Vijay Shivtare, Eknath Shinde, Devendra Fadnavis Sarkarnama
पुणे

Vijay Shivtare: शिंदे-फडणवीसांना जमलं नाही ते एका फोनने केलं, शिवतारेंच बंड थंड करणारा 'तो' व्यक्ती कोण?

सरकारनामा ब्यूरो

Vijay Shivtare News: शिवसेना नेते आणि माजी मंत्री विजय शिवतारे (Vijay Shivatare) यांनी बारामती लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीतून अखेर माघार घेतली आहे. पुरंदरमध्ये कार्यकर्त्यांबरोबर झालेल्या बैठकीनंतर पत्रकार परिषद घेत शिवतारेंनी लोकसभा निवडणुकीतून माघार घेण्याची घोषणा केली. शिवतारेंचं बंड थंड झाल्यामुळे महायुतीकडून निवडणूक लढवण्यास इच्छुक असलेल्या उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांच्या अडचणी कमी झाल्या आहेत, तर लोकांच्या हिताचे प्रश्न सोडवण्यासाठी आपण तह केला असून, पुरंदरच्या (Purandar) इतिहासातला हा दुसरा तह असल्याचं स्पष्टीकरण शिवतारे यांनी आपलं बंड मागे घेताना दिलं आहे.

मात्र, खुद्द मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यासोबत वारंवार चर्चा करूनही आपल्या मतावर ठाम असणाऱ्या शिवतारेंनी माघार घेतलीच कशी? असा प्रश्न अनेकांना पडला होता. या प्रश्नाचं उत्तर खुद्द विजय शिवतारे यांनीच आजच्या पत्रकार पत्रकार परिषदेत दिलं आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

कार्यकर्त्यांसोबतच्या बैठकीनंतर विजय शिवतारे (Vijay Shivtare) यांनी माध्यमांशी संवाद साधला. या वेळी आपली भूमिका स्पष्ट करताना ते म्हणाले, "कोणत्याही स्थितीत बारामती लोकसभेची निवडणूक लढवायचीच, असा निर्धार आम्ही केला होता. लोकांची भावना होती म्हणून मी लोकसभा निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, त्यानंतर मला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा फोन आला, तसंच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी मी दोनदा चर्चा केली. एकनाथ शिंदे हे माझ्यावरती रागावलेदेखील. परंतु मी तिथून निघून आलो होतो. मात्र, 26 तारखेला मला मुख्यमंत्र्यांचे ओएसडी खतगावकर यांचा फोन आला आणि मी माझ्या निर्णायाचा फेरविचार केला."

खतगावकर यांनी मला फोनवर सांगितलं की, "आपल्या भूमिकेमुळे मुख्यमंत्र्यांची अडचण होत आहे. महायुतीचं वातावरण बिघडून राज्यात महायुतीचे 15-20 खासदार पडू शकतात. मतांचं विभाजन होऊन महाविकास आघाडीचा फायदा होईल. अशी परिस्थिती आहे आणि त्यामुळे आपल्याला मुख्यमंत्र्यांना सांभाळायचं आहे. कोणत्याही परिस्थितीमध्ये विजय शिवतारे ऐकत नाही म्हणून वरिष्ठ नेत्यांकडून काही गैरसमज झाले, तर ते चालणार नाही," असं खतगावकरांनी सांगितल्याचं शिवतारे म्हणाले.

हे ऐकल्यानंतर आपल्यामुळे मुख्यमंत्र्यांची आणि महायुतीची अडचण होत आहे. आपल्या स्थानिक लढ्यासाठी राज्याचं हित आणि मोदींना (Narendra Modi) तिसऱ्यांदा पंतप्रधान बनवण्यासाठी सत्ता भाजपकडे देण्याचा प्रयत्न असताना माझ्याकडून असं काही घडलं तर ते इतिहासात लिहिलं जाईल. त्यामुळे खतगावकरांच्या त्या फोननंतर मी मुख्यमंत्र्यांशी बोललो. त्यानंतर दोन उपमुख्यमंत्री, मुख्यमंत्री यांच्या समवेत रात्री 2 तास चर्चा झाली. त्यामध्ये माझं म्हणणं ऐकून घेण्यात आलं. या वेळी मी माझ्या काही मागण्या त्यांच्यासमोर मांडल्या. त्याबाबत सकारात्मक प्रतिसाद आल्याने मी या निवडणुकीतून माघार घेण्याचा निर्णय घेतला," असं शिवतारे यांनी सांगितलं.

(Edited By Jagdish Patil)

R

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT