Political campaigns Pune : आगामी महापालिका निवडणुकीचे बिगुल वाजेल तेव्हा वाजेल पण इच्छुकांनी मात्र प्रचाराचा बार उडवून दिला आहे. दिवाळीची संधी साधत काही इच्छुकांनी दिवाळी सरंजामचे वाटप केले आहे. तर काहींनी सुगंधी उटण्यापासून फराळापर्यंत सगळं घरोघरी वाटप केले आहे. त्यामुळे कोणत्या मतदारसंघात कोणत्या पक्षाकडून कोण इच्छूक, अशा प्रश्नांची उत्तरं मतदारांना मिळू लागली आहेत.
पुणे महापालिकेची निवडणूक 2022 मध्ये होणार होती. पण निवडणुका लांबणीवर पडल्याने मार्च 2022 पासून पुणे महापालिकेवर प्रशासक राज आहे. गेल्या साडेतीन वर्षापासून महापालिकेच्या निवडणुका कधी होणार? या एका प्रश्नावर राजकीय कार्यकर्ते आडून पडले आहेत. पक्षाच्या नेत्यांकडे चौकशी केल्यावर ते लवकरच होतील असे उत्तर देऊन वेळ मारून नेत. त्यामुळे हे कार्यकर्तेही लवकरच निवडणूक जाहीर होईल, आपल्याला उमेदवारी मिळेल या आशेवर टिकून आहेत.
झोपडपट्टी किंवा वस्तीचा भाग असेल तर मतदारांसाठी साखर, मैदा, तेल, शेंगदाणे, बेसन, फुटाने, पोहे यासह अन्य वस्तूंचा समावेश असलेला सरंजाम वाटपाचा कार्यक्रम आयोजित करतात. त्यासाठी पक्षाच्या नेत्यांना बोलावून कार्यक्रम घेतला जातो असे कार्यक्रम शहरात पार पडले आहेत.
त्याच प्रमाणे सोसायटीतील नागरिकांसाठी अभ्यंग स्नानासाठी साबण, सुगंधी तेल, उटणे यासह पणत्या यांचे किट वाटप केले जाते. तर काही जण लक्ष्मी पुजनापूर्वी पूजेचे साहित्य घरोघरी वाटप करतात. त्यावर स्वतःचा फोटो, पत्नीचा किंवा निवडणूक लढण्यासाठी घरातून इच्छुक असलेल्या महिलेचा फोटा छापलेला असतो. काही जण आपले किट नागरिकांना आवडावे, ते घरात व्यवस्थित ठेवावे, यासाठी डब्यात आकर्षक पद्धतीने पॅकिंग करून देत आहेत.
पुणे महापालिकेची प्रभाग रचना अंतिम झाली आहे. आता मतदार यादीवर काम सुरु आहे. आरक्षणे पडण्यास आणखी काही दिवस वाट पाहावी लागणार असली तरी सर्व पक्षिय इच्छुक उमेदवारांनी निवडणुकीची तयारी सुरु केली आहे. यामध्ये घरोघरी पोचण्यासाठी दिवाळीचा मुहूर्त साधला आहे.
संगीत रजनी कार्यक्रमांची रेलचेल
दिवाळीच्या निमित्ताने इच्छुक उमेदवारांनी त्यांच्या प्रभागातील नागरिकांसाठी दिवाळी पहाट, दिवाळी संध्या असे कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. हे कार्यक्रम वसुबारसेपासून सुरु झाले असून, पुढील चार पाच दिवस भक्ती गीत, भाव गीत, हिंदी चित्रपटांमधील गाजलेल्या गीतांचा कार्यक्रम आयोजित केला जात आहे. त्यामुळे याची मोठी पर्वणी नागरिकांना मिळत आहे.
आरक्षण सोडतीकडे डोळे
प्रभाग रचना अंतिम झाली असली तरी अनुसूचित जाती, जमाती, नागरिकांचा मागास प्रवर्ग (ओबीसी), महिला आरक्षित प्रभाग निश्चित करण्यासाठी सोडत काढली जाणार आहे. ही सोडत लांबणीवर पडली आहे. निवडणुकीची तयारी सुरु केली असली तरी प्रभागात आरक्षण पडले तर काय करायचे असा प्रश्न अनेक इच्छुकांच्या समोर आहे. त्यामुळे सोडतीची तारीख कधी निश्चित होणार याकडे राजकीय कार्यकर्त्यांचे डोळे लागले आहेत.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.