Atul Benke
Atul Benke sarkarnama
पुणे

बिबट्या सफारी : अजितदादांच्या घोषणेविरोधात राष्ट्रवादीच्या आमदाराची थेट भूमिका

सरकारनामा ब्यूरो

पुणे : जुन्नरची (Junnar) प्रस्तावित बिबट्या सफारी बारामतीला (Baramati) स्थलांतरित झाल्यामुळे जुन्नर तालुक्यात जनक्षोभ उसळला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) आमदार अतुल बेनके (Atul Benke) यांना जनतेच्या रोषाला सामोरे जावे लागले. जनतेच्या रेट्यामुळे बेनके यांनी आज (बुधवारी ता.16) विधानसभेत जोरदार मागणी करत, बिबट्या सफारी जुन्नरलाच करण्याची आक्रमक मागणी केली. यावेळी त्यांनी बिबट्या समस्या आणि निवारणावरही मुद्दे मांडले.

बिबट्या सफारीचा मुद्दा घेऊनच आम्ही निवडणुका लढलो. मात्र, अर्थसंकल्पात बारामतीच्या बिबट सफारीसाठी ६० कोटींची तरतूद केल्याने, जुन्नरची बिबट सफारी बारामतीला होणार या घोषणेमुळे जुन्नरची जनता व्यथित झाली आहे. यामुळे मला लोकप्रतिनिधी म्हणुन मोठ्या रोषाला सामोरे जावे लागेल. यामुळे हा प्रकल्प जुन्नर मध्येच व्हावा, असे पत्र मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांना दिले.

जुन्नरची प्रस्तावित बिबट्या सफारी बारामतीला स्थलांतरित झाल्यामुळे जुन्नर तालुक्यात मोठा रोष निर्माण झाला आहे. सफारीची मागणी आणि पाठपुरावा २०१६ पासून शिवसेनेचे विद्यमान जिल्हाप्रमुख व माजी आमदार शरद सोनवणे करत आहेत. मात्र, अर्थसंकल्पात अचानक बारामतीच्या बिबट सफारीसाठी निधीच्या तरतूदीची घोषणा झाल्याने जुन्नर तालुका ढवळुन निघाला. यामुळे आता शिवसेना आणि राष्ट्रवादी संघर्ष सुरु झाला आहे. या संघर्षात उद्वीग्न लोकभावनेचा आदर करत आमदार बेनके यांनी यांनी उद्धव ठाकरे आणि अजित पवार यांना पत्र देत, सफारी जुन्नराच करण्याची मागणी केली.

पत्रात बेनके यांनी म्हटले आहे कि, ''२०१६ मध्ये बिबट सफारी प्रकल्प जुन्नरला व्हावा, यासाठी तत्कालीन वनमंत्री यांच्या दालनात बैठक झाली होती. त्यास राज्य सरकारने अनुकूलता दाखवून संबधित विभागाचे सचिव, वास्तुविशारद यांनी आंबेगव्हाण येथील जागेची पाहणी करत, डिपीआर साठी दिड कोटी रुपये मंजूर केले. त्यातील ६५ लाख अदा करणार होते. मात्र, ते झाले नाही व हा प्रकल्प पुढे गेला नाही.

तेव्हापासून जनतेला या प्रकल्पाबाबत आश्‍वस्त केल्याने या प्रकल्पाबाबत जनतेमध्ये उत्सुकता होती. हेच मुद्दे घेऊन मी निवडणुक लढली. मात्र, बजेटमध्ये हा प्रकल्प बारामतीला होणार या घोषणेमुळे जुन्नरची जनता व्यथित होऊन, जनक्षोभ उसळला. शासनाचे धोरण जुन्नरला अनुकूल असताना, हा प्रकल्प बारामतीला नेण्याचा घाट का घातला जात आहे? अशी लोकभावना झाली आहे. यामुळे जनतेच्या मोठ्या रोषाला सामोरे जावे लागेल. यामुळे हा प्रकल्प जुन्नरलाच व्हावा. अशी माझ्यासह सर्वपक्षीय मागणी आहे. त्याचा सकारात्मक विचार व्हावा,``असे आवाहन बेनके यांनी केले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT