Pune News: पुण्यासह राज्यभरात खळबळ उडवलेल्या पुण्यातील बांधकाम व्यावसायिक केतन अग्रवाल हत्याकांडाला एक महिना पूर्ण झाला आहे. या हत्येला एक महिना पूर्ण होत असतानाच केतनचे वडील विशाल अग्रवाल यांनी पत्रकार परिषद घेत गंभीर आरोप केले होते. त्यांनाही पत्रकार परिषदेत अश्रू अनावर झाले होते. आता दुसर्याच दिवशी केतन अग्रवाल हत्येप्रकरणातील मुख्य आरोपी असलेल्या सिया गोयलच्या वडीलही माध्यमांसमोर ढसाढसा रडल्याचं पाहायला मिळालं. याचवेळी त्यांनी धक्कादायक विधानही केलं आहे.
गेल्या महिन्याभरापासून पुणे ग्रामीण पोलिसांकडून तपासाद्वारे या प्रकरणाची सर्वपाळमुळं खोदून काढली जात आहे. लोहगडावरुन ढकलून देत हत्या करण्यात आलेल्या केतन अग्रवाल प्रकरणात मुख्य आरोपी सिया गोयल आणि तिचा प्रियकर चेतन चौधरी यांच्याबाबत रोज धक्कादायक खुलासे समोर येत आहे. अशातच सियाचे वडीलही माध्यमांसमोर आले आहेत.
लोहगड केतन अग्रवाल हत्या प्रकरणात सिया गोयल व तिचा प्रियकर चेतन चौधरी यांना पुन्हा 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी ठोठावली आहे. यानंतर सिया गोयलचे वडील प्रवीण गोयल यांनी माध्यमांसमोर संवाद देताना एकीकडे मुलीबाबत कठोर भूमिका घेतानाच दुसरीकडे भावनिक झाल्याचंही दिसून आलं.
एकीकडे मुलगी सियाचे एकापाठोपाठ एक कांड समोर येत असतानाच दुसरीकडे अन्न आणि औषध प्रशासनानं (FDA)मार्केटयार्ड येथील प्रवीण गोयल यांच्या दुकानावर दोन दिवसांपूर्वी छापेमारीची कारवाई केली. या कारवाईत तब्बल 8 लाखांपेक्षा जास्त किमतीचा संशयास्पद आणि विनापरवाना साठा जप्त केला. एफडीएचे आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या नेतृत्वात अन्न आणि औषध प्रशासन विभागाच्या पुणे झोन-1 ने ही कारवाई केली आहे.
सियाचे वडील प्रवीण गोयल यांनी अन्न व औषध प्रशासन विभागानं केलेल्या या कारवाईनंतर भावनिक प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले, माझी मुलगी दोषी असेल, तर तिला फाशी द्या, पण आमच्या निष्पाप कुटुंबाला असा मानसिकदृष्ट्या त्रास देऊ नका असं आवाहन त्यांनी केलं आहे.
प्रवीण गोयल यांनी त्यांच्या कुटुंबाला लक्ष्य केले जात असल्याचा आरोप केला. ते म्हणाले, 'मी न्यायव्यवस्था आणि कायद्याचा आदर करतो. तपासालाही आम्ही सहकार्य करत आहोत. मात्र, तरीही माझ्या कुटुंबाला वारंवार लक्ष्य केले जात आहे. मलाच फाशी दिली जात आहे, अशी संतप्त प्रतिक्रियाही त्यांनी यावेळी दिली. माझे कुटुंबीय आणि मी बऱ्याच काळापासून तणावात आहोत असंही त्यांनी म्हटलं.
प्रवीण गोयल यांनी माझी मुलगी खरंच दोषी असेल, तर तिला फासावर लटकवा. पण त्याची शिक्षा माझा मुलगा साहिल, पत्नी आणि मला का देण्यात येत आहे, अशी भूमिका मांडली. मात्र आता आम्हाला असं वाटतं की, माझ्या कुटुंबालाच फाशी देण्यात येत आहे. रोज काही ना काही विषय पुढे करून कुटुंबाला त्रास देण्याचा प्रयत्न होत आहे, असा खळबळजनक आरोपही प्रवीण गोयल यांनी यावेळी करत थेट FDA च्या कारवाईवरच प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.
केतनचे वडील विशाल अग्रवाल यांना एकीकडे आपल्या मुलाला न्याय मिळावा अशी मागणी करताना अश्रू अनावर झाले होते. तर दुसरीकडे सियाचे वडील यांनी अशा कारवायांमुळे त्यांचं संपूर्ण कुटुंब चिंतेत असल्याचं म्हटलं आहे.
मात्र, एफडीएनं या कारवाईचा केतन अग्रवाल खून प्रकरणाशी कोणताही संबंध नसल्याचं स्पष्ट केलं आहे. तसेच ही कारवाई एक नियमित प्रक्रियेतंर्गत केल्याचेही एफडीएनं म्हटलं आहे. ही कारवाईविना परवाना गोदामात माल ठेवणे, लेबलिंग नियमांचे उल्लंघन, खाद्य पदार्थांचा दर्जा, गुणवत्ता याविषयीची शंका यामुळे करण्यात आल्याचं नमूद केलं आहे.
एफडीएच्या अधिकार्यांनी 14 जुलै रोजी पुणे येथील मार्केट यार्डमधील बीजी गोयल अँड कंपनीवर छापा मारला होता. तसेच, दुकान तात्काळ बंद करण्याचे आदेश दिले आहेत. एफडीएला या कारवाईत सुमारे 4172 किलोचा संशयास्पद व निकृष्ट दर्जाचा अन्नसाठा आढळून आला. जो जप्त करण्यात आला आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.