Dattatray Bharane-Harshvardhan Patil Sarkarnama
पुणे

वाढलेले गट-गण दत्तात्रेय भरणेंना ताकद देणार की हर्षवर्धन पाटलांना साथ देणार?

मागच्या निवडणुकीत राष्ट्रवादीने (राज्यमंत्री दत्तात्रेय भरणे) झेडपीत, तर हर्षवर्धन पाटील यांनी पंचायत समितीमध्ये वर्चस्व राखले होते.

राजकुमार थोरात - Sarkarnama

वालचंदनगर (जि. पुणे) : इंदापूर तालुक्यात जिल्हा परिषदेचे दोन गट, तर पंचायत समितीच्या चार गणांची भर पडली आहे. पूर्वी तालुक्यात सात गट आणि १४ गण होते. आता जिल्हा परिषदेच्या जागा ९, तर पंचायत समितीच्या १८ जागा झाल्या आहेत. मागच्या निवडणुकीत राष्ट्रवादीने (राज्यमंत्री दत्तात्रेय भरणे, Dattatray Bharane) झेडपीत, तर हर्षवर्धन पाटील (Harshvardhan Patil) यांनी पंचायत समितीमध्ये वर्चस्व राखले होते. त्यामुळे वाढलेले गट आणि गण हे पाटलांच्या पारड्यात वजन टाकणार की राज्यमंत्री भरणे यांच्या पाठीशी राहणार, याकडे तालुक्याबरोबरच जिल्ह्याच्या राजकीय वर्तुळाचे लक्ष असणार आहे. (Increased constituency of Zilla Parishad, Panchayat Samiti will support NCP or BJP in Indapur)

राज्यमंत्री दत्तात्रेय भरणे आणि भाजप नेते, माजी सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या भोवती इंदापूर तालुक्याचे राजकारण कायम फिरत असते. दोन्ही नेते तुल्यबळ असल्याने अगदी छोट्या निवडणुकाही ताकदीने लढवल्या जातात, त्यामुळे आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकाही चुरशीने होणार, हे निश्चित आहे. इंदापूर तालुक्यात आमदार राष्ट्रवादी काँग्रेसचा असून तालुक्यातील महत्वाच्या संस्था हर्षवर्धन पाटील यांच्या ताब्यात आहेत.

राज्य सरकारच्या निर्णयानुसार जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या गट व गणांची पुनर्रचना करण्यात आली आहे. त्यानुसार इंदापूर तालुक्यात जिल्हा परिषदेचे दोन गट, तर पंचायत समितीच्या ४ गणांमध्ये वाढ झाली आहे. त्यामुळे तालुक्यात ९ जिल्हा परिषद सदस्य व १८ पंचायत समिती सदस्य असणार आहेत. सध्या जिल्हा परिषदेच्या मतदारसंघावर राष्ट्रवादी कॉंग्रेसचे वर्चस्व असून जिल्हा परिषदेच्या सात गटापैकी ४ गट भरणे गटाच्या ताब्यात आहेत. हर्षवर्धन पाटील यांचे पंचायत समितीवर वर्चस्व असून पंचायत समितीच्या १४ गणांपैकी ८ गण त्यांच्या ताब्यात आहेत.

विधानसभा निवडणुकीपूर्वी कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती तथा जिल्हा बॅंकेचे संचालक आप्पासाहेब जगदाळे यांनी हर्षवर्धन पाटील यांना सहकार्य केले आहे. सध्या जगदाळे हे पाटील गटामध्ये आहेत, त्यामुळे जगदाळे यांचे बंधू, पंचायत समिती सदस्य प्रदीप जगदाळे यांच्याही एका जागेची भर पाटील गटात पडली आहे. सध्या तालुक्यामध्ये भरणे व पाटील गटाचे पारडे समसमान आहे. त्यामुळेच जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी कॉग्रेस की भाजप बाजी मारणार याकडे तालुक्यासह जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT