Jawahar Shah Sarkarnama
पुणे

Baramati News : शरद पवारांनी पहिल्या निवडणुकीपासूनचा बारामतीतील निष्ठावान सोबती गमावला!

Sharad Pawar tribute, Jawahar Shah, Baramati politics : जवाहर शहा यांच्या निधनामुळे बारामतीच्या सामाजिक, शैक्षणिक आणि व्यापारी क्षेत्रातील एक ज्येष्ठ मार्गदर्शक व्यक्तिमत्त्व आज हरपले आहे, अशा शब्दांत सुनेत्रा पवार यांनी दु:ख व्यक्त केले.

Rajanand More

बारामतीचे माजी नगराध्यक्ष जवाहर शहा (वाघोलीकर) यांचे मंगळवारी निधन झाले. वयाच्या ८२ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांचे ते पहिल्या निवडणुकीपासूनचे निष्ठावान सोबती होते. बारामतीमध्ये राजकारणासह सामाजिक, शैक्षणिक आणि व्यापार क्षेत्रात त्यांचे भरीव योगदान होते.

जवाहर शहा हे बारामतीतील बारामतीतील अनेकांत एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष होते. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा नगरसेवक राहुल वाघोलीकर, दोन मुली, नातवंडे असा परिवार आहे. पवार कुटुंबीयांचे अत्यंत विश्वासू सहकारी म्हणून शहा यांना ओळखले जात होते. त्यांच्या निधनानंतर शरद पवार, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, खासदार सुप्रिया सुळे यांनी दु:ख व्यक्त केले आहे.

पहिल्या निवडणुकीपासून सोबत

शरद पवार यांनी जवाहर शहा यांच्या निधनानंतर सोशल मीडियात केलेल्या पोस्टमध्ये म्हटले आहे की, जवाहरभाई आणि माझे नाते गेल्या अनेक दशकांचे होते. हे नाते केवळ राजकीय तथा सामाजिक क्षेत्रापुरतेच मर्यादित नव्हते तर ते आमचे अत्यंत जवळचे कौटुंबिक मित्र देखील होते. अगदी १९६७ च्या माझ्या पहिल्या निवडणूकीपासून ते आजतागायत जवाहरभाई माझ्यासोबत प्रत्येक क्षणी ठामपणे, खंबीरपणाने उभे राहिले.

बारामतीच्या आणि एकंदर राज्याच्या शैक्षणिक जडणघडणीत त्यांनी ‘अनेकांत एज्युकेशन सोसायटी’च्या माध्यमातून मोलाचे योगदान दिले. अनेक होतकरु, प्रतिभावंत विद्यार्थ्यांसाठी त्यांनी ज्ञानाची कवाडे खुली केली. शैक्षणिक क्षेत्रात त्यांनी केलेले कार्य कधीही विसरता येणार नाही. बारामतीचे नगराध्यक्ष म्हणूनही त्यांनी मोलाचे कार्य केले. या शहराच्या विकासात त्यांचेही महत्वाचे योगदान आहे, असे शरद पवारांनी नमूद केले आहे.

शहा यांच्या निधनामुळे मी माझा एक निष्ठावान सोबती गमावला आहे, अशा शब्दांत शरद पवारांनी श्रद्धांजली अर्पण केली आहे. जवाहर शहा यांच्या निधनामुळे बारामतीच्या सामाजिक, शैक्षणिक आणि व्यापारी क्षेत्रातील एक ज्येष्ठ मार्गदर्शक व्यक्तिमत्त्व आज हरपले आहे, अशा शब्दांत सुनेत्रा पवार यांनी दु:ख व्यक्त केले.

बारामती नगरपरिषदेचे माजी नगराध्यक्ष, तुळजाराम चतुरचंद महाविद्यालयाचे अध्यक्ष तसेच बारामती मर्चंट असोसिएशनचे माजी अध्यक्ष म्हणून त्यांनी विविध संस्थांच्या माध्यमातून बारामतीच्या जडणघडणीत मोलाची भूमिका बजावली. दिगंबर जैन समाजाच्या उन्नतीसाठीही त्यांचे योगदान महत्त्वपूर्ण होते. सामाजिक प्रश्नांबाबतची त्यांची तळमळ, बारामतीच्या विकासाविषयीची आस्था आणि सर्वांना सोबत घेऊन काम करण्याची वृत्ती सदैव स्मरणात राहील. जवाहरशेठ यांचे पवार कुटुंबाशी अनेक वर्षांपासून जिव्हाळ्याचे आणि स्नेहाचे संबंध होते. त्यांच्या निधनाने आमच्या कुटुंबाने एक ज्येष्ठ स्नेही आणि मार्गदर्शक गमावला आहे, असे सुनेत्रा पवार यांनी नमूद केले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT