Ajit Pawar| Sunetra Pawar | Sharad Pawar | supriya Sule Sarkarnama
पुणे

Lok Sabha Election 2024 : खडकवासला ठरवणार बारामतीचा खासदार, कोणाचा होणार गेम? वाचा आकडेवारी

Sudesh Mitkar

Pune News, 8 May : महाराष्ट्र लोकसभा निवडणुकीतील ( Lok Sabha Election 2024 ) सर्वात 'हायहोल्टेज' लढत ही बारामतीत झाली. बारामती लोकसभेसाठी ( Baramati Lok Sabha Constitunecy ) आता मतदान पार पडलं असून उपमुख्यमंत्री अजित पवार ( Ajit Pawar ) यांच्या प्रतिष्ठेची आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे ( शरदचंद्र पवार ) अध्यक्ष शरद पवार ( Sharad Pawar ) यांच्या अस्तित्वाची असलेल्या निवडणुकीचे भवितव्य मतपेटीत बंद झाले आहे.

बारामती लोकसभा मतदारसंघात 54.38 टक्के मतदान झाले आहे. निवडणूक आयोगाकडून अंतिम आकडेवारी जाहीर करताना या टक्केवारीत काहीशी वाढ होण्याची शक्यता आहे. पण, 2019 च्या निवडणुकीत बारामतीत 61.70 टक्के मतदान झाले होते. यंदाच्या निवडणुकीत ही मतदानाची टक्केवारी सात टक्क्याने कमी झाली आहे. त्यामुळे या कमी झालेल्या मतदानाच्या टक्केवारीचा फटका कोणाला बसतो याची चर्चा सुरू आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

बारामती लोकसभा मतदारसंघांमध्ये येणाऱ्या सहा विधानसभा मतदारसंघांमध्ये सुनेत्रा पवार ( Sunetra Pawar ) आणि सुप्रिया सुळे ( Supriya Sule ) यांच्यामध्ये 'काटे की टक्कर' असल्याचं चित्र आहे. बारामती, इंदापूर, दौंड, पुरंदर आणि भोरमध्ये 'सामना' बरोबरीनं सुटला अथवा काही प्रमाणात सुप्रिया सुळेंना आघाडी मिळाली, तर ते लीड तोडण्याची आणि महायुतीला विजयी आघाडी देण्याची ताकद एकट्या खडकवासला विधानसभा मतदारसंघांमध्ये आहे.

2014-19 या निवडणुकांचे निकाल पाहता सुप्रिया सुळेंना अन्य मतदारसंघातून मिळालेली आघाडी कमी करण्याचं हे खडकवासला मतदारसंघानं केलेलं आहे. खडकवासला मतदारसंघातून कांचन कुल यांना 70 हजार हजारांहून अधिक मतांची आघाडी घेतली होती. या निवडणुकीत सुप्रिया सुळे यांना 85 हजार 993 मते, तर कुल यांना 1 लाख 52 हजार 487 अशी विक्रमी मते मिळाली होती.

2014 च्या निवडणुकीत भाजपचा पाठिंबा असलेल्या राष्ट्रीय समाज पक्षाचे महादेव जानकर यांनी सुळे यांच्यापेक्षा 20 हजारांहून अधिक मतांची आघाडी खडकवासला मतदारसंघातून घेतली होती. या निवडणुकीत सुळे यांना 70 हजार 602 मते, तर जानकर यांना 98 हजार 729 मते मिळाली होती. त्यानिवडणुकीत जानकर भाजपाच्या कमळ चिन्हावरती निवडणूक लढले नाही. अन्यथा वेगळं चित्र असतं, असं काही दिवसांपूर्वीच अजित पवार यांनी म्हटलं होतं.

यंदाच्या निवडणुकीत खडकवासला मतदारसंघात 50 टक्के मतदान झालं आहे. 2019 मध्ये 53 टक्के मतदान झालं होतं. खडकवासला मतदारसंघात पाच लाख 38 हजार मतदार आहेत. या मतदारसंघांमध्ये 50 टक्के मतदान झाल्याचे गृहीत धरल्यास दोन लाख 70 हजार मतदारांनी आपला मतदानाचा अधिकार बजावल्याचं स्पष्ट होत आहे. ही टक्केवारी मागच्या वेळेप्रमाणेच आहे, असं बोललं तरी हरकत नाही. त्यामुळे मागच्यावेळी प्रमाणेच महायुतीला या ठिकाणी बहुमत मिळाल्यास ही निर्णय आघाडी महायुतीसाठी होऊ शकते.

दुसरीकडे सलग दोन निवडणुकांमध्ये खडकवासला मतदारसंघांमध्ये पिछाडीवरती राहिल्यामुळे सुप्रिया सुळे यांनी गेल्या दोन वर्षांमध्ये मोठ्या प्रमाणात खडकवासला भागातील सोसायटी यांना भेट देत पेरणी केली आहे. त्यामुळे त्यांची ही पेरणी कितपत कामाला येते यावरती बारामती लोकसभा मतदारसंघातील खासदार कोण होणार? हे ठरणार असल्याचं बोललं जात आहे.


( Edited By : Akshay Sabale )

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT