Police logo Sarkarnama
पुणे

लाईक्स, फॉर्लाअर्सची नशा लय भारी; थेरगाव क्वीनला जेलची वारी!

सध्या सायबर गुन्ह्यांत (Cyber ​​Crime) मोठी वाढ झाली आहे.

सरकारनामा ब्यूरो

पिंपरी : सोशल मिडियाच्या (Social Media) वेडातून अधिक लाईक्स आणि फॉलोअर्स मिळविण्यासाठी सध्याची तरुण पिढी काय करेल, याचा नेम नाही. त्याचा प्रत्यय नुकताच पिंपरी-चिंचवडमध्ये (Pimpri-Chinchwad) आला. इन्स्टाग्रामवर थेरगाव क्वीन असलेल्या एका १८ वर्षीय कॉलेज तरुणीने तिचा मित्र व मैत्रिणीच्या मदतीने अश्लील व धमकीचे व्हिडिओ तयार करून ते व्हायरल केले. त्यातून इतर तरुण, तरुणींची मानसिक स्थिती बिघडण्याची व त्यांची नीती भ्रष्ट होण्याची भीती ध्यानात घेऊन वाकड पोलिसांनी या दोन्ही तरुणींविरुद्ध गुन्हा नोंदवून त्यांना अटक केली. त्यांच्या साथीदारांचा आता ते शोध घेत आहेत.

दरम्यान, कायद्याच्या अज्ञानातून केलेल्या या कृत्याचा पोलिसांनी (Police) पकडल्यानंतर या थेरगाव क्वीनला पश्चाताप झाला. तिने माफी मागितली. मात्र, तोपर्यंत उशीर झाला होता. पण, पोलिसांच्या कारवाईतून तिला चांगला धडा मिळाला. साक्षी हेमंत श्रीमल (वय १८, रा. पवारनगर, थेरगाव) असे या इन्स्टावरील थेरगाव क्वीनचे नाव आहे. ती बारावीत शिकत आहे. तिला आईवडिल नाहीत. त्यामुळे ती आज्जीकडे असते. तिची मानसिक स्थिती काहीशी ठीक नसल्यातून तिने अज्ञानातून हे धाडसवजा कृत्य केले, असे वाकड पोलिसांनी सांगितले. या गुन्ह्यातील तिच्या साथीदार मैत्रीणीचे नाव साक्षी राकेश कश्यप (वय १८, रा. लिंकरोड, पिंपरी) असे आहे. तर, कुणाल कांबळे या त्यांच्या गणेश पेठेतील साथीदार मित्र पोलिसांना सापडला नाही.

सध्या सायबर (Cyber ​​Crime) गुन्ह्यांत मोठी वाढ झाली आहे. त्यामुळे पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्त कृष्णप्रकाश यांनी सोशल मिडियावर वॉच ठेवण्यासाठी सोशल मिडिया सेल स्थापन केला आहे. त्यांना इन्टाग्रामवर काही अश्लील, धमकीचे आक्षेपार्ह व्हिडीओ अपलोड झाल्याचे दिसून आले. त्यामुळे समाजात चुकीचा संदेश जाण्याची शक्यता गृहित धरून वाकड पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक डॉ. विवेक मुगळीकर यांनी आपल्या डीबीच्या (गुन्हे शोध) पथकाला तातडीने कारवाईचा आदेश दिला.

त्यानुसार सहाय्यक पोलिस निरीक्षक अभिजित जाधव व पथकाने तांत्रिक माहितीच्या आधारे या दोघींचा छडा लावला. त्यांच्याविरुद्ध आयटी अॅक्ट आणि भादंविनुसार गुन्हा दाखल करून त्यांना अटक केली. त्यानंतरही या क्वीनचा पोलिस ठाण्यातही वावर बिनधास्त वावर दिसून आला. तिचे इन्स्टा अकाउंट आता पोलिसांनी बंद केले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT