Khed Bazar Committee Election Sarkarnama
पुणे

Dilip Mohite: विधानसभेच्या रंगीत तालमीत अजितदादांच्या आमदाराचा पराभव; बाजार समिती हातातून निसटली

सरकारनामा ब्यूरो

Pimpri News: खेड तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापती,उपसभापतीच्या गुरुवारी (ता.१०) झालेल्या निवडणुकीत (Khed Bazar Committee Election) विद्यमान आमदार अजित पवार राष्ट्रवादीचे दिलीप मोहिते पाटील (MLA Dilip Mohite) यांना विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर जोरदार धक्का बसला.

पराभव होणार हे स्पष्ट झाल्याने त्यांच्या गटाने या निवडणुकीत भागच न घेतल्याने ती बिनविरोध झाली. त्यांच्य़ा कट्टर विरोधकांचे सभापती, उपसभापती झाले. या निवडणूक निकालाचे परिणाम आगामी विधानसभेला खेडमध्ये उमटणार आहेत.

दहा वर्षानंतर मोहिते विरोधकांची एकजूट पुन्हा यशस्वी झाली. त्यामुळे येत्या विधानसभेला मोहितेंची वाट बिकट होणार आहे. २०१४ च्या विधानसभेला सारे मोहिते विरोधक झाडून एकत्र आल्याने मोहितेंचा त्यावेळी पराभव झाला होता. त्यानंतर त्यांनी गेल्यावर्षी झालेल्या तालुका बाजार समिती संचालकांच्या निवडणुकीत पुन्हा असा प्रयत्न त्यांच्या विरोधकांनी केला. मात्र,तो फोल ठरला.

मोहितेंच्या श्री.भीमाशंकर शेतकरी सहकारी पॅनेलने १०-८ अशी बाजी मारली. त्यामुळे त्यांचेच सभापती आणि उपसभापती झाले होते. प्रत्येक संचालकाला संधी मिळावी म्हणून एका वर्षानंतर सभापती,उपसभापतींनी राजीनामा देण्याचे ठरले होते. त्यानुसार सभापती कैलास लिंभोरे,उपसभापती विठ्ठल वनघरे यांनी राजीनामा दिल्यानंतर ही निवडणूकआज झाली.

वर्षभरात बाजार समितीतील मोहितेंच्या सत्तेला हादरे बसले. त्यांचे तीन संचालक विरोधी गटाला येऊन मिळाले.आणखी काही त्या मार्गावर होते. म्हणून ही निवडणूक होऊ न देण्याचा प्रयत्न मोहितेंनी केला. त्यावर स्थगिती आणली. मात्र,त्याविरोधात त्यांचा विरोधी गट हा मुंबई उच्च न्यायालयात गेला. त्यांचे म्हणणे मान्य झाल्याने या निवडणुकीला हिरवा कंदिल मिळाला होता.

आज मोहितेंचे फक्त चारच संचालक निवडणुकीच्या ठिकाणी आल्याने पराभव होणार हे स्पष्ट झाले. त्यामुळे त्यांचा गट निवडणुकीत सामील झाला नाही. परिणामी ही निवडणूक बिनविरोध झाल्याचे या निवडणुकीचे निर्णय अधिकारी सचिन सरसमकर यांनी जाहीर केले. विजय शिंदे सभापती,तर क्रांती सोमवंशी उपसभापती म्हणून बिनविरोध निवडून आल्या. त्यानंतर त्यांची जल्लोषात मिरवणूक निघाली.

बाजार समितीची निवडणूक ही आमदारकीची रंगीत तालीम समजली जाते. आता तालुक्याचे सत्ताकेंद्र असलेली समिती हातातून गेल्याने आमदार मोहितेंना आगामी विधानसभेला जास्त कष्ट घ्य़ावे लागणार आहेत. तर,यामुळे विरोधकांना पुन्हा आत्मविश्वास आला असून या नव्या मिळालेल्या बळातून २०१४ ची पुनरावृत्ती करू,असा दावा त्यांनी केला आहे.

२०१४ ला ते एकत्र आल्याने मोहितेंचा त्यावेळी पराभव झाला होता. मात्र, २०१९ ला ते पुन्हा विखुरल्याने मोहिते पुन्हा आमदार झाले. त्याची पुनरावृत्ती गेल्यावर्षी बाजार समितीत झाली होती. त्या पराभवाचे उट्टे विरोधकांनी आज काढले. त्यांना जिल्हा बॅंक,जिल्हा परिषद, तालुका पंचायतीतील मोहितेंच्या गडाला सुरुंग लावायला दारुगोळाही यातून मिळाला आहे

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT