Pune News, 25 Oct : कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ अर्थात गोकुळच्या निवडणुकीत काँग्रेस नेते सतेज पाटील यांच्या नेतृत्वाखालील आघाडीने १३ जागा जिंकत बहुमत मिळवले, तर विरोधी गटाला १२ जागांवर समाधान मानावे लागले. मात्र, निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर आता चेअरमनपदाची निवड बिनविरोध होणार की कोरमअभावी तांत्रिक पेच निर्माण होणार, याकडे सहकार क्षेत्राचे लक्ष लागले आहे.
या पार्श्वभूमीवर सतेज पाटील यांनी विरोधी गटातील १२ संचालकांना २९ ऑक्टोबरच्या बैठकीला उपस्थित राहून कोरम पूर्ण करण्याचे आवाहन केले आहे. त्याचबरोबर गोकुळमध्ये फोडाफोडीचे राजकारण होण्याची शक्यताही त्यांनी फेटाळली. पुण्यात माध्यमांशी संवाद साधताना सतेज पाटील यांनी गोकुळच्या निकालानंतरची भूमिका स्पष्ट केली. गोकुळचा निकाल लागलेला आहे. बहुमत आमचं आलेलं आहे. लोकांनी दिलेल्या मॅन्डेटचा आदर करून सर्वांनी बैठकीला उपस्थित राहावे. सहकारात एक आदर्श निर्माण करायचा असेल, तर तांत्रिक मुद्द्यांवर न जाता लोकशाहीने दिलेला कौल स्वीकारला पाहिजे, असे ते म्हणाले.
एक मताचं बहुमतही लोकशाहीत महत्त्वाचं!
बहुमताच्या मुद्द्यावर बोलताना सतेज पाटील यांनी माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या सरकारचा दाखला दिला. वाजपेयींचं सरकार एक मताने पडलं म्हणजे पडलं. एक मताने बहुमत मिळालं किंवा गेलं, तरी लोकशाहीत त्याला महत्त्व असतं. त्यामुळे १३ संचालकांच्या माध्यमातून मिळालेल्या बहुमताचा आदर झाला पाहिजे, असे त्यांनी स्पष्ट केले.
गोकुळच्या २९ ऑक्टोबरच्या बैठकीला विरोधी गटातील सर्व संचालक उपस्थित राहतील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. सहकार क्षेत्रात काम करणारे मंत्री हसन मुश्रीफ आणि आमदार विनय कोरे यांच्यासारख्या नेत्यांना या प्रकरणाचे महत्त्व माहीत आहे. त्यामुळे ते सहकारातील परंपरा आणि संस्थेचे हित लक्षात घेऊन योग्य भूमिका घेतील, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
चोयेकरांच्या मुलाच्या चेअरमनपदाचा मुद्दा
गोकुळचे ज्येष्ठ नेते आनंदराव पाटील चोयेकर यांनी संस्था वाढवण्यासाठी मोठे योगदान दिले. त्यांच्या मुलाची चेअरमनपदी निवड होत असताना विरोधी गटातील संचालक अडथळा निर्माण करतील, असे आपल्याला वाटत नसल्याचे सतेज पाटील यांनी सांगितले. आनंदराव पाटील चोयेकर यांनी संस्था मोठी केली. त्यांचा मुलगा चेअरमन होत असताना विरोधी संचालक बाजूला जातील, असे मला वाटत नाही. सर्वांनी एकत्र येऊन गोकुळचा कारभार करावा असे ते म्हणाले.
कोरम न झाल्यास काय होणार?
चेअरमन निवडीच्या बैठकीला आवश्यक कोरम पूर्ण झाला नाही, तर निवडीच्या प्रक्रियेत तांत्रिक अडचणी निर्माण होण्याची शक्यता आहे. अशा परिस्थितीत पुढे कोणती कायदेशीर प्रक्रिया अवलंबली जाईल, हे संबंधित नियम आणि परिस्थितीनुसार ठरेल, असे पाटील यांनी स्पष्ट केले.
तांत्रिक अडचणी निर्माण झाल्या, तर त्यासाठी कायदेशीर प्रक्रिया आहे. मात्र, गोकुळला पुन्हा निवडणुकीला सामोरे जावे लागू नये, एवढीच अपेक्षा आहे असे ते म्हणाले. गोकुळशी संबंधित सुमारे ५,४०० संस्था आणि साडेपाच लाख दूध उत्पादक शेतकऱ्यांचे हित महत्त्वाचे आहे. त्यामुळे चेअरमनपदाच्या निवडीवरून वाद निर्माण होण्याऐवजी सर्व २५ संचालकांनी एकत्रितपणे काम करावे, अशी भूमिका त्यांनी मांडली.
फोडाफोडी होणार? सतेज पाटील म्हणाले...
१३ विरुद्ध १२ अशा अत्यंत कमी फरकाने झालेल्या निवडणुकीनंतर विरोधी गटातील संचालकांना आपल्या बाजूने वळवण्याचे राजकारण होणार का, असा प्रश्न उपस्थित होत आहे. मात्र, सतेज पाटील यांनी ही शक्यता फेटाळली. इतक्या मोठ्या प्रमाणावर चुरशीची निवडणूक झाल्यानंतर कोण इकडचे तिकडे जाईल, असे मला वाटत नाही. फोडाफोडीचे राजकारण होईल, असेही वाटत नाही, असे त्यांनी स्पष्ट केले.
आता लक्ष २९ ऑक्टोबरच्या बैठकीकडे
गोकुळच्या निवडणुकीत बहुमत मिळाल्यानंतरही चेअरमनपदाच्या निवडीसाठी सर्व संचालकांची उपस्थिती महत्त्वाची ठरणार आहे. विरोधी गटाचे १२ संचालक बैठकीला उपस्थित राहून कोरम पूर्ण करतात का, निवड प्रक्रिया सुरळीत पार पडते का आणि नव्या संचालक मंडळात एकमताने कारभार सुरू होतो का, यावर पुढील राजकारणाची दिशा अवलंबून असेल. त्यामुळे २९ ऑक्टोबरची बैठक गोकुळच्या सत्तास्थापनेच्या दृष्टीने महत्त्वाची ठरणार आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.