Sanjay Jagtap
Sanjay Jagtap Sarkarnama
पुणे

Sanjay Jagtap News : दिल्लीत महाराष्ट्राचा आमदार असल्याचे सांगायला लाज वाटते; लोक बॅगा पाहतात : जगतापांनी व्यक्त केली खंत

किशोर कुदळे

वाल्हे (जि. पुणे) : दिल्लीसारख्या ठिकाणी किंवा बाहेर कुठे गेलो की महाराष्ट्राचा आमदार आहे, हे सांगायला लाज वाटते. बॅगा बिगा आणल्या का काय, असं लोकं बघतात. आमदारांची ही बदनामी खूप खालच्या पातळीवर झालीय. ग्रामपंचायत, सोसायटीमधील लोकं जी नैतिकता पाळतात, ती पण काही मंडळी पाळत नाहीत. आपण बघतोय काही मंडळी बंदूक, काडतुस असं काय काय बोलतात. मतदाररूपी छडीने त्यांना सरळ करावे, असे आवाहन पुरंदर-हवेलीचे आमदार संजय जगताप (Sanjay Jagtap) यांनी केले. (I am ashamed to say that I am MLA of Maharashtra : Sanjay Jagtap)

पुरंदर तालुक्यातील वाल्हे येथे सोसायटीच्या सभासदांना आमदार जगताप व पुणे जिल्हा बॅंकेचे अध्यक्ष प्रा. दुर्गाडे यांच्या हस्ते खरीप पीक कर्ज वाटप करण्यात आले. त्या कार्यक्रमात राज्यात पन्नास खोके प्रकरणावरून होणाऱ्या चर्चेवरून संजय जगताप यांनी आपल्या मनातील खंत व्यक्त केली.

जगताप म्हणाले की, विमानतळ आपल्याकडे होतंय, त्याची रचना आपण करत आहोत. आपण विकास करत आहोत, रोजगार उभे करत आहोत. तालुक्यात २०१९ मध्ये दीड लाख टन ऊस होता, आज साडेपाच लाख टन ऊस आहे. जिल्ह्याला अतिवृष्टीचा निधी ७३ कोटी आला आहे. यात आपल्या तालुक्याला २५ कोटींचा वाटा मिळाला आहे. आम्ही काम करतोय पाठपुरावा करत आहे.

पूर्वी जिल्हा बॅंक तात्पुरत्या स्वरूपात व्याजाचा भार सोसत शेतकऱ्यांना शून्य टक्के व्याजदराने पीककर्ज देत होती. यापोटी असणारे सहा टक्के व्याज सरकारकडून बॅंकेला मिळत असे. परंतु केंद्र व राज्य सरकारने धोरण बदलून व्याजाची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर थेट देण्याचा निर्णय घेतल्याने बॅंकेला ही रक्कम शेतकऱ्यांना देता येत नाही. मात्र, या निर्णयामुळे दोन वर्षांपासून शेतकरी पीककर्जाची परतफेड सहा टक्के व्याजदराने करीत आहेत. अद्यापही हे सहा टक्के व्याज शेतकऱ्यांच्या खात्यावर सरकारकडून जमा झाले नाही, अशी खंत पुणे जिल्हा बॅंकेचे अध्यक्ष प्रा. दिगंबर दुर्गाडे यांनी व्यक्त केली.

दरम्यान येत्या आठ दिवसांमध्ये वाल्हे, पिंगोरी, हरणी, सुकलवाडी व वागदरवाडी येथील सोसायट्यांना खरीप पीक कर्ज वाटप केले जाणार असल्याचे अनिल उरवणे यांनी सांगितले. सोसायटीचे सचिव राहुल जाधव, राजेश कुदळे, शाखाप्रमुख संतोष दुर्गाडे, विकास अधिकारी मयुर भुजबळ आदिंसह शाखेच्या कर्मचाऱ्यांनी कार्यक्रमाचे संयोजन केले. शशिकांत दाते यांनी प्रास्ताविक केले. दिपक कुमठेकर यांनी सुत्रसंचालन तर पुरंदर विभागीय अधिकारी महेश खैरे यांनी आभार मानले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT