काटेवाडी: इंदापूर तालुक्यातील राजकारणाने पुन्हा एकदा ३६० अंशांत वळण घेतले आहे. गेल्या दोन दशकांत वारंवार दिसणारी ही 'उलथापालथ' आता इतकी नेहमीची झाली आहे की, ती आश्चर्यचकित करत नाही; या वेळी मात्र जे घडले ते फक्त स्थानिक पातळीवरचे नाही, तर महाराष्ट्राच्या राजकीय पटलावर दोन्ही राष्ट्रवादी गटांच्या सोयीस्कर एकीकरणाचा एक भाग आहे. हर्षवर्धन पाटील यांची कन्या अंकिता पाटील आणि दत्तात्रय भरणे यांचे चिरंजीव श्रीराज भरणे हे दोघेही घड्याळ चिन्हावर (अजित पवार गटाचे अधिकृत चिन्ह) लढत आहेत. ही केवळ युती नव्हे, तर दोन कट्टर प्रतिस्पर्ध्यांच्या वर्चस्वाच्या लढाईमागे लपलेला प्रगल्भ राजकीय व्यवहार आहे.
इंदापूरमध्ये भरणे आणि पाटील यांच्यातील लढाई ही फक्त वैयक्तिक नव्हती; ती वर्चस्वाची, सहकारी संस्थांची, साखर कारखान्यांची आणि स्थानिक सत्तेची होती. २०१४, २०१९ आणि २०२४ च्या विधानसभा निवडणुकांत भरणे यांनी पाटील यांचा पराभव केला. पाटील यांनी २०२४ मध्ये शरद पवार यांच्या राष्ट्रवादीत प्रवेश केल्यानंतरही भरणे यांच्यापुढे टिकाव धरता आला नाही. नगरपरिषदेतही भरणे गटाची सरशी झाली. पण आता जिल्हा परिषद-पंचायत समिती निवडणुकीत भरणे व पाटील दोघे एकत्र आले आहेत.
महानगरपालिका निवडणुकीत दोन्ही राष्ट्रवादी एकत्र लढूनही भाजपसमोर दारुण पराभव झाला. पुण्यात भाजपने प्रचंड बहुमत मिळवले, राष्ट्रवादीला नाममात्र यश मिळाले. हा धक्का बसल्यानंतर अजित पवार आणि शरद पवार यांनी एकत्र लढणे हा पर्याय निवडला. घड्याळ आणि तुतारी चिन्हांचा सोयीस्कर वापर करून, जिथे शक्य तिथे एकच उमेदवार उभा करणे, ही रणनीती आखली गेली. इंदापूर हे त्याचे सर्वांत स्पष्ट उदाहरण ठरले.
वरिष्ठ नेते "राजकारणात वैर नसते" म्हणतात, पण कार्यकर्ते मात्र वर्षानुवर्षे प्राणपणाने मेहनत करतात, आपापल्या नेत्यांसाठी रात्रंदिवस धावपळ करतात, पक्षासाठी संघर्ष करतात. भरणे-पाटील यांच्यातील वैर हे फक्त वैयक्तिक नव्हते; ते कार्यकर्त्यांच्या गटांमध्ये, सहकारी संस्थांमध्ये, ग्रामपंचायत, पंचायत समिती -जिल्हा परिषदेत उतरले होते. आता एका रात्रीत 'मित्र' झाल्याने त्या कार्यकर्त्यांचे हितसंबंध, विश्वास, निष्ठा यांचे काय? नेते पाहिजे तेव्हा जुळवून घेतात, पण कार्यकर्त्यांनी मात्र 'कट्टर' राहण्याची अपेक्षा असते—ही नेत्यांची एकतर्फी भावना यानिमित्ताने उघडी पडली आहे.
या युतीमुळे निर्माण झालेल्या असंतोषाचा फायदा घेण्याची संधी आता प्रवीण माने आणि प्रदीप गारटकर यांच्याकडे आहे. दोघांनी नुकताच भाजपमध्ये प्रवेश केला आहे. ते राष्ट्रवादीच्या या 'एकत्र येण्या'ला थेट आव्हान देत आहेत. प्रवीण माने हे माजी जिल्हा परिषद सभापती म्हणून स्थानिक स्तरावर ओळखले जातात, तर प्रदीप गारटकर हे नगरपरिषदेचे माजी नगराध्यक्ष आणि माजी जिल्हाध्यक्ष म्हणून प्रभावी होते. पण त्यांचा संपर्क पूर्ण तालुकाभर पसरलेला नाही—तो मुख्यतः एका ठराविक वर्ग, सहकारी क्षेत्रातील काही गट आणि नगरपरिषदेच्या परिसरापुरता मर्यादित आहे.
भरणे यांचे कृषिमंत्री म्हणून सत्ता-आधारित जाळे आणि पाटील यांचा साखर कारखानदारी-राजकीय प्रभाव यांच्या तुलनेत त्यांचे प्रभाव क्षेत्र संकोचित आहे. मात्र असंतुष्ट कार्यकर्ते, घराणेशाहीविरोधी मतदार आणि 'एकत्र येणे सोपे, राहणे कठीण' या वास्तवाने नाराज झालेले लोक माने-गारटकर जोडीकडे वळू शकतात. पण हे अवघड आहे, अशक्य नाही. तरीही, तालुकाभर व्यापकपणे प्रभाव टाकण्यासाठी त्यांना आणखी मेहनत, नवे गट जोडणे आणि घराणेशाहीविरोधी मुद्दा प्रभावीपणे मांडणे गरजेचे आहे.
भरणे यांचे इंदापूरमध्ये मजबूत जाळे आहे. कृषिमंत्री म्हणून सत्ता, आप्पासाहेब जगदाळे यांसारख्या दिग्गजाची साथ, स्थानिक नेते आणि सहकारी क्षेत्रातील प्रभाव तालुक्यात तुलनेने जास्त आहे. पाटील यांच्यासाठी सहकारी साखर कारखानदारीतील जाळे, पाटील घराण्याचा राजकीय प्रभाव आणि शरद पवार गटातील 'निष्ठावान' कार्यकर्ते या जमेच्या बाजू आहेत. मात्र या दोघांचे एकत्र येणे हे मतदारांना हे 'सत्तेसाठीचे गणित' दिसले तर ते नाकारू शकतात. घराणेशाहीचा (वारसदारांचा) मुद्दाही मतदारांसमोर येईल. अंकिता आणि श्रीराज हे 'पुढच्या पिढीला संधी' म्हणून सादर केले जात असले तरी 'नेपोटिझम'चा ठपका बसू शकतो.
नेत्यांची 'मने जुळली' तरी कार्यकर्ते आणि मतदार 'जिथेच राहतात' की 'बदलतात'. राजकारणात 'वळण' घेणे सोपे असते, पण ते वळण 'टिकते' की 'तुटते' हे निवडणुकीनंतर कळेल. सध्या तरी इंदापूरचे राजकारण अनपेक्षित मैत्रीच्या आणि अंतर्मनातील द्वंद्वाच्या टप्प्यात आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.