

Former CJI Dhananjay Chandrachud news : सुप्रीम कोर्टाचे निवृ्त्त सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांच्याबाबत माजी न्यायमूर्ती संजय किशन कौल यांनी धक्कादायक खुलासा केला आहे. माजी सीजेआय चंद्रचूड हे सुप्रीम कोर्टाच्या कॉलेजियमने न्यायाधीश नियुक्तीसाठी प्रस्तावित केलेल्या नावांवर चर्चा करण्यापूर्वीच काही नावांबाबत केंद्र सरकारसोबत चर्चा करत असत, असा दावा माजी न्यायमूर्ती कौल यांनी केल्याने खळबळ उडाली आहे.
सुप्रीम कोर्टाचे माजी न्यायमूर्ती कौल यांचे 'Without Fear of Favour' हे पुस्तक लवकरच प्रकाशित होणार आहे. या पुस्तकाच्या निमित्ताने त्यांनी दिलेल्या एका मुलाखतीत माजी सीजेआय चंद्रचूड यांच्या कार्यकाळातील प्रामुख्याने न्यायाधीशांच्या नियुक्त्यांबाबत सरकारशी होत असलेल्या चर्चेबाबत धक्कादायक दावा केला आहे. त्यामुळे न्यायव्यवस्थेचे स्वातंत्र आणि न्यायाधीशांच्या नियुक्त्यांमध्ये सरकारच्या हस्तक्षेपाबाबत वाद निर्माण झाला आहे.
कौल यांनी मुलाखतीत म्हटले आहे की, न्यायाधीशांच्या नियुक्तीआधी सरकारशी चर्चा करण्याच्या प्रथेला न्यायमूर्तींनी विरोध केला होता. कारण ही एक प्रकारे सरकारकडे संमती मागण्यासारखेच होते, असे कौल यांनी सांगितले. कॉलेजियमच्या एका बैठकीतील प्रसंगही त्यांनी सांगितला आहे. या बैठकीवेळी एका नियुक्तीला विरोध केल्याने माजी सीजेआय चंद्रचूड आपल्याला बाजूला घेऊन गेले होते. संबंधित नियुक्तीबाबत सरकारचे मत जाणून घेण्यासाठी त्यांना दूरध्वनी करावा का, अशी विचारणा त्यांनी केली होता, असा दावा माजी न्यायमूर्ती कौल यांनी केला आहे.
कॉलेजियम नियुक्त्यांबाबत चर्चा करत असताना असे पाऊल उचलू नये, असे त्यावेळी सीजेआय चंद्रचूड यांना सांगितले होते. कॉलेजियमचे पाच नावांवर एकमत झाले होते. एका नावाला विरोध होता. मात्र, सीजेआय चंद्रचूड यांना सहावे नावही हवे होते. हे नाव बैठकीत शेवटच्या क्षणी पुढे आले होते. ते आपल्यासह कॉलेजियममधील इतर सदस्यांना मान्य नव्हते. कदाचित सीजेआय चंद्रचूड यांनी सहाव्या नावासह इतर नावांनाही आधीच विशिष्ट मंजुरी घेतली असावी, असे माजी न्यायमूर्ती कौल यांनी मुलाखतीत सांगितले.
न्यायाधीशांच्या नावांबाबत सरकारसोबत आधीच चर्चा करण्याची प्रथाच बनली असल्याचेही न्यायमूर्ती कौल यांनी म्हटले आहे. पूर्वीही असेच घडायचे. नंतरही घडत आल्याची नाराजीही त्यांनी व्यक्त केली. नियुक्तीच्या बाबतीत माजी सीजेआय चंद्रचूड सरकारपुढे खूपच नम्र होते, असे माजी न्यायमूर्ती कौल यांनी आत्मचरित्रात म्हटले आहे.
तुमच्यासारख्या (सीजेआय चंद्रचूड) दोन वर्षांच्या कार्यकाळातील सरन्यायाधीशांनी असे केल्यास, त्यांच्या उत्तराधिकाऱ्यांना ही प्रथा न पाळण्यात अडचण येईल. कारण त्यांचा कार्यकाळ कमी असतो आणि सुप्रीम कोर्टात नियुक्ती होण्यापूर्वी सरकारला एका विशिष्ट कार्यपद्धतीची सवय होईल. म्हणूनच मी त्यांना याबाबत आधीच चर्चा करण्यापासून परावृत्त केले, असा दावा माजी न्यायमूर्तींनी मुलाखतीत केला.माजी न्यायमूर्ती कौल हे सरन्यायाधीशांनंतरचे सर्वात ज्येष्ठ कनिष्ठ न्यायाधीश (जे१) म्हणून १४ महिने सेवा बजावल्यानंतर डिसेंबर २०२३ मध्ये निवृत्त झाले होते.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.