Maval NCP Rally Sarkarnama
पुणे

जयंतरावांनी पवारांसमोर सुनील शेळकेंचे कौतुक केले; पण आमदारांनी श्रेय दिले कार्यकर्त्यांना!

कोल्हापूरच्या सभेत जयंत पाटील यांनी आमदार सुनील शेळके यांचे कौतुक केले

उत्तम कुटे

पिंपरी : राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या (NCP) परिवार संवाद यात्रेची सांगता सभा कोल्हापुरात शनिवारी (ता. २४ एप्रिल) झाली. संवाद कार्यकर्त्यांशी, संवाद केंद्रबिंदूशी असे घोषवाक्य असलेल्या या संवाद यात्रेत तळेगाव दाभाडे (ता. मावळ, जि. पुणे) येथे झालेल्या विराट सभेचा खास उल्लेख कोल्हापूरच्या सांगता सभेत राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) यांनी केला. त्याबद्दल त्यांनी मावळचे आमदार सुनील शेळके (Sunil Shelke) यांच्या पाठीवर कौतुकाची थाप टाकली. मात्र, मावळमधील सभेचे श्रेय आमदार शेळके यांनी स्वतः न घेता पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांचे असल्याची प्रतिक्रिया दिली आहे. (Jayant Patil lauded MLA Sunil Shelke in Kolhapur Rally)

राष्ट्रवादी परिवार संवाद यात्रेची विराट सभा ता. २६ फेब्रुवारी रोजी नथूभाऊ भेगडे शाळेच्या मैदानावर झाली होती. त्या सभेत जयंत पाटील यांच्या जोडीने महिला प्रदेशाध्यक्ष रूपाली चाकणकर यांचीही तोफ धडाडली होती. त्यातून मावळात पक्षात नवचैतन्य संचारले होते, त्याचा प्रत्यय नंतर पक्षात झालेले इनकमिंग आणि देहू नगरपालिकेत आलेल्या सत्तेतून आला होता.

अशा अनेक सभा या संवाद यात्रेदरम्यान विधानसभा मतदारसंघनिहाय तालुका, तालुक्यांत झाल्या होत्या. मात्र, त्यातील तळेगाव दाभाडेची सभा खूपच उजवी होती. विराट होती. त्यामुळे तिचा खास उल्लेख कालच्या संवाद यात्रेच्या समारोपात जयंत पाटील यांनी खास केला. अनेकांनी अशा सभा घेतल्या. त्यातून राज्यात पक्ष किती भक्कम आहे, हे दाखवून दिले. त्यााबद्दल वेळेची मर्यादा लक्षात घेऊन त्या सर्वांचा उल्लेख करू शकणार नाही, असे ते म्हणाले. पण, शेळकेंची सभा एवढी प्रचंड झाली, या शब्दांत त्यांनी आमदार शेळके यांचे कौतुक केले. त्यावेळी व्यासपीठावरील शेळके यांनी उभे राहून हात जोडून या कौतुकाचा स्वीकार केला. हा सन्मान मावळ तालुक्यातील पक्ष पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांचा असल्याची प्रतिक्रिया आमदार शेळके यांनी आज ‘सरकारनामा‘ला दिली.

याच सभेत पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांचा खरपूस समाचार घेतला. तसेच, शाहू-फुले-आंबेडकर यांचेच भाषणात नाव का घेता म्हणणारे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनाही पवारांनी नाव न घेता टोला लगावला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT