Solapur, 05 November : माढा मतदारसंघातून मोहिते पाटील यांचे कट्टर समर्थक माजी जिल्हा सदस्य शिवाजी कांबळे यांनी विधानसभा निवडणुकीतून सोमवारी (ता. ०४ नोव्हेंबर) माघार घेतली. त्यानंतर त्यांनी आज आमदार बबनराव शिंदे यांचे चिरंजीव, अपक्ष उमेदवार रणजितसिंह शिंदे यांना पाठिंबा जाहीर केला आहे. महाविकास आघाडीतील बंडखोर शिवाजी कांबळे यांना अर्ज माघारी घेण्यास भाग पाडून त्यांना आपल्या गोटात ओढत शिंदेंनी मोहिते पाटील यांना माढ्यात मोठा धक्का दिल्याचे मानले जात आहे.
माढा विधानसभा मतदारसंघातून (Madha Assembly Constituency) लोकसभा निवडणुकीत मोहिते पाटील यांना 50,000 हून अधिक मतांचे लीड मिळाले होते, त्यामुळे महाविकास आघाडीकडे विधानसभा निवडणूक लढवू इच्छिणाऱ्यांची मोठी संख्या होती. आमदार बबनराव शिंदे यांच्या विरोधकांची एकजूट झाली होती.
बबनदादा शिंदे (Baban Shinde) यांच्या विरोधात निवडणुकीत एकास एक उमेदवार देण्याची शपथही घेण्यात आली होती. मात्र उमेदवारी अर्ज भरण्याची तारीख जसजशी जवळ येऊ लागली, तसतसे इच्छुकांमध्ये फाटाफूट होत गेली. त्यात अभिजीत पाटील यांना महाविकास आघाडीकडून उमेदवारी मिळाल्यानंतर माढा तालुक्यातील राजकीय समीकरणे पूर्णपणे बदलून गेली.
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून इच्छुक असलेले रणजितसिंह शिंदे (Ranjitshinh Shinde) यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज भरला. माढ्याच्या नगराध्यक्षा मीनल साठे यांना महायुतीकडून उमेदवारी मिळाली, त्यामुळे मोहिते पाटील यांचे कट्टर समर्थक शिवाजी कांबळे यांनी शिवसेनेचे पृथ्वीराज सावंत यांच्यासोबत येऊन निवडणूक अर्ज भरला होता, त्यामुळे माढ्यात चौरंगी लढत होईल, अशी शक्यता वर्तवण्यात येत होती.
लोकसभा निवडणुकीतील वातावरण पाहता शिंदे यांच्या विरोधातील एकी कायम राहील आणि त्यातून एकास एक लढत होईल, अशी शक्यता वर्तविण्यात येत असतानाच उमेदवारांमध्ये झालेल्या फाटाफुटीमुळे माढ्यात राजकीय वातावरण पुन्हा एकदा तापले आहे.
उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी माढ्यात मोठ्या राजकीय घडामोडी झाल्या. आमदार बबनराव शिंदे यांनी मोहिते पाटील यांना धक्का देत त्यांचे खंदे समर्थक शिवाजी कांबळे यांना गळाला लावण्याचे काम केले. शिवाजी कांबळे यांनी शेवटच्या दिवशी रणजितसिंह शिंदे यांच्या उपस्थितीत उमेदवारी अर्ज मागे घेतला. त्यानंतर आज रणजितसिंह शिंदे यांना पाठिंबा जाहीर केला आहे. तो पाठिंबा देताना त्यांनी मोहिते पाटील यांच्यावर शब्द न पाळल्याचा आरोप केला आहे.
माढा विधानसभा मतदारसंघातून सर्वसामान्य कार्यकर्त्यांना उमेदवारी देण्याचा शब्द मोहिते पाटील यांनी पाळला नाही, त्यामुळे आपण त्यांच्यापासून फारकत घेतली. बबनराव शिंदे यांच्याशी आपले किरकोळ मतभेद होते, ते मतभेद मिटवून माढा तालुक्यावर होणारे अतिक्रमण रोखण्यासाठी आम्ही शिंदे यांना पाठिंबा दिला आहे, असे शिवाजी कांबळे यांनी स्पष्ट केले.
आमदार बबनराव शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिवाजी कांबळे यांचे राजकीय कारकीर्द घडली आहे. माढ्यातील अनेक गटातून ते जिल्हा परिषदेवर निवडून गेलेले आहेत. मात्र, मागील निवडणुकीत जिल्हा परिषद उमेदवारीवरून त्यांचे बबनराव शिंदे यांच्यासोबत मतभेद झाले होते. त्यानंतर शिवसेनेचे सावंत आणि मोहिते पाटील यांच्याशी जुळवून घेत शिवाजी कांबळे यांनी आपली पुढील राजकीय वाटचाल सुरू केली होती.
लोकसभा निवडणुकीत बबनराव शिंदे यांच्यावर जोरदार टीका करत कांबळेंनी मोहिते पाटलांशी जवळीक वाढवली होती. मात्र, विधानसभा निवडणुकीत उमेदवारी न मिळाल्यामुळे त्यांनी थेट बबनराव शिंदे यांच्याशी असणारे मतभेद संपवून टाकत शिंदेंशी पुन्हा नाते जोडले आहे.
Edited By : Vijay Dudhale
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.