) आणि युक्रेनमधील भारतीय दुतावासातील अधिकारी संजय रावत यांनाच साकडे घातले आहे. दोघांशी ते फोनवरून बोलले. तसेच, आपल्या मतदारसंघातील मुलीच्या सुटकेसाठी पत्रही दिले.

लोणावळा येथील महेक प्रदीप गुप्ता आणि मोनिका मारुती दाभाडे अशी युक्रेनमध्ये अडकून पडलेल्या लोणावळ्यातील मुलींची नावे आहेत. त्याच नाही, तर महाराष्ट्रासह भारतातील बहूतांश विद्यार्थी हे युक्रेनमध्ये वैद्यकीय शिक्षणासाठी गेलेले आहेत. आपल्या देशाच्या तुलनेत परदेशात वैद्यकीय शिक्षणाची प्रवेशप्रक्रिया सुटसुटीत तसेच, त्यासाठी शुल्कही तुलनेने किमान असल्याने एमबीबीएस पदवीसाठी महाराष्ट्रच नाही, तर देशातील शेकडो मुले ही परदेशात जात आहेत. अशाच शिक्षणासाठी गेलेली व युक्रेनमध्ये अडकलेली रत्नागिरी येथील साक्षी प्रकाश नरोटे या मुलीचीही सुटका करण्याची विनंती भेगडे यांनी केली आहे. या मुलींचा पासपोर्ट क्रमांक, तेथील पत्ता आणि फोन नंबर आदी तपशीलही त्यांनी एस. जयशकर व रावत यांना दिला आहे.

महेक ही चिक्की व्यापाऱ्याची मुलगी आहे. तर, मोनिका हिचे वडिल चालक आहेत. भेगडे यांच्यासह महेकच्या सुटकेसाठी केंद्रीयमंत्री नितीन गडकरी यांनाही विनंती करण्यात आली आहे. तर, मोनिकाकरिता कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंनी प्रयत्न सुरु केले आहेत. त्यांचे पालक हे युद्ध सुरु झाल्यापासून मोठ्या चिंतेत आहेत. मोनिकाचे शिक्षण पूर्ण होण्यास फक्त दोनच महिने राहिले होते. त्यानंतर ती भारतातच परतणार होती, असे तिच्या वडिलांनी सांगितले.

दरम्यान, दोन दिवस बंकरमध्ये राहिल्यानंतर काल मोनिकाने धाडस केले. ती व इतर तिच्या चार-पाच मैत्रिणी टॅक्सी करून रेल्वे स्टेशनला गेल्या. तेथून त्या ट्रेनने युक्रेन व रुमानिया देशाच्या सीमेच्या दिशेने चालल्या आहेत. रुमानियातूनच काल भारताने खास विमान करून युक्रेनमध्ये अडकून पडलेल्या २१९ विद्यार्थी, विद्यार्थिंनींना भारतामध्ये मुंबईत आणले आहे. तेथूनच त्या मार्गानेच भारताची पुढील विमाने युक्रेनमध्ये अडकलेल्या आपल्या नागरिकांना घेऊन येणार आहेत.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT