NCP News:  Sarkarnama
पुणे

NCP News: महापौर अन् मुख्यमंत्रीही राष्ट्रवादीचाच; वर्धापनदिनी राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांचा निर्धार

सरकारनामा ब्यूरो

पिंपरी : राष्ट्रवादी काँग्रेसचा 25 वा वर्धापनदिन काल पिंपरी-चिंचवडमध्ये मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी पिंपरी-चिंचवड महापालिकेतच नाही, तर राज्यातही पुन्हा सत्ता आणण्याचा निर्धार पक्षाच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी केला.

येत्या महापालिका आणि पुढील वर्षाच्या विधानसभा निवडणुकीत संपूर्ण ताकदीने राष्ट्रवादी मैदानात उतरणार असून आता पिंपरी-चिंचवडचा महापौर राष्ट्रवादीचा असेल आणि राज्याचा मुख्यमंत्रीही पक्षाचाच असणार, असा ठाम निर्धार पक्षाचे पिंपरी-चिंचवड अध्यक्ष अजित गव्हाणे यांनी वर्धापनदिन सोहळ्यात व्यक्त केला.

माजी आमदार विलास लांडे, महापालिकेचे माजी विरोधी पक्षनेते विठ्ठल उर्फ नाना काटे, शहर महिला अध्यक्ष कविता आल्हाट, युवक अध्यक्ष इम्रान शेख, विद्यार्थी प्रदेशाध्यक्ष सुनील गव्हाणे, युवती अध्यक्षा वर्षा जगताप, युवक कार्याध्यक्ष रविकांत वर्पे, प्रवक्ते विनायक रणसुभे आदी यावेळी उपस्थित होते.

"लहान खेडी एकत्र करून आंतरराष्ट्रीय ख्यातीची पिंपरी-चिंचवड महापालिका बनवण्यात शरद पवार, अण्णासाहेब मगर, प्रा.रामकृष्ण मोरे यांच्यासह अजित पवार यांचा मोलाचा वाटा कोणीही नाकारू शकणार नाही. अजित पवारांनी तर पिंपरी-चिंचवड शहराचा केवळ कायापालटच केला नाही तर या शहराला जागतिक पातळीवर नावलौकिक मिळवून दिला", असे असे गव्हाणे याप्रसंगी म्हणाले.

"त्यामुळेच यंदाची महापालिका निवडणूक आपण सर्वांनी एकजुटीने लढायची आहे. शहराची सध्या होत असलेली वाताहत थांबवायची असेल तर राष्ट्रवादीचाच महापौर निवडून आणावा लागेल. त्याचबरोबर अजित पवार यांना मुख्यमंत्रीपदी विराजमान करायचे असेल तर सर्वांनी एकजुटीने निर्धार करण्याची वेळ आली आहे. ही लढाई खोट्या लोकांविरुद्ध खऱ्या लोकांची असेल", असं ते म्हणाले.

Edited By- Ganesh Thombare

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT