Dhiraj Ghate Sarkarnama
पुणे

Kasaba By-Election : पक्षाने संधी दिली तर कसब्यातून निश्‍चितपणे निवडून येईन; धीरज घाटेंचा विश्‍वास

BJP News : भाजपमधील इच्छुकांचे आता वरीष्ठ नेत्यांच्या निर्णयाकडे लागले लक्ष

सरकारनामा ब्युरोे

Kasaba By-Election News : कसबा विधानसभा मतदारसंघातून पक्षाने संधी दिली तर निश्‍चितपणे निवडून येईन, असा विश्‍वास भारतीय जनता पार्टीचे प्रदेश चिटणीस व पुण्याचे प्रभारी धीरज घाटे (Dhiraj Ghate) यांनी व्यक्त केला. ‘सरकारनामा’शी बोलताना घाटे यांनी कसब्यातून विधानसभेची निवडणूक लढविण्याची इच्छा व्यक्त केली. आमदार मुक्ता टिळक यांचे गेल्या महिन्यात निधन झाल्याने रिक्त जागेवर ही निवडणूक जाहीर झाली असून अर्ज भरण्यास सुरवात झाली आहे. या पार्श्वभूमीवर घाटे बोलत होते.

येत्या दोन दिवसात भाजपाचा कसब्यातील उमेदवार जाहीर होणार आहे. या पार्श्वभूमीवर धीरज घाटे (Dhiraj Ghate) यांनी ‘सरकारनामा’शी बोलताना आपली भूमिका मांडली. ते म्हणाले, ‘‘ गेली ३२ वर्षे मी सामाजिक-राजकीय क्षेत्रात काम करीत आहे. पक्षाने यावेळी आमदारकीसाठी संधी द्यावी, अशी माझ्यासह कार्यकर्त्यांची भावना आहे. मात्र, आमच्या पक्षाच्या वरिष्ठांनी घेतलेला निर्णय अंतीम असतो. त्यामुळे मी इच्छुक असलो तरी पक्ष देईल तो उमेदवार निश्‍चितपणे निवडून आणणे ही आम्हा सर्व कार्यकर्त्यांची जबाबदारी आहे.’’

कसबा मतदारसंघ (Kasaba by-election) सुरवातीपासूनच भाजपाचा बालेकिल्ला आहे. सर्व जाती-धर्माचे लोक या मतदारसंघात आहेत.या सर्व घटकांचा सुरवातीपासूनच भाजपाला पाठिंबा आहे. गेल्या पाच वर्षात भाजपाची पुणे महापालिकेत सत्ता होती. विकासाची अनेक मोठी कामे या काळात झाली आहेत. मी स्वत: सभागृह नेता असताना अनेक नव्या योजना महापालिकेच्या माध्यमातून मार्गी लावल्या आहेत. विकासाचा व्यापक दृष्टीकोन असल्याने भाजपाचा उमेदवार निवडून येणे ही केवळ औपचारिकता असल्याचा विश्‍वास घाटे यांनी व्यक्त केला.

राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) व पालकमंत्री चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांचे पुण्यावर विशेष लक्ष आहे. शहराचा चेहरा-मोहरा बदलेल अशा अनेक योजना पुण्यात राबविल्या आहेत. खऱ्या अर्थाने भविष्याचा विचार करून पुण्याच्या विकासाच्या योजना मार्गी लावण्यात येत आहेत.

गिरीश बापट यांच्या रूपाने पुण्याची नेमकी माहिती असलेले नेतृत्व खासदार म्हणून निवडून आले आहे. स्वत: बापट यांनी कसबा मतदारसंघाचे तब्बल पाचवेळा नेतृत्व केले आहे. त्यामुळे भाजपा या मतदारसंघात घरा-घरापर्यंत पोचला आहे, असे घाटे यांनी सांगितले.

गणेशोत्सवाच्या माध्यमातून मतदारसंघातील प्रत्येक गणेश मंडळांशी अनेक वर्षांचा संपर्क आहे. साने गुरूजी मंडळ व हिंदू गर्जना प्रतिष्ठानच्या माध्यमातून अनेक वर्षापासून काम सुरू आहे. कोरोनाच्या काळात भाजपाच्या प्रत्येक कार्यकर्त्यांने जीवाची पर्वा न करता काम केले आहे. या भागातील गणेश मंडळांचे कामदेखील या काळात मोठे होते. त्यामुळे या सर्व घटकांच्या सहकार्याने निवडून येणे सहज शक्य आहे, असा विश्‍वास धीरज घाटे यांनी व्यक्त केला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT