Pune News: देशभरात आगामी लोकसभा निवडणुकीचे वारे वाहत असताना राज्यात शिरूर लोकसभा मतदारसंघ सध्या चर्चेचा विषय बनला आहे. शिरूर मतदारसंघातील खासदार डॉ. अमोल कोल्हे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यातील रंगलेल्या वाकयुद्धामुळे शिरूर मतदारसंघ सध्या चर्चेत आहे. यातच आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदेदेखील माजी खासदार आढळराव पाटील यांच्यासाठी शिरूरच्या आखाड्यात उतरणार असल्याचे बोलेले जात आहे.
नुकतेच उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अमोल कोल्हे यांच्यावर टीका करीत शिरूर लोकसभा मतदारसंघातून मी दिलेला उमेदवार निवडून आणून दाखवणारच, असे थेट आव्हान दिले. त्यानंतर अजित पवारांनी शिरूर लोकसभा मतदारसंघाचा भाग असलेल्या हडपसर विधानसभा मतदारसंघात दौरा करीत विकासकामांची पाहणी केली. त्यावेळी 'मी सांगितलं तेच फायनल, विषय संपला,' असा इशारा पुन्हा एकदा उपमुख्यमंत्री पवारांनी कोल्हेंना दिला.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
उपमुख्यमंत्री पवारांच्या इशाऱ्यानंतर खासदार कोल्हेंनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची तातडीने भेट घेतली. या भेटीनंतर खासदार कोल्हेंनीही अजित पवारांना सूचक इशारा देत खासगीतील कोणतीही चर्चा सार्वजनिक करणार नाही. मात्र, 'बात निकली है तो दूर तक जाएगी...,' मी 2019 मध्ये जिथे होतो तिथेच आहे, ज्यांनी भूमिका बदलली त्यांना विचारा, अशा शब्दांत खासदार कोल्हेंनी अजित पवारांना सूचक इशारा दिला होता.
एकीकडे या वादाच्याअनुषंगाने शिरूर लोकसभा मतदारसंघावर अजित पवार यांनी आपला दावा प्रबळ केला असतानाच आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदेदेखील माजी खासदार आढळराव पाटील यांच्यासाठी मैदानात उतरणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे. याअनुषंगानेच एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांचा लवकरच शिरूर लोकसभा मतदारसंघात दौरादेखील आहे.
नव्या वर्षात 6 जानेवारीपासून शिंदे महिनाभर राज्यातील विविध भागांत दौरा करणार आहेत. मराठवाड्यात 10 जानेवारीला हिंगोली, धाराशीव, तर 11 जानेवारीला परभणी आणि संभाजीनगर जिल्ह्याचा दौरा शिंदे करणार आहेत. यादरम्यान 21 जानेवारीला ते शिरूर, मावळच्या दौऱ्यावर असणार आहेत.
या दौऱ्याच्या माध्यमातून शिंदे गट आणि आढळराव पाटील शक्तिप्रदर्शन करून आपला उमेदवारीचा दावा बळकट करणार असल्याचं बोललं जात आहे. त्यामुळे आगामी काळामध्ये शिरूर मतदारसंघामध्ये महायुतीचा उमेदवार हा उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांचा असणार की मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा असणार ? यावरून राजकारण तापण्याची शक्यता नाकारता येत नाही. यातच आता अजितदादांच्या आव्हानानंतर मुख्यमंत्री शिंदेंचाही शिरूर दौरा असल्यामुळे आगामी निवडणुका पाहता खासदार कोल्हेंचं टेन्शन मात्र वाढणार आहे.
(Edited By Ganesh Thombare)
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.