Pune News : आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय पक्षांमध्ये इनकमिंग वाढले आहे. त्यामुळे स्थानिक पातळीवर दिवसागणिक समीकरण बदलत आहेत. यात पुण्यात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि मंत्री उदय सामंत यांच्या उपस्थितीत शिवसेनेत मोठ्या पक्षाचा विलिनीकरण कार्यक्रमच पार पडला. यामुळे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आक्रमक नेते वसंत मोरे यांना कात्रजमध्येच थांबवण्याची तयारी शिवसेनेने केली असल्याचे बोलले जाते.
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून 'मिशन पुणे' लॉन्च करण्यात आले आहे. त्याअंतर्गत पक्षाने महापालिका निवडणूक जाहीर होण्यापूर्वीच इच्छुकांच्या मुलाखती घेतल्या आहेत. ठाकरेंच्या पक्षाने पुण्यामध्ये 50 हून अधिक जागा जिंकण्याचं लक्ष ठेवलं आहे. हे लक्ष साध्य करण्याची महत्त्वाची जबाबदारी वसंत मोरे यांच्याकडे देण्यात आली आहे. वसंत मोरे यांनी देखील आगामी निवडणुकीतनंतर महापालिकेत ठाकरे सेनेचाच विरोधी पक्ष नेता असेल असे जाहीर केले आहे.
दुसरीकडे शिवसेनेतही पुण्यामध्ये मोठ्या प्रमाणात पक्ष प्रवेश करण्यात येत असल्याचं पाहायला मिळत आहे. सुरुवातीला काँग्रेसमधील माजी आमदार रवींद्र धंगेकर यांना शिंदेंनी आपल्या पक्षात घेतलं. त्यांना आगामी महापालिकेच्या दृष्टिकोनातून महत्वाची जबाबदारी देणार असल्याचे देखील संकेत दिले आहे. त्यानंतर आता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कात्रज विकास आघाडी हा अख्खा पक्षच शिवसेनेत विलीन करून घेतला आहे.
कात्रज विकास आघाडीचे संस्थापक नमेश बाबर, स्वराज बाबत यांच्यासह कात्रज विकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी शिवसेनेमध्ये प्रवेश केला आहे. कात्रज विकास आघाडीने लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाला पाठिंबा दर्शवला होता. तसंच विकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी आणि पदाधिकाऱ्यांनी खासदार सुप्रिया सुळे, खासदार अमोल कोल्हे आणि विधानसभेला शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचे उमेदवार असलेले प्रशांत जगताप आणि सचिन दोडके यांचं काम केलं होतं. त्यामुळे एक प्रकारे हा शरद पवारांच्या राष्ट्रवादीला देखील धक्का असल्यास बोललं जात आहे.
2007 च्या निवडणुकीपासून कात्रज विकास आघाडीच्या नेत्यांनी वसंत मोरे यांना कडवं आव्हान दिलं होतं. वसंत मोरे यांचे कट्टर विरोधक म्हणून कात्रज विकास आघाडीचे नेत्यांची ओळख आहे. आता वसंत मोरे यांचे कट्टर विरोधक असलेल्या नेत्यांनी पक्षात प्रवेश केल्याने वसंत मोरे यांच्या प्रभागातील अडचणी वाढल्या आहेत. त्यामुळे त्यांना निवडणूक लढवून जिंकण्यासाठी प्रभागातूनच मोठा संघर्ष करावा लागणार असल्याचं बोललं जात आहे. आता या रणनीतीला वसंत मोरे कसा शह देणार याकडे सर्वांचेच लक्ष आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.