

Teachers constituency result : देशात चार राज्यांमध्ये विधानपरिषदेच्या शिक्षक व पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत भाजपच्या नेतृत्वाखालील एनडीएचा वरचष्मा दिसत आहे. महाराष्ट्रासह उत्तर प्रदेश, कर्नाटक आणि बिहारमधील २८ मतदारसंघात झालेल्या निवडणुकीचे निकाल आता हाती येऊ लागले आहे. या निकालामध्ये कर्नाटकमध्ये काँग्रेस आणि मुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांना मोठा धक्का बसला आहे.
कर्नाटकात चार मतदारसंघात झालेल्या निवडणुकीत बेंगलुरू शिक्षक मतदारसंघात काँग्रेसचा पराभव झाला आहे. एनडीएचे उमेदवार ए. पी. रंगनाथ यांनी विद्यमान आमदार पुट्टन्ना यांचा ९०८ मतांनी पराभव केला आहे. रंगनाथ यांना पहिल्या पसंतीची १० हजार ८१० मते मिळाली. तर पुट्टन्ना यांना ९ हजार ९०२ मतांवर समाधान मानावे लागले.
रंगनाथ हे जेडीएसचे उमेदवार होते. पुट्टना हे या मतदारसंघातून पाचवेळा निवडून आले होते. त्यामुळे त्यांचे पारडे जड मानले जात होते. तसेच राज्यात काँग्रेसची सत्ता असल्याने एनडीएला ही निवडणूक अवघड जाईल, असेच चित्र होते. मात्र, भाजप आणि जेडीएस आघाडीच्या एकत्रित मतांनी काँग्रेसला झटका दिला आहे.
पुट्टन्ना हे मुख्यमंत्री शिवकुमार यांचे विश्वासू मानले जातात. २०२३ मध्ये भाजपची आमदारकी सोडून ते काँग्रेसमध्ये दाखल झाले होते. त्यानंतर झालेल्या पोटनिवडणुकीत त्यांनी पुन्हा आमदारकी मिळविली होती. शिवकुमार यांनीच त्यांना काँग्रेसमध्ये आणले होते. भाजपमध्ये प्रवेश करण्याआधी ते जेडीएसचेही आमदार होते. त्यामुळे राज्यातील प्रमुख तीन पक्षांकडून आमदार होण्याची किमया पुट्टन्ना यांनी साधली होती.
शिवकुमार यांना झटका
शिवकुमार हे मुख्यमंत्रिपदी विराजमान झाल्यानंतर ही पहिलीच निवडणूक होती. त्यामुळे त्यांचा करिष्मा चालणार का, याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष होते. मात्र, पहिल्याच परीक्षेत ते फेल झाल्याचे मानले जात आहे. विद्यमान आमदाराचा पराभव त्यांच्यासाठी धक्का मानला जात आहे. त्याचप्रमाणे पश्चिम पदवीधर मतदारसंघातही भाजपची आघाडी आहे. काँग्रेसला सध्या चारपैकी केवळ एकाच मतदारसंघात आघाडी असल्याचे सध्याचे चित्र आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.