Yogesh Tilekar Sarkarnama
पुणे

Hadapsar Assembly Constituency : टिळेकरांना विधानपरिषदेची उमेदवारी जाहीर; तुपे अन् भानगिरेंचा मार्ग मोकळा, भाजप हडपसरवरील दावा सोडणार?

Sudesh Mitkar

Pune News : विधानपरिषद निवडणुकीसाठी भाजपकडून पुण्यामधून माजी आमदार योगेश टिळेकर यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. योगेश टिळेकर यांना उमेदवारी जाहीर केल्यामुळे आता हडपसर विधानसभा मतदार संघामधून राष्ट्रवादीचे सध्याचे आमदार चेतन तुपे आणि शिवसेना शिंदे गटाचे शहराध्यक्ष नाना भानगिरे यांचा महायुतीकडून उमेदवारीचा दावा कुठेतरी मजबूत झाला असल्याचं बोललं जात आहे.

मागील निवडणुकीमध्ये अवघ्या काही हजार मतांनी भाजप उमेदवार टिळेकर यांचा पराभव झाला असताना या जागेवरील दावा भाजपा सहजासहजी सोडणार का? हे देखील पाहावे लागेल.

लोकसभा निवडणुकीनंतर लगेचच विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आहे. दरम्यानच्या काळामध्ये विधानपरिषदेच्या 11 जागांची निवडणूक देखील पार पडत आहे. यामध्ये भाजपाकडून ओबीसी युवा मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष राहिलेल्या माजी आमदार योगेश टिळेकर(Yogesh Tilekar) यांना उमेदवारी जाहीर केली गेली आहे. सध्या मराठा विरुद्ध ओबीसी आरक्षणाच्या वादाच्या पार्श्वभूमीवर ही उमेदवारी त्यांच्या गळ्यात पडली असल्याची राजकीय वर्तुळात चर्चा आहे.

मात्र त्यांच्या या विधानपरिषदेच्या उमेदवारीमुळे पुणे शहरातील हडपसर विधानसभा मतदार संघातील महायुतीमधील उमेदवारी बाबतचा तिढा कुठेतरी सैल झाला आहे. अशा देखील चर्चा राजकीय वर्तुळा सुरू झाल्या आहेत. मागील विधानसभा निवडणुकीमध्ये महायुतीकडून योगेश टिळेकर तर महाविकास आघाडीकडून चेतन तुपे हे निवडणूक रिंगणात होते. तर मनसेकडून वसंत मोरे यांनी देखील ही निवडणूक लढवली होती.

योगेश टिळेकर यांना अवघ्या काही हजार मतांनी पराभव स्वीकारावा लागला होता. दरम्यान गेल्या पाच वर्षांत बरच काही बदललं असून मोठ्या प्रमाणात राजकीय उलथापालथ झाली आहे. आता चेतन तुपे हे देखील महायुतीचा एक भाग आहेत. त्यामुळे हडपसरची उमेदवारी यंदा महायुतीकडून भाजपला मिळावी यासाठी योगेश टिळेकर हे आग्रही होते.

तसेच शिवसेना शिंदे गटाचे शहराध्यक्ष नाना भानगिरे यांनी देखील यावेळी हडपसर विधानसभा निवडणूक लढवण्याची जोरदार तयारी सुरू केली आहे. पुणे शहरातून हडपसरची जागा आपल्याला वाटायला यावी यासाठी त्यांनी थेट मुख्यमंत्र्यांनाच गळ घातली आहे.

अशा परिस्थितीमध्ये महायुतीच्या जागा वाटपात हडपसर विधानसभा मतदारसंघावरून तिढा निर्माण होण्याची दाट शक्यता निर्माण झाली होती. आता योगेश टिळेकर यांना विधानपरिषद उमेदवारी दिली गेल्यामुळे या हडपसरच्या जागेवरती राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार(Ajit Pawar) गटाचा आणि शिवसेना शिंदे गटाचा दावा आणखी मजबूत झाला असल्याचे बोलले जात आहे.

असं असलं तरी नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये हडपसर विधानसभा मतदार संघामधून(Hadapsar Assembly Constituency) राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या उमेदवाराला मताधिक्य मिळवता आलेलं नाही. अजित पवार गटाचे आमदार चेतन तुपे हे त्यांच्याच पक्षाच्या उमेदवाराला मताधिक्य देण्यात कुठेतरी कमी पडले असल्याचं बोललं जात आहे. भाजप या जागेवरचा आपला दावा सोडणार का हे पाहावं लागेल.

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT