

इंद्रायणी नदीची पाणीपातळी धोक्याच्या वर; आळंदीत पूरस्थिती गंभीर
सुमारे 250 वारकरी अडकल्याची माहिती, बचावकार्य युद्धपातळीवर सुरू
नागरिकांच्या सुरक्षेसाठी इंद्रायणीवरील चार पूल तात्पुरते बंद
प्रशासनाचे आवाहन; नदीकाठ, पूल आणि प्रतिबंधित भागात जाणे टाळा
Pune News: मुसळधार पावसामुळे इंद्रायणी नदीच्या पाणीपातळीत मोठी वाढ झाली असून नदीने धोक्याची पातळी ओलांडली आहे. पाणी सातत्याने वाढत असल्याने आळंदी परिसरात गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, सुमारे 250 नागरिक विविध ठिकाणी अडकले असून त्यांना सुरक्षितस्थळी हलवण्यासाठी आपत्ती व्यवस्थापन विभागाकडून युद्धपातळीवर बचावकार्य सुरू करण्यात आले आहे.
नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने प्रशासनाने आळंदी शहरातील इंद्रायणी नदीवरील चार पूल तात्पुरते बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. भाविक, वारकरी आणि स्थानिक नागरिकांनी प्रशासनाच्या सूचनांचे पालन करून सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
वाढत्या पाणीपातळीमुळे नागरिकांनी नदीपात्र, नदीकाठ किंवा पूल परिसरात जाणे टाळावे, असे स्पष्ट निर्देश प्रशासनाने दिले आहेत. बंद करण्यात आलेल्या पुलांवरून किंवा प्रतिबंधित भागातून जाण्याचा प्रयत्न करू नये, अन्यथा धोका वाढू शकतो, असा इशाराही देण्यात आला आहे.
दरम्यान, नागरिकांनी अफवांवर विश्वास न ठेवता केवळ प्रशासनाकडून जारी करण्यात येणाऱ्या अधिकृत माहितीलाच प्राधान्य द्यावे, असे आवाहन करण्यात आले आहे. सर्वांनी सतर्क राहून स्वतःची आणि इतरांची सुरक्षितता जपण्यासाठी प्रशासनाला सहकार्य करावे, असेही प्रशासनाने म्हटले आहे.
आळंदी नगरपरिषदेचे मुख्याधिकारी माधव खांडेकर यांनी ही सार्वजनिक सूचना जारी केली असून परिस्थिती लक्षात घेता आवश्यक ती खबरदारी घेण्याचे आवाहन नागरिकांना करण्यात आले आहे.
इंद्रायणी ला आलेल्या पुरामुळे आज सकाळी आळंदी विविध धर्मशाळा तसेच दर्शन मंडपातील अडकलेले अडीचशे वारकऱ्यांना आता नगर परिषदेच्या आपत्कालीन विभागाकडून सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आले आहेत.
इंद्रायणी काठावरील वारीसाठी महिलांना कपडे बदलण्यासाठी तयार केलेला दोन चेंजिंग रूम पाण्यामध्ये वाहून गेल्या. दर्शन मंडपाची दर्शन बारी पुराच्या पाण्यात वाहून गेली. त्याचबरोबर जुन्या व नवीन पुलाच्या संरक्षण कठडे आणि त्याला बसवण्यात आलेली जाळी बऱ्याच प्रमाणात वाहून गेले आहेत.
संत ज्ञानेश्वर माऊलीच्या मंदिर परिसरातील पश्चिम बाजूकडील शनी मंदिर परिसरात प्रसाद विक्रेते दुकानदारांच्या दुकानांमध्ये पुराचे पाणी शिरले आहे. यामुळे हजारो रुपयांचे नुकसान झाले.
ज्ञानेश्वरी मंदिर जोडणारा पूल पाण्याखाली आहे. देहू फाटा ते चाकण रस्ता जोडणारा गरुड स्तंभाजवळील पूल पाण्याखाली आहे. आळंदी नगरपरिषद चौक ते देहू फाटा जोडणारा जुना व नवीन पूल दोन्ही पाण्याखाली आहेत. आळंदी चऱ्होली बाह्य वळण मार्गावरील पुलाच्या कठड्या पर्यंत पाणी लागले असून या ठिकाणी कमी अधिक प्रमाणात वाहतूक सुरू आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.