Katraj Dairy Controversy Sarkarnama
पुणे

Katraj Dairy News: कात्रज डेअरीत सत्तासंघर्ष टोकाला! राजीनामा न दिल्याने उपाध्यक्षांची कार जप्त

Katraj Dairy Controversy: कात्रज डेअरीतील अंतर्गत राजकीय संघर्ष चव्हाट्यावर आला असून उपाध्यक्ष मारुती जगताप यांनी राजीनामा न दिल्याने प्रशासनाने त्यांची अधिकृत कार काढून घेतली आहे.

Sudesh Mitkar

Pune News: पुणे जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ अर्थात 'कात्रज डेअरी'मधील अंतर्गत राजकीय वाद आता चव्हाट्यावर आला आहे. डेअरीचे उपाध्यक्ष मारुती जगताप यांना संघाकडून देण्यात आलेली 'इनोव्हा' ही चारचाकी मोटार अखेर काढून घेण्यात आली आहे.

संचालक मंडळाच्या बैठकीत झालेल्या ठरावानुसार प्रशासनाने ही मोठी कारवाई केली आहे. जप्त केलेले वाहन संघाच्या मुख्यालयात जमा करण्यात आले आहे.

वरिष्ठांनी सांगून देखील राजीनामा नाहीच

कात्रज डेअरीच्या अध्यक्षपदाच्या बदलानंतर उपाध्यक्षही बदलण्याचा सूर पहिल्या दिवसापासून संचालक मंडळात आवळला जात होता. मात्र, अध्यक्ष बदलूनही उपाध्यक्ष मारुती जगताप यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला नाही. जगताप यांच्या या भूमिकेची उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने अत्यंत गंभीर दखल घेतली आहे.

मागील आठवड्यात झालेल्या संचालक मंडळाच्या बैठकीदरम्यान जगताप यांचे वाहन काढून घेण्याचा ठराव मंजूर करण्यात आला होता. या बैठकीबाहेर सुनेत्रा पवार यांचे एक विशेष कार्यकारी अधिकारी देखील उपस्थित होते. त्यांनीही या विषयावर चर्चा केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. त्यानंतर गुरुवारपर्यंत जगताप राजीनामा देतील अशी चिन्हे होती. मात्र त्यांनी अद्याप राजीनामा दिलेला नाही. त्यानंतर गाडी काढून घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे संचालक मंडळ पुन्हा एकदा पवार यांची भेट घेऊन पुढील रणनीती ठरवणार असल्याचे समजते.

आमदार योगेश टिळेकरांची विधान परिषदेत 'लक्षवेधी'

एकीकडे कात्रज डेअरीमध्ये अंतर्गत राजकीय नाट्य सुरू असतानाच, दुसरीकडे भाजपचे आमदार योगेश टिळेकर यांनी कात्रज डेअरीच्या कारभारावर विधान परिषदेत लक्षवेधी सूचना मांडली आहे. त्यामुळे प्रशासनाचे धाबे दणाणले आहेत. कात्रज दूध संघातील आर्थिक गैरव्यवहार आणि गैरव्यवस्थापनाची चौकशी व्हावी. तसेच कात्रजच्या नवीन प्रकल्पाकरिता कन्सल्टंट नियुक्त करून दिलेली मोठी रक्कम आणि त्यातील संशयास्पद व्यवहार बाबत प्रश्न विचारण्यात आले आहेत.

२०२२ मध्ये सरकारने नेमलेल्या चौकशी समितीने पुढे कोणतीही ठोस कारवाई केली नाही. तसेच आतासुद्धा दोन सदस्यांची समिती नेमून चौकशी आदेशावर कोणतीही कारवाई झालेली नाही असाही सवाल यावर उपस्थित करण्यात आला आहे. या प्रकरणावरील लक्षवेधीवर आज सविस्तर चर्चा अपेक्षित आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT