Indapur,05 November : ऐन विधानसभा निवडणुकीच्या धामधुमीत माजी सरकार मंत्री हर्षवर्धन पाटील यांना मोठा धक्का बसला आहे. त्यांचे चुलत बंधू तथा इंदापूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती मयूरसिंह पाटील यांनी हर्षवर्धन पाटील यांची साथ सोडली असून अपक्ष उमेदवार प्रवीण माने यांना पाठिंबा जाहीर केला आहे, त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार हर्षवर्धन पाटील यांच्यापुढील अडचणी वाढताना दिसत आहेत.
दरम्यान, गेल्या तीन ते चार वर्षांपूर्वी दुधगंगा दूध संघाचे अध्यक्ष प्रशांत पाटील यांनीही हर्षवर्धन पाटील (Harshvardhan Patil) यांच्यापासून फारकत घेतली होती. प्रशांत पाटील यांनीही थेट राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. त्यामुळे हर्षवर्धन पाटील यांना आता घरातूनच विरोध होऊ लागला आहे.
भारतीय जनता पक्षाला जय श्रीराम करत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात (NCP SP) प्रवेश केलेले माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांना शरद पवारांनी विधानसभेचे उमेदवारी दिली आहे. मात्र, पाटील यांना उमेदवारी जाहीर होताच राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडली आणि तीन मातब्बर नेत्यांनी शरद पवारांची साथ सोडली. यामध्ये पुणे जिल्हा सहकारी बँकेचे संचालक आप्पासाहेब जगदाळे, सोनाई परिवाराचे प्रमुख दशरथदादा माने आणि गेली काही वर्षांपासून इंदापूर शहरावर वर्चस्व राखून असणारे भरत शहा या प्रमुख नेतेमंडळीचा समावेश होता.
जगदाळे, माने आणि शहा या तीन नेत्यांचा हर्षवर्धन पाटील यांच्या उमेदवाराला विरोध होता आणि तो त्यांनी बारामतीत जाऊन शरद पवार यांच्यासमोर बोलूनही दाखवला होता. मात्र, शरद पवार यांनी या तिघांचा विरोध डावलून हर्षवर्धन पाटील यांना विधानसभेची उमेदवारी दिली होती. आता मात्र हर्षवर्धन पाटील यांना घरातूनच आव्हान देण्यात येत आहे.
प्रवीण माने यांना पाठिंबा जाहीर करताना मयूरसिंह पाटील म्हणाले की, ज्या विचाराने मी काम करत होतो, त्या विचाराला तिलांजली देण्याचे काम आमच्या घरातील लोकांनी केले आहे, त्यामुळे इंदापूर तालुक्याची विल्हेवाट लागायला लागली आहे.
तालुक्यातील सहकारी संस्था हुकूमशाही पद्धतीने चालवण्यात आल्या. या संस्थांमध्ये काम करत असताना आम्हालाही वरून आदेश आल्याशिवाय काहीही करता येत नव्हतं. त्यांनी मंत्रिपद, आमदारकीचा उपयोग तालुक्याच्या विकासासाठी करणे आवश्यक होतं. पण, तसं झालेले नाही, अशी टीका हर्षवर्धन पाटील यांच्यावर नाव न घेता केली.
एकीकडे इंदापूरची निवडणूक हर्षवर्धन पाटील आणि आमदार दत्तात्रय भरणे यांच्यात रंगत असतानाच आता प्रवीण माने यांनीही त्यात रंग भरायला सुरुवात केली आहे, त्यामुळे इंदापूर मतदारसंघाची तिरंगी लढत अधिक चुरशीचा होणार, हे स्पष्ट आहे.
Edited By : Vijay Dudhale
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.