Jayant Patil  Sarkarnama
पुणे

Jayant Patil News : राष्ट्रवादी कुणाची? हे शेंबड्या पोराला विचारलं, तरी ते सांगेल...; आयोगाने यात बदल केला तर...

उत्तम कुटे

Pimpri : राष्ट्रवादी काँग्रेसमधील फुटीनंतर पक्ष व घड्याळ हे निवडणूक चिन्ह कुणाचे यावर सर्वोच्च न्यायालय आणि केंद्रीय निवडणूक आय़ोगात सुनावणी होणार आहे. मात्र, तेथील निर्णयापूर्वीच शरद पवार राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी आपला निर्णय आजच सांगून टाकला. महाराष्ट्रातील शेंबड्या पोराला, जरी विचारलं की राष्ट्रवादी कुणाची, तरी ते सांगेल की ती शरद पवारांची असे सांगत त्यांनी आपल्या परीने या प्रश्नाचा निकाल लावून टाकला. "केंद्रीय निवडणूक आयोगाने यात बदल केला, तर महाराष्ट्रातील जनता ते सहन करणार नाही," असा इशाराही त्यांनी दिला.

तळेगाव (ता. मावळ) एमआयडीसीतील जनरल मोटर्स ही कंपनी दोन वर्षांपूर्वी व्यवस्थापनाने बंद केल्याने तेथील एक हजार कामगार बेकार झाले आहेत. ही कंपनी ह्युंदाई मोटर्सला विकण्यात आली, पण त्यांनी जुन्या कामगारांना कामावर घेतले नाही. त्यामुळे त्यांनी कुटुंबासह गांधी जयंतीपासून (ता. २) जुन्या पुणे-मुंबई महामार्गालगत एमआयडीसीच्या प्रवेशद्वारावर साखळी उपोषण सुरू केले आहे. आंदोलनाच्या आठव्या दिवशी त्यांची पाटील यांनी आज भेट घेऊन त्यांना आपल्या पक्षाचा पाठिंबा जाहीर केला. त्यांच्या लढ्याला मदत करण्याचे आश्वासनही दिले. त्यानंतर मीडियाशी बोलताना त्यांनी वरील इशारा दिला.

क्लोझरची नोटीस देऊन कंपनी बंद करण्याचा हा निर्णय बेकायदेशीर असूनही राज्य सरकार आणि प्रशासन डोळे झाकून गप्प असल्याबद्दल पाटील यांनी संताप व्यक्त केला.आठ दिवस झाले, तरी आंदोलनस्थळी सरकारच्या वतीने कोणी आले नसल्याकडे त्यांनी लक्ष वेधले. त्यामुळे विधानसभेत हा प्रश्न मांडणार आहे, पण त्यापूर्वीच सरकारने तो निकाली काढला पाहिजे, असे ते म्हणाले. १० तारखेपर्यंत हा प्रश्न मार्गी लावला नाही, तर ११ तारखेला तळेगाव एमआयडीसी बंद करू, असा इशारा दिलेले स्थानिक आमदार, अजित पवार गटाचे सुनील शेळके यांच्या वक्तव्याची त्यांनी खिल्ली उडवली. आता सत्तेत जाऊन बसलेल्या शेळकेंनी इथे आंदोलन करण्यापेक्षा याप्रश्नी चुकीचे निर्णय घेणाऱ्या मंत्र्यांना जाऊन सुनावले, तर मावळकरांना आनंद होईल, असा टोला त्यांनी लगावला.

मावळातील वेदांत-फॉक्सकॉन हा दीड लाख कोटी रुपये गुंतवणुकीचा व दोन लाख रोजगार क्षमतेचा प्रकल्प गुजरातला जाण्यावरही पाटील यांनी कडक शब्दांत सुनावले. गुजरातधार्जिण्या विचाराची माणसे राज्यात सत्तेत असल्याने गुजरातधार्जिणे निर्णय घेण्यात आले, अशा शब्दांत त्यांनी राज्यातील महायुती सरकारवर हल्लाबोल केला. साठ वर्षांवरील निवृत्तांना कंत्राटी पद्धतीने कामावर घ्यायचे आणि तरुणांना वंचित ठेवण्याच्या राज्य सरकारच्या धोरणावरही त्यांनी कडा़ड़ून टीका केली. हे धोरण म्हणजे कंत्राटी पद्धतीने काम देऊ, पण तरुणांना ते देणार नाही, अशी राज्य सरकारची नीती आहे का, अशी विचारणा त्यांनी केली.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT