
Pune News : राष्ट्रवादीचा गड असलेल्या पुणे जिल्ह्यामध्ये भाजप आपली सत्ता आणण्याचे स्वप्न पाहत आहे. यासाठी महाविकास आघाडीमधील अनेक मातब्बर नेते आपल्याकडे ओढण्याचा कार्यक्रम सध्या भाजपने सुरू केला आहे. मात्र इतर पक्षांमध्ये फोडाफोड करून विजयाचे स्वप्न बघणार्या भाजपमध्येच अंतर्गत दुफळी पडल्याचं पाहायला मिळत आहे.
राजगड तालुक्यातील भारतीय जनता पक्षामध्ये (भाजप) अंतर्गत गटबाजी उफाळून आली आहे. पक्षातील तणाव पुन्हा एकदा समोर आला आहे. युवा मोर्चाचे जिल्हा सचिव शुभम बेलदरे यांनी तालुकाध्यक्ष राजू रेणुसे यांच्याविरोधात वेल्हे पोलिस ठाण्यात १९ ऑक्टोबर रोजी लेखी तक्रार दाखल केली आहे.
वेल्हे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही तक्रार पक्षांतर्गत वादातून उद्भवली आहे. काही दिवसांपूर्वी भाजपच्या वतीने तालुक्यात आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. मात्र, या बैठकीचा निरोप बेलदरे यांना मिळाला नव्हता, ज्यामुळे त्यांनी पक्षाच्या अधिकृत सोशल मीडिया ग्रुपवर संदेश पाठवून आपली नाराजी व्यक्त केली.
यानंतर तालुकाध्यक्ष रेणुसे यांनी बेलदरे यांना फोनवरून दमदाटी आणि शिवीगाळ केल्याचा गंभीर आरोप बेलदरे यांनी तक्रारीत केला आहे. यापूर्वीही रेणुसे यांच्याकडून अशा प्रकारचे वर्तन झाल्याचा दावा बेलदरे यांनी केला आहे, ज्यामुळे पक्षातील अंतर्गत कलह अधिक तीव्र झाला आहे.
दुसरीकडे, राजू रेणुसे यांनी आपल्यावरील सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. त्यांनी स्पष्ट केले की, बैठकीचा संदेश चार दिवस आधीच पक्षाच्या अधिकृत सोशल मीडिया ग्रुपवर पाठवण्यात आला होता. कोणालाही वैयक्तिकरित्या फोन करण्यात आला नव्हता. त्यांनी बेलदरे यांचे आरोप खोटे असल्याचा दावा केला आहे.
या घटनेमुळे राजगड तालुक्यातील भाजप संघटनेतील अंतर्गत गटबाजी आणि तणाव पुन्हा एकदा उघड झाला आहे. पक्षातील कार्यकर्त्यांमधील हा वाद तालुक्यातील पक्षाच्या कामकाजावर आणि एकजुटीवर परिणाम करू शकतो, अशी चर्चा स्थानिक पातळीवर सुरू आहे. या प्रकरणी पोलिस पुढील तपास करत असून, याचा पक्षाच्या राजकीय रणनीतीवर काय परिणाम होतो, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.