Harshvardhan Patil  Sarkarnama
पुणे

Indapur News: हर्षवर्धन पाटलांचा गेम सेट, 'कर्मयोगी'वर पुन्हा पाटीलराज? या 'अटी'मुळे विरोधक गारद,चार जागा बिनविरोध

Karmayogi Sugar Factory Election: इंदापूरच्या कर्मयोगी साखर कारखाना निवडणुकीत हर्षवर्धन पाटील गटाचे पारडे जड झाले आहे. छाननीत ११ अर्ज बाद झाले असून चार जागांवर बिनविरोध निवडीची शक्यता निर्माण झाली आहे.

Sudesh Mitkar

Karmayogi Sugar Factory Election News : इंदापूर तालुक्यातील कर्मयोगी शंकरराव पाटील सहकारी साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीत माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या नेतृत्वाखालील सत्ताधारी गटाचे वर्चस्व कायम राहण्याची चिन्हे आहेत. उमेदवारी अर्जांच्या छाननीत ५१ पैकी ११ अर्ज बाद झाल्याने ४० अर्ज वैध ठरले आहेत.

त्यातच शेळगाव गटातील तीन आणि अनुसूचित जाती-जमाती प्रवर्गातील एक अशा चार जागांवरील निवड बिनविरोध होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. भिगवण गटासह ‘ब’ वर्ग सहकारी संस्था व पणन मतदारसंघातही बिनविरोध निवडीची शक्यता असल्याने कारखान्याच्या निवडणुकीत पाटील गटाचे पारडे जड झाल्याचे चित्र आहे.

कारखान्याच्या निवडणुकीत सत्ताधारी गटासमोर तगडे आव्हान उभे राहणार का, याची उत्सुकता होती. मात्र, प्रमुख विरोधकांनी निवडणुकीपासून अंतर राखल्याने पाटील गटाला अनुकूल परिस्थिती निर्माण झाली आहे. कारखान्याची आर्थिक स्थिती, सलग तीन वर्षे ऊसपुरवठ्याची अट आणि तालुक्यातील बदलती राजकीय समीकरणे यांचा निवडणुकीवर परिणाम होताना दिसत आहे. त्यामुळे निवडणूक चुरशीची होण्याऐवजी बिनविरोध किंवा एकतर्फी होण्याची शक्यता बळावली आहे.

कारखान्याच्या निवडणुकीसाठी १२ ऑक्टोबरपासून उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सुरू झाली होती. १६ ऑक्टोबरपर्यंत एकूण ५१ अर्ज दाखल झाले. त्यानंतर १९ ऑक्टोबर रोजी झालेल्या छाननीत सलग तीन वर्षे कारखान्याला ऊसपुरवठा करण्याच्या अटीमुळे ११ अर्ज बाद झाले. त्यामुळे वैध अर्जांची संख्या ४० वर आली. आता उमेदवारी अर्ज माघारीच्या प्रक्रियेनंतर प्रत्यक्ष निवडणुकीचे चित्र स्पष्ट होणार आहे.

शेळगावमध्ये तीन जागांवर बिनविरोध निवडीची शक्यता

शेळगाव ऊस उत्पादक गटातील तीन जागांसाठी रोहित राजेंद्र गायकवाड, बिभीषण कल्याण नलवडे आणि अतुल शिवाजी शिंगाडे यांचेच अर्ज वैध राहिले आहेत. त्यामुळे या तिन्ही जागांवर बिनविरोध निवडीची शक्यता आहे. त्याचबरोबर अनुसूचित जाती-जमाती प्रवर्गातील एका जागेसाठी अमोल सुभाष जाधव यांचा एकमेव अर्ज वैध ठरला आहे. त्यामुळे या जागेवरही बिनविरोध निवडीचा मार्ग मोकळा झाला आहे.

भिगवणमध्ये जाधव कुटुंबाच्या उमेदवारीची चर्चा

भिगवण गटातील तीन जागांसाठी चार अर्ज वैध ठरले आहेत. या गटात पराग जाधव आणि त्यांच्या मातोश्री प्रमिला जाधव या दोघांचेही अर्ज असल्याने उमेदवारी माघारीच्या प्रक्रियेकडे लक्ष लागले आहे. माघारीनंतर या गटात निवडणूक होणार की बिनविरोध निवडीचा मार्ग मोकळा होणार, हे स्पष्ट होईल.

दुसरीकडे, ‘ब’ वर्ग सहकारी संस्था व पणन मतदारसंघात माजी मंत्री हर्षवर्धन पाटील आणि त्यांचे पुत्र राजवर्धन पाटील यांचेच अर्ज वैध राहिल्याने या मतदारसंघातील जागेवरही बिनविरोध निवडीची शक्यता व्यक्त केली जात आहे.

विरोधकांची माघार की सत्ताधारी गटाची रणनीती?

कारखान्याच्या निवडणुकीत सत्ताधारी पाटील गटाने पूर्ण पॅनेल उभे केले असताना प्रमुख विरोधकांकडून प्रभावी आव्हान उभे राहिलेले नाही. त्यामुळे सत्ताधारी गटासाठी निवडणुकीचा मार्ग तुलनेने सोपा झाल्याचे दिसत आहे. मात्र, अर्जांची छाननी झाल्यानंतरचे चित्र आणि उमेदवारी माघारीनंतरचे अंतिम समीकरण यात बदल होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

आता माघारीच्या प्रक्रियेत किती उमेदवार रिंगणात राहतात आणि किती जागा बिनविरोध होतात, यावर निवडणुकीची दिशा ठरणार आहे. प्रमुख विरोधकांच्या अनुपस्थितीत कर्मयोगी कारखान्यावर पाटील गटाचे वर्चस्व कायम राहणार का, याचे उत्तर माघारीनंतर स्पष्ट होईल.

छाननीनंतर गटनिहाय वैध अर्ज

इंदापूर गट : ७

कालठण गट : ८

पळसदेव गट : ८

भिगवण गट : ४

शेळगाव गट : ३

महिला प्रवर्ग : ३

अनुसूचित जाती-जमाती प्रवर्ग : १

मागास प्रवर्ग : २

भटक्या जमाती प्रवर्ग : २

‘ब’ वर्ग सहकारी संस्था व पणन मतदारसंघ : २

एकूण वैध उमेदवारी अर्ज : ४०

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT