Ritesh Hange_Ketan Agarwal Murder Case 
पुणे

Ketan Agarwal Death Case: केतन अग्रवाल हत्या प्रकरणात तिसऱ्या आरोपीची एन्ट्री! 'त्या' डिलीट चॅटने उडवली झोप

Ketan Agarwal Death Case: सिया-चेतनच्या कटाची माहिती होती? ‘डिलीट चॅट’ रिकव्हर होताच रितेश हांगे पोलिसांच्या जाळ्यात

Sudesh Mitkar

Ketan Agarwal Death Case: लोणावळ्यातील लोहगडावरून केतन अग्रवाल या तरुणाला दरीत ढकलून हत्या केल्याच्या प्रकरणात पुणे ग्रामीण पोलिसांनी आणखी एक मोठी कारवाई केली आहे. मुख्य आरोपी सिया गोयल आणि चेतन चौधरी यांच्यानंतर आता त्यांचा वर्गमित्र रितेश हांगे याला पोलिसांनी अटक केली आहे. या कारवाईमुळे प्रकरणात तिसरी अटक झाली असून, हत्येचा कट माहिती असतानाही तो पोलिसांपासून लपवून ठेवल्याचा आरोप रितेशवर आहे.

या प्रकरणाच्या तपासात पोलिसांच्या हाती आलेल्या डिलीट केलेल्या व्हॉट्सॲप चॅटने महत्त्वाची भूमिका बजावल्याचे समोर आले आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, सिया आणि चेतन यांनी केतनच्या हत्येचा कट रचला होता, याची माहिती रितेशला होती. १८ जून रोजी केतनला लोहगडावर नेण्याच्या कटात सहभागी होण्यासाठी त्यालाही सोबत येण्यास सांगण्यात आले होते. मात्र, रितेशने प्रत्यक्ष लोहगडावर जाणे टाळले.

मात्र, गुन्हा घडल्यानंतरही रितेशचा चेतन आणि सियासोबत संपर्क कायम होता. तपासाची दिशा पोलिसांकडे जाऊ नये, यासाठी त्याने चेतनसोबत झालेले व्हॉट्सॲप संभाषण डिलीट केल्याचा आरोप आहे. मात्र, सायबर तज्ज्ञांच्या मदतीने पोलिसांनी हे डिलीट केलेले चॅट रिकव्हर केले. त्यातून रितेशचा आरोपींशी असलेला संपर्क आणि त्याला या कटाची माहिती असल्याचे तपासात समोर आल्याने पोलिसांनी त्याला अटक केली.

रितेश हांगे हा मूळचा बीड जिल्ह्यातील असून सध्या पुण्यातील बालेवाडी परिसरात एका खासगी कंपनीत नोकरी करत होता. सिया, चेतन आणि रितेश हे तिघेही एकाच वर्गात शिकत असल्याने त्यांच्यात जवळची मैत्री होती. याच मैत्रीचा फायदा घेत हत्येचा कट रचण्यात आला का? याचाही तपास पोलिसांकडून केला जात आहे.

रितेशला वडगाव मावळ न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्याला १२ सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. त्याच्या चौकशीतून केतनच्या हत्येच्या कटाबाबत आणखी महत्त्वाची माहिती आणि पुरावे समोर येण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे.

नेमकं काय घडलं होतं?

पुण्यातील ‘सक्सेस ग्रुप’ या रिअल इस्टेट कंपनीचा संचालक असलेल्या २६ वर्षीय केतन अग्रवाल याचा २० वर्षीय सिया गोयल हिच्यासोबत साखरपुडा झाला होता. नोव्हेंबरमध्ये दोघांचा विवाह होणार होता. मात्र, १८ जून २०२६ रोजी सियाने स्वतःचा वाढदिवस असल्याचे कारण देत केतनला ट्रेकिंगसाठी लोहगडावर नेले.

पोलिसांच्या तपासानुसार, लोहगडावर पोहोचल्यानंतर सियाने तिचा प्रियकर चेतन चौधरी याच्या मदतीने केतनला दरीत ढकलले. सुरुवातीला केतनचा पाय घसरून तो दरीत पडल्याचा बनाव करण्यात आला. मात्र, लोहगडावरील सीसीटीव्ही फुटेज तपासताना चेतन संशयास्पदरीत्या वावरताना दिसून आला आणि पोलिसांचा संशय बळावला.

तपासाची चक्रे वेगाने फिरल्यानंतर सिया आणि चेतन यांच्याकडून हत्येचा कट उघड झाल्याचे पोलिसांनी सांगितले. प्रेमसंबंधात केतन अडथळा ठरत असल्याने त्याला संपविण्याचा निर्णय घेतल्याचे तपासात समोर आले.

आता रितेशच्या अटकेनंतर केतन हत्या प्रकरणातील कटात आणखी कोणाचा सहभाग होता का? डिलीट चॅटमध्ये नेमके काय दडले आहे? आणि हत्येपूर्वी आरोपींमध्ये कोणत्या हालचाली सुरू होत्या? याचा तपास पोलिसांकडून सुरू आहे. त्यामुळे रितेशची चौकशी या प्रकरणाच्या तपासातील पुढील महत्त्वाचा टप्पा ठरण्याची शक्यता आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT