भाजपा-पतित पावन संघटना
भाजपा-पतित पावन संघटना  सरकारनामा
पुणे

पतित पावन संघटना निवडणुकीच्या रिंगणात खरोखरच उतरली तर...

उमेश घोंगडे

पुणे : पुण्यात महापालिका निवडणुकांचे वारे वाहू लागले आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी जवळीक सांगणारी पतित पावन संघटना महापालिका निवडणुकीत उतरणार असल्याची घोषणा संघटनेने पंधरा दिवसांपूर्वी कली आहे. घोषणा केल्याप्रमाणे खरोखरच पतित पावन निवडणकीच्या रिंगणात उतरली तर भारतीय जनता पार्टीला त्याचा निश्‍चित फटका बसणार आहे.

पतित पावन संघटना ही प्रखर हिंदुत्ववादी संघटना म्हणून ओळखाली जाते. या संघटनेची राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी जवळीक असल्याचे सुरवातीपासून बोलले जाते. प्रत्यक्षात संघाच्या रचनेत या संघटनेचे अस्तित्व जाणवत नाही. मात्र, संघ विचाराचे लोक या संघटनेच्या स्थापनेपासून दिसतात. या पाश्‍र्वभूमीवर पतित पावनच्या घोषणेला महत्व आहे.

आक्रमक हिंदुत्वावादी संघटना ही पतित पावनची स्थापनेपासूनची ओळख आहे. पुण्याचे माजी खासदार आणि भारतीय जनता पार्टीचे नेते प्रदीप रावत हे एकेकाळी ही संघटना चालवत होते. त्यावेळी त्यांच्यासोबत असलेले अनेक सहकारी आजच्या भाजपात कार्यरत आहेत.त्यामुळे पतित पवानच्या घोषणेने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.

या संदर्भात पतित पावनचे पदाधिकारी थेटपणे बोलायचे टाळत आहेत. मात्र, भाजपातील अनेकजणांना पतित पावनचा निर्णय प्रत्यक्षात येणार नाही, याची खात्री वाटते. बहुतेकजण ही खात्री खासगीत व्यक्त करीत आहेत. मुळात पतित पावन संघटनेने खरोखरच उमेदवार उभे केले तर त्याचा फटका भाजपाच्या उमेदवारांनाच निश्‍चितपणे बसणार आहे.

राज्यात भारतीय जनता पार्टीच्या विरोधात महाविकास आघाडी एकवटली आहे. या तीन्ही घटक पक्षात जागा वाटपाबाबत बोलणी सुरू झाली आहेत. चर्चेच्या दोन फेऱ्यादेखील झाल्या आहेत. या परिस्थितीत पुण्यात भाजपाला आपल्याच लोकांकडून त्रास होणार असेल तर पुन्हा सत्तेत येण्याचे स्वप्न कसे पूर्ण होणार याची भीती मात्र काहीजण व्यक्त करीत आहेत.

पतित पावनने घोषणा केली असली तरी त्यांचे उमेदवार प्रत्यक्ष निवडणुकीच्या रिंगणात उतरणार नाहीत, याची काळजी घेण्यात येईल, असे काहीजण सांगत आहेत. पूर्वी इतकी पतित पावनची फार मोठी ताकद उरली नसली तरीसुद्धा महाविकास आघाडीसोबत लढताना भाजपाला प्रत्येक गोष्टीची काळजी घ्यावी लागणार आहे. त्यामुळे पतित पावनला निवडणुकीच्या राजकारणापासून दूर ठेवण्याचे प्रयत्न नक्की होतील. त्याला ही संघटना कसा प्रतिसाद देते त्यावर सारेकाही अवलंबून आहे.

Edited By : Umesh Ghongade

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT